बुधवार, २२ एप्रिल, २०२६

विशेष लेख

 

महिला सक्षमीकरणाचा 'अमरावती पॅटर्न'; 'वैदर्भी मार्ट'च्या माध्यमातून ग्रामीण उत्पादनांना जागतिक बाजारपेठ

 

            महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यातील स्वयं सहाय्यता समूहांच्या उत्पादनांना हक्काची आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी रुख्मिणी नगर चौक, माल टेकडी येथे 'वैदर्भी मार्ट' या भव्य विक्री केंद्राची (मॉल) स्थापना करण्यात आली आहे. या विक्री केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते 28 मार्च 2025 रोजी करण्यात आले.

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, अमरावती अंतर्गत स्वयंसहायता समूहांची स्थापना करणे, स्वयंसहायता समूहातील महिलांच्या संस्था स्थापन करणे, त्यांना आवश्यकतेनुसार बँक कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणे व विविध उपजीविका घटकाअंतर्गत प्रकल्प राबविण्यात येत आहेत.  तसेच या माध्यमातून जिल्ह्यामध्ये विविध महिला उद्योजक तयार होत असून विविध उत्पादने निर्माण करण्यात येत आहे.

             जिल्ह्यात आजवर 19 हजार 200 स्वयं सहाय्यता समूह, 1 हजार 59 ग्राम संघ आणि 59 प्रभाग संघांचे जाळे निर्माण झाले आहे. या समूहांच्या माध्यमातून महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना एक विशिष्ट ओळख मिळवून देण्यासाठी प्रशासनाने 'वैदर्भी' हा ब्रँड विकसित केला आहे. या ब्रँडअंतर्गत 90 उत्कृष्ट उत्पादनांची निवड करण्यात आली असून त्यांची 21 वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या सर्व उत्पादनांचे व्यावसायिकरित्या आकर्षक ब्रँडिंग करण्यात आले असून ते ग्राहकांसाठी 'वैदर्भी मार्ट' मध्ये उपलब्ध आहेत. खास विदर्भाची खासियत असणारे सरगुंडे, विविध पापड, शेवया, चिप्स, सांडगे, लोणची , मुराब्बा असे सर्व उन्हाळ्याची दाहकता चवदार करणारे पदार्थ अमरावतीकरांना येथे सहज रास्त भावात उपलब्ध होतात. या पदार्थांची मुंबई -पुण्याकडे नोकरी निमित्त असणाऱ्या अमरावतीकरांमध्ये विशेष मागणी आहे. परदेशात स्थायिक अमरावतीकारांसाठी देखील येथील उन्हाळी खाद्यपदार्थ वर्षभर वापरण्यासाठी पाठविले जातात, हे विशेष !

             वर्षभर अमरावतीमध्ये चालणारे विविध प्रदर्शने, कृषी महोत्सव अशा ठिकाणी वैदर्भी मार्टच्या वस्तू , विविध खाद्याने विक्रीस उपलब्ध असतात. उपलब्ध नसलेली खाद्यपदार्थ तातडीने बनवूनही दिली जातात.

              रुख्मिणी नगर येथील अंदाजे 80 बाय 20 स्क्वेअर फूट जागेत हे दोन मजली विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. या मॉलचे स्वरूप अत्यंत आधुनिक असून त्याची आतील  सजावट पूर्णपणे अत्याधुनिक व सुसज्ज आहे. पहिल्या मजल्यावर ग्राहकांसाठी विविध प्रकारचे मसाले, लोणची, पापड, विविध डाळी, धान्य, खाद्यतेल, ज्यूस, जॅम, बांबू व सजावटीच्या वस्तू, आयुर्वेदिक औषधी, ड्रायफ्रूट्स, बेकरी उत्पादने (बिस्किटे, टोस्ट, नमकीन) आणि महिलांची फॅशनेबल ज्वेलरी विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे .

 

 

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील हजारो महिलांना त्यांच्या मालाची थेट विक्री करण्याची संधी प्राप्त झाली आहे. यामुळे केवळ मध्यस्थांची साखळी मोडीत निघत नाही, तर महिलांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ होऊन त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहे. 'वैदर्भी मार्ट' हे केवळ एक विक्री केंद्र नसून ग्रामीण भागातील महिलांच्या जिद्दीला आणि कौशल्याला जागतिक बाजारपेठेच्या स्पर्धेत उतरवण्यासाठी उभारलेले एक सक्षम व्यासपीठ ठरले आहे.

 

 

अपर्णा यावलकर

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय,

अमरावती

#NariShaktiVandan
#NariShakti
#NariShaktiVandanAdhiniyam
#empoweringwomen

#नारीशक्तीवंदन

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा