गुरुवार, ९ एप्रिल, २०२६

 

विशेष लेख-

नारी शक्ती वंदन

सुरक्षित मातृत्व हा प्रत्येक महिलेचा अधिकार

 

            महिलांच्या सर्वांगीण विकासासोबतच सुरक्षित मातृत्व मिळावे यासाठी प्रधानमंत्री मातृवंदन योजना महिलांमध्ये लोकप्रिय होत आहे. गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासोबतच काम करणाऱ्या महिलांना वेतनातील नुकसान भरपाई मिळत असल्यामुळे राज्यात सुमारे 5 लाख 70 हजार पेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. या योजनेमुळे मातामृत्यू तसेच बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. नागपूर विभागात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात 18 हजार 262 महिलांनी या योजनेत नोंदणी केली आहे.

            प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या माध्यमातून गरोदर माता आणि बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी लाभार्थी महिलेला आर्थिक मदत देण्यात येत आहे. शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये सुरक्षित मातृत्व मिळावे तसेच महिलेच्या बाळंतपणामध्ये होणारी आर्थिक तसेच वैद्यकीय अडचणींचा सामना करता यावा यासाठी पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी 5 हजार रुपये तसेच दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या वेळी 6 हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. ही योजना म्हणजे गरोदर माता आणि बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी वरदान ठरत आहे.

            केंद्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागामार्फत प्रधानमंत्री मातृवंदन योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे मातामृत्यू दर कमी होण्यासोबतच बालमृत्यूच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. गर्भवती मातेला दैनंदिन मजुरी करावी लागू नये तसेच मजुरीमुळे होणारे आर्थिक नुकसान भरपाई देण्यासाठी या योजनेत तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आर्थिक भरपाई करुन मातेला विश्रांती घेण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासोबतच दवाखान्यात प्रसुती आणि बालकांचे वेळेवर लसीकरण होत आहे. या योजनेसाठी लाभार्थी मातेचे आधार कार्ड आणि बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे उत्पन्न मर्यादा 8 लक्ष रुपये असणे आवश्यक आहे. ही संपूर्ण योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे.

            प्रधानमंत्री मातृवंदन योजना महिलांसाठी वरदान ठरत असल्यामुळे राज्यात 42 लाख 99 हजार महिला लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1 हजार 933 कोटी 97 लक्ष रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत 5 लाख 70 हजार नोंदणीचे लक्ष देण्यात आले होते त्यापैकी 28 हजार 174 पात्र महिला लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. नागपूर विभागात दिलेल्या उद्दिष्टांमध्ये नागपूर जिल्हयात 18 हजार 262 लाभार्थ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते त्यापैकी 16 हजार 220 लाभार्थ्यांचे नोंदणी झाली असून 15 हजार 169 महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळाला आहे. 1 एप्रिलपासून नव्याने 789 नवीन लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

            प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या लाभासाठी 18 ते 55 वयोगटातील महिला पात्र आहे. यामध्ये वार्षिक 8 लाख रुपय कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी उत्पन्नाची अट नाही. प्रधानमंत्री आवास योजना, बीपीएल शिधापत्रिकाधारक, ईश्रम कार्डधारक, मनरेगा जाब कार्डधारक, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस अथवा आशा कार्यकर्ते तसेच अन्नसुरक्षा कायद्या अंतर्गत असलेल्या रेशनकार्ड धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या लाभासाठी राज्य अथवा केंद्र शासनाच्या तसेच खाजगी आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी आवश्यक आहे. शेवटच्या मासिकपाळीच्या तारखेच्या 6 महिन्याच्यात किमान एक प्रसुती तपासणी झाल्यास 3 हजार रुपयाचा पहिला हप्ता देण्यात येतो. बाळाची जन्म नोंदणी तसेच लसीकरणाचे प्राथमिक च्रक पूर्ण झाल्यानंतर 2 हजार रुपयाचा दुसरा हप्ता अनुज्ञेय आहे. दुसरे अपत्य मुलगी असल्यास एकाच टप्यात 6 हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येतात.

            प्रधानमंत्री मातृवंदन योजना पूर्वी आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत होती, परंतु एपिल 2023 पासून मिशन शक्ती मार्गदर्शन सूचनेनुसार नव्याने लागू करण्यात आली आहे. ही योजना आता महिला व बाल विकास विभागातर्फे राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत  2023-24 या वर्षात 3 लाख 62 हजार 215 लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. पात्र लाभार्थ्यांना थेट निधीचे वितरण करण्यात आले आहे.

 

अनिल गडेकर

नागपूर

                                                   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा