बुधवार, १ एप्रिल, २०२६

राज्यात ‘साधना सप्ताह’

 

 


 

विशेष लेख :-

गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग : राज्यात साधना सप्ताह’

लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सर्व सामान्य जनतेला शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमांद्वारे सोयी, सुविधा, लाभ आदी पोचविण्यासाठी शासन सक्षमपणे कार्य करते. आणि या व्यवस्थेची भिस्त असणारी प्रशासन व्यवस्था त्यामुळेच सक्षम असावी लागते. प्रशासनात कार्य करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करता यावा यासाठी विविध प्रशिक्षणांद्वारे क्षमता विकास करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाने क्षमता विकास आयोग (सीबीसी) आणि-कर्मयोगी भारत  यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत 'साधना सप्ताह' आयोजित केला आहे. महाराष्ट्रातही  मंत्रालयीन व राज्यभरातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी 'साधना सप्ताह' अंतर्गत ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.


          आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्व क्षेत्रात होत असलेला वापर पाहता राज्य शासनाचाही तंत्रज्ञानाधारित कार्यक्रमात पुढाकार राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या गतिमान प्रशासनाची घोडदौड सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात १०० दिवसांचा प्रशासकीय सुधारणा कार्यक्रम आणि १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या पाठोपाठ आता केंद्रशासनाचा 'साधना सप्ताह' राज्यात राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या मंत्रालयीन सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी तसेच विभागीय आयुक्त कार्यालये आणि विभागांतर्गत येणारे जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा परिषद आदींमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी या सप्ताह अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा यासह प्रशासनातील विविध विभागामध्ये सक्षमपणे कार्य करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या उपयोगाधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मोहिमेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांना मे २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या 'TECH-वारी २.०' या कार्यक्रमावेळी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.


             'कर्मयोगी भारत' हा केंद्र शासनाचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म व अभिनव राष्ट्रीय उपक्रम आहे. तंत्रज्ञानआधारित शिक्षणाद्वारे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, कौशल्य आणि शासनक्षमता वाढविण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर विविध प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केंद्र शासनाने 'साधना सप्ताह' अंतर्गत शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कर्मयोगी प्लॅटफॉर्म वरील तंत्रज्ञानाधारित ५० प्रशिक्षण कार्यक्रमांची यादी तयार केली आहे. या सप्ताह अंतर्गत प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यादीतील एकूण प्रशिक्षण कार्यक्रमांपैकी किमान चार तासांचे प्रशिक्षण करणे अनिवार्य आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये 'लोकप्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता', 'आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मूळ बाबी : शिकणे, उपयोग आणि नैतिकता', 'प्रशासनासाठी जबाबदार एआयचा उपयोग', 'सर्वांसाठी युवा ए आय' असे एकूण ४४ मिनिटे ते ४६ तास काल मर्यादेचे एकूण  ५० प्रशिक्षण कार्यक्रम कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.


महासंचालकांच्या पुढाकाराने माहिती व जनसंपर्क विभागातही ‘साधना सप्ताह’

केंद्र शासनाच्या सूचनानुसार प्रशासकीय क्षमता सुधारण्यासाठी राबविण्यात येत असलेला ‘साधना सप्ताह’ हा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात या विभागात राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा माहिती कार्यालये, मुंबई येथील या विभागाचे मुख्यालय तसेच महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली आणि पणजी येथील कार्यालयांमधील १००२ अधिकारी-कर्मचारी 'साधना सप्ताह' अंतर्गत विविध प्रशिक्षण पूर्ण करणार आहेत. महासंचालक ब्रिजेस सिंह यांनी या संदर्भात बैठक घेऊन विभागाला सूचना दिल्या आहेत.

माहिती संचालनालयाच्या नागपूर- अमरावती विभागातही साधना सप्ताहाचा उत्साह

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर- अमरावती विभागातही 'साधना सप्ताह' अंतर्गत विभागातील एकूण 174 अधिकारी- कर्मचारी या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. यापूर्वी विभागातील शिपाई, वाहन चालक या वर्ग 'ड' पासून वरिष्ठ वर्ग 'अ' पर्यंतच्या सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्मयोगी भारत पोर्टलवरील प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले आहे. यामध्ये विशेषतः अमरावती विभागातील अकोला जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी  390 तास काल मर्यादेचे 294 प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले आहेत. तर नागपूर विभागातून गडचिरोली चे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी 60 तास काल मर्यादेचे एकूण 63 प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले आहे. साधना सप्ताहातही नागपूर अमरावती विभागातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी हिरीरीने भाग घेऊन विहित काल मर्यादेचे प्रशिक्षण पूर्ण करणार आहेत आणि या संदर्भातील नियोजन करण्यात आले असल्याचे विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी सांगितले आहे.

  बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून प्रशासनाला गतिमान करण्यासाठी शासन स्तरावर सतत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा या नव्या आव्हानात्मक विषयांचा परिचय होऊन प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना अधिक सक्षमपणे व गतिमानतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडता याव्या यासाठी केंद्र शासनाचा ‘साधना सप्ताह’ राज्यभर राबविण्यात येत आहे. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या सप्ताहात सक्रिय भाग घेऊन जनता व शासनाप्रती आपली प्रतिबद्धता दृढ करण्याचे आवाहनही शासनातर्फे करण्यात आले आहे.

 

      रितेश मोतीरामजी भुयार,

माहिती अधिकारी,

  माहिती व जनसंपर्क नागपूर.

    

०००००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा