शुक्रवार, १० एप्रिल, २०२६

विशेष वृत्त

विशेष वृत्त                                                                

 

निराधार छायाबाईला मिळाला आधार

मुख्यमंत्री कार्यालयाचा मदतीचा हात

 

नागपूर, दि. १०: एप्रिलपती पाठोपाठ करोनात मुलगा गमावलेल्या निराधार छायाबाईला मुख्यमंत्री कार्यालयाने मदतीचा हात दिल्याने आता छायाबाई सन्मानाने आपले आयुष्य जगत आहेत.

       नागपुरातील सोनेगाव परिसरात राहणाऱ्या छायाबाई पाटील साधारण ६५ वर्षांच्या आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर तरुण मुलाच्या आधाराने त्यांचे आयुष्य सुरू होते, मात्र करोना महामारी आली आणि त्यात त्यांच्या मुलाला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (मेडिकल) दाखल करावे लागले. मात्र त्या आजारात या तरुण मुलाचाही मृत्यू झाला.      

         हक्काची राहण्याची जागा नाही, आधी पती आणि आता मुलगाही जगातून निघून गेलेला. पुढे कसे जगायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरातील कार्यालय गाठले. तेथील विशेष अधिकारी सुनील मित्रा यांना भेटून आपली परिस्थिती सांगितली.  माझ्याजवळ कोणतीही कागदपत्रे नाहीत. घरी राशन कार्ड होते, मात्र मुलाला मेडिकलमध्ये दाखल करताना ते तिथे दिले. त्यामुळे मला हे राशन कार्ड मिळवून द्या, अशी त्यांची मागणी होती. करोना काळात मेडिकलमध्ये इतक्या मोठ्या संख्येत रुग्ण दाखल होते की  त्यात छायाबाईंच्या मरण पावलेल्या मुलाचे राशन कार्ड शोधणे, एक आव्हानच होते.

 मित्रा यांनी मेडिकलच्या अधिष्ठात्यांना पत्र लिहून छायाबाईंचे राशन कार्ड मिळवून देण्याची विनंती केली. अखेर मेडिकल प्रशासनाने ते शोधून छायाबाईला परत दिले. कार्ड तर मिळाले पण छायाबाईंच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या कार्यालयाने सोनेगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी तेलगोटे यांना छायाबाईंसाठी काम शोधण्याची विनंती केली. शेवटी त्यांना त्या परिसरातच घरकाम मिळाले. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अन्य कागदपत्रांची गरज होती. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने विशेष पुढाकार घेऊन त्यांची इतर आवश्यक कागदपत्रे तयार केली. त्या आधारे त्यांना संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करायला सांगितले. आता या योजनेतून महिन्याला दीड हजार रुपये छायाबाईंना मिळत आहेत. ही रक्कम तसेच घरकामातून मिळणारे पैसे यातून आपली गुजराण व्यवस्थित होत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने मला नुसत मदतच केली नाही, तर माझ्या मागे भक्कम आधार उभा केला. त्यामुळेच आता मला एकटं वाटत नसल्याची भावना छायाबाईंनी व्यक्त केली.

                                          

 

                                                      ००००००००

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा