बुधवार, ८ एप्रिल, २०२६

समाज कल्याण विभागामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाला सुरवात

 

समाज कल्याण विभागामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाला सुरवात

            अमरावती, दि. 8: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी आणि जनजागृती व्हावी, या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाला 8 एप्रिलपासून सुरवात झाली असून हा सप्ताह 14 एप्रिल 2026, पर्यंत चालणार आहे. सप्ताहा दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा, पथनाट्ये, कार्यशाळा, मेळावे आणि व्याख्यानांचा यात समावेश आहे. शासकीय योजनांची माहिती जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सामाजिक समता,न्याय व बंधुता या मूल्यांना प्रोत्साहन देणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. सप्ताह दरम्यान, जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 9 एप्रिल रोजी शाळा, महाविद्यालये आणि शासकीय वसतिगृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व, निबंध आणि लघुनाटिका स्पर्धा आयोजित केल्या जातील. तसेच संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संत गाडगे महाराज यांच्या कार्याचे महत्व प्रतिपादन करणारे व्याख्यानं, वक्तृत्व स्पर्धा इत्यादिचे आयोजन करणे, याच दिवशी, जिल्हा आणि विभागीय स्तरावर शासकीय योजनांच्या लाभांचे प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे.

            10 एप्रिल रोजी समतादूतांद्वारे ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये पथनाट्ये आणि लघुनाटिकांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांविषयी प्रबोधन केले जाईल. तसेच मार्जिन मनी योजनेवर कार्यशाळा आणि लाभार्थी मेळावे आयोजित केले जातील. 11 एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार असून त्यांच्या सामाजिक कार्यावर व्याख्यान आयोजित केले जाईल. जेष्ठ नागरिकांचे मेळावे, शाळा वसतीगृह व महाविद्यालयांमध्ये आरोग्य तासणी व रक्तदान शिबीरांचे आयोजन करणे.  दि.12 एप्रिल रोजी सप्ताहामध्ये 'संविधान जागर' कार्यक्रमांतर्गत भारतीय संविधानाची निर्मिती, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये यावर माहिती दिली जाईल. महिलांसाठी विशेष मेळावे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिरे व मेळाव्याचे आयोजित करण्यात येणार आहेत. 13 एप्रिल रोजी प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून, शासकीय कार्यालये आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात ऑनलाईन जात पडताळणी प्रमाणपत्रे वितरित केली जाणार आहेत. 14 एप्रिल रोजी सप्ताहाचा समारोप होईल. यानिमित्त, शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन कार्यक्रम, विविध व्याख्याने आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येईल. तसेच विविध व्याख्याने आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येईल. जिल्हा स्तरावर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्यावर माहिती देण्यात येईल. तसेच महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दि वर्ष म्हणून दि.20 मार्च 2026 पासून साजरे करण्यात येत असून त्यानिमित्ताने चवदार तळे महाड येथील सत्याग्रहासंबंधी व त्याअनुषंगाने मानवी हक्कांचे महत्व प्रतिपादन करणारे व्याख्यान आयोजित केले जाईल, अशी माहिती श्रीमती, माया केदार, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग अमरावती यांनी दिली आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा