गुरुवार, २३ एप्रिल, २०२६

 

रुग्णांना दर्जेदार व तत्पर वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी ईएसआयएस व शासकीय रुग्णालयांमध्ये सामंजस्य करार

·        कामगार विमाधारकांनी लाभ घेण्याचे आवाहन

            अमरावती दि. २१ : कर्मचारी राज्य विमा योजना (ESIS) अंतर्गत विमाधारकांना अधिक दर्जेदार व वेळेवर वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी शासकीय रुग्णालये आणि ईएसआयएस यांच्यात महत्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. हा निर्णय राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला असून राज्य कामगार विमा सोसायटी, मुंबई यांच्या आदेशाखाली हा करार अमलात आणण्यात आला आहे.

          या करारासाठी अकोला मंडळाचे उपसंचालक (आरोग्य सेवा) डॉ. सुशिल वाघचौरे, अमरावतीचे जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. विनोद पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारीसे तसेच वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. उज्वला माळवे आणि प्रशासन अधिकारी डॉ. राजनारायण गोमासे यांनी विशेष प्रयत्न केले.

          अमरावती विभागातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, क्षयरोग रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचा या करारात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ईएसआयएस अंतर्गत नोंदणीकृत कामगार व त्यांच्या कुटुंबियांना आता शासकीय रुग्णालयांमध्ये थेट उपचार घेता येणार.

          या उपक्रमामुळे विमाधारकांना कॅशलेस उपचार सुविधा, आपत्कालीन सेवांमध्ये तात्काळ प्रवेश, तज्ञ डॉक्टरांकडून उपचार, महागड्या तपासण्या व शस्त्रक्रियांचा लाभ अधिक जलद व सोयीस्कर पद्धतीने मिळणार आहे. पूर्वी उपचारांसाठी लागणारी प्रतीक्षा व संदर्भ प्रक्रियेतील अडचणीही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.

          हा सामंजस्य करार कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल मानले जात असून आरोग्य सेवा अधिक सर्वसमावेशक व सुलभ करण्यास या उपक्रमांमुळे मदत होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा