शुक्रवार, १४ जून, २०२४

मेळघाटातील आरोग्यविषयक प्रश्न सोडविण्यासाठी विशेष मोहिम राबविणार -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय * मेळघाटातील बालमृत्यू, मातामृत्यूबाबत प्रशासनाकडून चौकशी * गर्भवती महिला व बालकाच्या मृत्यूसंबंधी एसआयटीकडून चौकशी * दोषींवर कारवाई प्रस्तावित होणार अमरावती, दि. 13 : मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यू या आरोग्यविषयक प्रश्नांना कायमस्वरुपी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. धारणी तालुक्यातील गर्भवती महिला व तिच्या बालकाचा मृत्यू या घटनेसंबंधी विशेष चौकशी पथकाकडून चौकशी केल्या जात असून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले. तसेच अशा प्रकारची दुर्दैवी घटना यापुढे घडू नये म्हणून आरोग्य विभागाने सर्व आरोग्य केंद्र तसेच उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध ठेवाव्यात, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी सदर बैठकीत दिल्या. विभागीय आयुक्तांच्या दालनात आयोजित बैठकीत मेळघाटातील आरोग्य विषयक बाबींचा व मान्सून पूर्वतयारीचा डॉ. पाण्डेय यांनी सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपायुक्त(सामान्य प्रशासन) संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी सुभाष ढोले व संबंधित वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, गत काही दिवसापासून मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यू या विषयासंबंधी अनेक बातम्या वृत्तपत्रातून प्रसिध्द झाल्या आहेत. त्यानुषंगाने परिस्थितीचे गांर्भीय समजून आवश्यक उपाययोजनांसाठी तातडीची बैठक घेण्यात येत आहे. मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यू या प्रश्नाबाबत विविध कारणे समोर आली आहेत. कमी वयात लग्न, शरीरात हिमोग्लोबीनची कमतरता, प्रसुतीदरम्यान अधिक रक्तस्त्राव, रुग्णालयात प्रसूती न होणे, कमी वजनाचे बाळ, उपजत मृत्यू, जंतू संसर्ग आदी प्रमुख कारणांमुळे मेळघाटात कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मेळघाटातील जनतेचे आरोग्यविषयक अडचणींचे निराकरण व्हावे याकरिता आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. मेळघाटातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर व उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना आवश्यक असलेल्या सेवा-सुविधा पुरविण्यात याव्यात, आवश्यकतेनुसार खाटांची संख्या वाढविण्यात यावी, जीवनावश्यक औषधी व लसींचा साठा मुबलक प्रमाणात ठेवावा, याबाबत सूचना त्यांनी दिल्या. त्यासाठी आवश्यकतेनुसार जिल्हा वार्षिक योजना, तसेच शक्य असेल तेथे सीएसआर फंडातून निधीची तरतूद करावी. तसेच आवश्यक वैद्यकीय उपचार साहित्यांच्या उपलब्धतेसाठी शासनाकडे मागणीचे प्रस्ताव सादर करण्यात यावेत. मेळघाटातील आरोग्यविषयक उपाययोजनांचा नियमितपणे प्रत्यक्ष भेटी व बैठकीच्या माध्यमातून आढावा घ्यावा, असे डॉ. पाण्डेय यांनी यावेळी सांगितले. पावसाळ्यात मेळघाटातील दुर्गम व अतिदुर्गम गावांचा संपर्क तुटतो. त्यानुषंगाने तत्परतेने आरोग्य सुविधा रुग्णांना उपलब्ध करता याव्यात किंवा रुग्णांना आरोग्य केंद्रात पोहोचता यावे, यासाठी आताच पर्यायी रस्त्यांचे नियोजन करुन ठेवावे. त्यासंबंधी तेथील गावकऱ्यांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे. आरोग्य केंद्रात पुरेसा औषधी, सर्पदंश, रॅबीज आदी लसींचा साठा उपलब्ध ठेवावा. 102, 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सुस्थितीत ठेवून वाहनचालक नेहमी उपस्थित राहील याची संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. गर्भवती महिलांची प्रसूती आरोग्य केंद्रात, रुग्णालयातच होण्यासाठी संबंधितांना कर्मचाऱ्यांकडून समुपदेशन करण्यात यावे. अंगणवाडी सेविका, आशाताई यांच्याकडून गर्भवती महिला, कुपोषित बालके, नवबालके यांचे नियमितपणे सर्वेक्षण व तपासणी करण्यात यावी. आदिवासी बांधव-भगिनींचे अडचणी व प्रश्न पूर्ण संवेदनशिलतेने सोडवावेत, अशा सूचना डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिल्या. धारणी येथील ब्लड बँकच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून ब्लड बँक स्थापित करण्याचे काम शीघ्रगतीने करावे, अशा सूचना डॉ. पाण्डेय यांनी आरोग्य विभागाला दिल्या. ब्लड बँकेसाठी आवश्यक असणारे शीतकरण यंत्र, विद्युत पुरवठा व उर्वरित किरकोळ स्थापत्य बांधकाम आदी कामे अखेरच्या टप्प्यात असून जून अखेरपर्यंत पूर्णत्वास जाणार आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ब्लड बँक पूर्णरित्या कार्यन्वित होईल. मेळघाटातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारासंबंधी औषधोपचाराच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य केंद्र, रुग्णालयात पुरेसा औषधींचा साठा उपलब्धतेसाठी सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सौंदळे यांनी यावेळी बैठकीत दिली. 0000

गुरुवार, १३ जून, २०२४

बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके खरेदी करतांना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके खरेदी करतांना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी अमरावती, दि. 12 : खरीप हंगामाची सुरूवात झालेली असून बी-बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके इत्यादी निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारात गर्दी करू लागले आहेत.‍ शेतकरी बांधवांना गुणवत्तापूर्ण बी बियाणे, रासायनिक खते व निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी विभागातील सर्व कृषि निविष्ठा विक्री केंद्राबाहेर दर्शनिय ठिकाणी विक्री केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या बियाणे, खते, किटकनाशकांचा साठा व दरफलक अद्यावत ठेवणेबाबत सक्ती करण्यात आली आहे. तसेच उपरोक्त साहित्यांची तपासणी वरीष्ठ अधिकाऱ्यांमार्फत हंगामाध्ये वेळोवळी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दर्जेदार व योग्य भावात निविष्ठा खरेदी करताना शेतकरी बांधवांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडून कृषि निविष्ठांची खरेदी करावी, बनावट/भेसळयुक्त बियाणे, खते, किटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पावतीसह निविष्ठा खरेदी करावी, खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेष्टन/पिशवी, टॅग, खरेदीची पावती बियाणे कापणी होईपर्यत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्यांची पाकीटे सिलबंद/मोहरबंद असल्याची खात्री करा. शेतक-यांनी कृषि निविष्ठा खरेदी करतेवेळी अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करून रितसर पावतीव्दारे कृषि निविष्ठांची अंतीम मुदत तपासुनच खरेदी करावी, शेतकऱ्यांनी संकरीत कापूस बियाण्याच्या बी जी २ विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये. सर्वच बी जी - २ कापूस वाणाची उत्पादन क्षमता सारखीच आहे. त्यासाठी योग्य मशागत पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. कमी वजनाच्या तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने निविष्ठा विक्री होत असल्यास तक्रारीसाठी कृषि विभागाचा टोल फ्रि क्रमांक १८००-२३३-४००० व ९८२२४४६६५५ या व्हॉटस्अॅप नंबरवर तसेच तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे तसेच विभाग, जिल्हा व तालुकास्तरीय कृषि निविष्ठा तक्रार निवारण कक्ष यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी करीता आपले स्वतःचे घरच्या बियाण्याची घरच्या घरी उगवण शक्ती तपासून व बिज प्रक्रिया करूना पेरणी करीता घरचे बियाणे वापरावे, जेणेकरून बियाणे खरेदीवर होणारा खर्च कमी होईल. शेतकऱ्यांनी १०० मी.मी. पाऊस झाल्याशिवाय तसेच जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये. शेतकऱ्यांनी गाव पातळीवर कुठल्याही अनधिकृत व्यक्तीकडून कोणत्याही कृषि निविष्ठा खरेदी करू नये व त्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नये. याव्दारे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. असा प्रकार आढळून आल्यास तात्काळ कृषि विभागाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांना गरजेचे व आवश्यक असणाऱ्या कृषि निविष्ठांसोबत इतर अनावश्यक कृषि निविष्ठांची लिंकींगव्दारे खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्यास तात्काळ कृषि विभागाशी संपर्क साधावा. बाजारात राऊंड अप बीटी/एचटीबीटी/बीजी ३ बीटी अशा प्रकारच्या कापूस बियाणेची खाजगी व्यक्तींमार्फत गावपातळीवर घरपोच विक्री होत असल्याचे विभागामध्ये प्रतीबंधीत कापूस बियाणे विक्री संदर्भात करण्यात आलेल्या कारवाई वरून निदर्शनास आले आहे. सदर बियाणे पाकीटावर उत्पादकाचे नाव, लेबल नसुन बिगर पावतीने शेतकऱ्यांना विक्री होत असल्याने बियाण्यात फसवणुक झाल्यास नुकसानीबाबत रितसर न्याय मागता येत नाही. त्यामुळे शेतकरी बाधवांनी अशा प्रकारे विक्री होणाऱ्या प्रतिबंधित कापूस बियाणे खरेदी करून स्वतःची फसवणुक करून घेऊ नये. कृषि निविष्ठाच्या आपल्या तक्रारीची माहीती प्रत्यक्ष / दूरध्वनी / इ - मेल / एस. एम. एस. / टोल फ्री क्रमांक १८०० - ४००० व व्हॉटस्अॅप नंबर ९८२२४४६६५५ तसेच आपले जिल्ह्यातील कृषि निविष्ठांच्या तक्रार निवारणासाठीचा भ्रमणध्वनी क्रमांक व जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथकातील सदस्यांचे भ्रमणध्वनी क्रमांकावर नोंदवीण्यात याव्यात. जेणेकरून प्राप्त तक्रारींची वेळेत दखल घेऊन कार्यवाही करणे शक्य होईल, असे आवाहन अमरावती विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हानिहाय संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहे : अमरावती विभागासाठी संजय पाटील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक, अमरावती ९४२३१३२६२६. बुलडाणा जिल्ह्यासाठी अरुण इंगळे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, बुलडाणा ८१०४७९२०६३. अकोल्यासाठी सतीश दांडगे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, अकोला ९७६६२७३५०७. वाशिम साठी आकाश इंगोले जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, वाशिम ९४२०३५३३०९ अमरावती जिल्ह्यासाठी सागर डोंगरे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, अमरावती ८७८८८२१७८०. यवतमाळसाठी कल्याण पाटील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक, यवतमाळ ९४२३४४३९०८ याप्रमाणे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. बि-बियाणे, खते व कृषि निविष्ठा संदर्भात काही तक्रार असल्यास उपरोक्त संपर्क क्रमांकावर शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे. 0000

बुधवार, १२ जून, २०२४

वलगाव येथील मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू

वलगाव येथील मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू अमरावती, दि. 11 : वलगाव येथील मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह येथे सन 2024-2025 या शैक्षणिक सत्रात एकूण 60 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठीचे अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन गृहपाल अनिल तसरे यांनी केले आहे. उच्चशिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे वसतीगृहात एकूण 60 विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावयाचा आहे. त्यात उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाचे 12 विद्यार्थी, कनिष्ठ महाविद्यालयातील 18 , महाविद्यालयातील 18 विद्यार्थी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे 12 विद्यार्थी याप्रमाणे प्रवेश देण्यात येईल. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे आर्थिक उत्पन्न 2023-24 मधील रुपये 1,00,000 (एक लाख रुपये ) चे आत आहे, अशा पाल्यांना गुणवत्तेनुसार व सामाजिक आरक्षणानुसार प्रवेश देण्यात येईल. प्रवेशित विद्यार्थ्यांची वसतीगृहामध्ये राहण्याची व जेवण्याची मोफत सोय केल्या जाईल. या सुविधेचा ईच्छूक व गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. वसतीगृहाचे प्रवेश अर्ज वसतिगृहाच्या कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 5 वाजेपर्यत विनामुल्य उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा विद्यालय, महाविद्यालयातील प्रवेश झाल्यापासून 10 दिवसाच्या आत वसतीगृह प्रवेश अर्ज सादर करावे. या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाचे गृहप्रमुखांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. 0000

बाल धोरण मसूदा ; सुधारणा, हरकती, सुचना मागविल्या

बाल धोरण मसूदा ; सुधारणा, हरकती, सुचना मागविल्या अमरावती, दि. 11 : महिला व बालविकास विभागातर्फे बाल धोरणाचा प्रारुप मसूदा तयार करण्यात आला आहे. तज्ज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने हा मसूदा तयार केला आहे. महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा 2022 असा हा मसूदा तयार आहे. हा मसूदा शासनाच्या https://womenchlid.maharashtra.gov.in व https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रस्तावित बालधोरण हे इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून त्यात आवश्यक बाबी, सुचना, सुधारणा, हरकती तसेच शब्दरचना, व्याकरण इ. संदर्भाने हरकती व सुचना नागरिकांकडून मागविण्यात आल्या आहेत. या सुचना नागरिकांनी दि.30 जून रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत महिला व बालविकास आयुक्तालय, 28 राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ, पुणे यापत्त्यावर अथवा childpolicy@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे. 0000

सोमवार, १० जून, २०२४

विभागीय लोकशाही दिनात 26 प्रकरणांवर सुनावणी प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा - उपायुक्त संजय पवार

विभागीय लोकशाही दिनात 26 प्रकरणांवर सुनावणी प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा -उपायुक्त संजय पवार अमरावती, दि. 10 : नागरिकांकडून प्राप्त अर्जावर विहित कालमर्यादेत कार्यवाही होणे आवश्यक आहे. प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यात यावा, तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित तक्रारदारांना कळविण्यात यावे, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजय पवार यांनी आज दिले. लोकशाही दिनात दाखल एकूण 26 प्रकरणांवर चर्चा करुन त्यानुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात आज श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. उपायुक्त राजू फडके, सहाय्यक आयुक्त गिता वंजारी, वैशाली पाथरे यांच्यासह कृषी, महापालिका, महसूल, सहकार, जलसंधारण व ऊर्जा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाव्दारे सादर करण्यात आलेल्या 5 स्वीकृत अर्ज व 21 अस्वीकृत अर्ज (सामान्य अर्ज) अशा एकूण 26 अर्जावर सविस्तर चर्चा आजच्या विभागीय लोकशाही दिनात झाली. यावेळी उपस्थित तक्रारदारांचे म्हणने ऐकूण घेण्यात आले. प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपायुक्त श्री. पवार यांनी संबंधित विभागांना दिले. 00000

अमरावतीत ‘नमो महारोजगार मेळाव्या’चे होणार भव्य-दिव्य आयोजन, रोजगार मेळाव्याच्या यशस्वीततेसाठी प्रभावी नियोजन करा -उपायुक्त संजय पवार

अमरावती, दि. 10 : विभागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी अमरावतीत आगामी महिन्यात ‘नमो महारोजगार मेळाव्या’चे भव्य-दिव्य आयोजन करण्यात येणार आहे. महारोजगार मेळाव्याच्या यशस्वीततेसाठी सर्व विभागांनी प्रभावी नियोजन करुन सक्रीय सहभाग नोंदवावा, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजय पवार यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपायुक्त श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार मेळाव्याच्या आयोजनासंबंधी पूर्व नियोजनाबाबतची बैठक सपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त दत्ता ठाकरे, सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर, एमआयडीसी असोशिएशनचे किरन पातुरकरयांच्यासह अन्य विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले की, विभागातील सुशिक्षित बेराजगारांना रोजगाराच्या संधी तसेच नवीन उद्योग-व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्यांसाठी विविध क्षेत्रातील स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन या मेळाव्यात करण्यात येणार आहे. उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती तरुणांना, आयटीआय, अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थींना या मेळाव्यात स्टॉल्सच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. रोजगार मेळाव्याची तारीख निश्चित करण्यासाठी शासनाकडे पत्र पाठविण्यात आले असून आगामी महिन्यात मेळाव्याची निश्चित तारीख व स्थळ जाहीर केल्या जाईल. रोजगार मेळाव्याच्या आयोजनाच्या अनुषंगाने सहभागधारक असणाऱ्या विभागांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या 6 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार त्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागांनी मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी आताच प्रभावी नियोजन करावे, असेही श्री. पवार यांनी सांगितले. नमो महारोजगार मेळाव्याच्या आयोजना मागची भूमिका उपायुक्त श्री. ठाकरे यांनी विशद केली. ते म्हणाले की, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच स्टार्टअप म्हणजे नवीन उद्योग व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांतून आर्थिक सहाय्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन राज्यातील सहाही महसूली विभागात करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रति मेळावा 5 कोटी रुपयांचा निधी विभागाला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या मेळाव्यातून राज्यातील किमान 2 लाख उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून तज्‍ज्ञ मार्गदर्शकांमार्फत मुलाखत पूर्व व करिअर मार्गदर्शन करणे, रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सहाय्य करणे, उमेदवारांना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता संबंधित विविध योजनांची माहिती देणे व मार्गदर्शन करणे, अल्प कालावधीच्या प्राथमिक प्रशिक्षण अभ्यासक्रमांबाबत मार्गदर्शन करणे आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले. श्रीमती बारस्कर म्हणाल्या की, या रोगार मेळाव्यात बँकिंग, लॉजीस्टिक, सेल्स मार्केटिंग, इन्सुरन्स, मॅन्युफॅक्चरिंग, हॉस्पिटॅलिटी, कम्युनिकेशन, अपारंपारिक उर्जा, आरोग्यसेवा आदी विविध क्षेत्रातील नामांकित कंपनी/ नियोक्ते, उद्योजक, व कारखानदार सहभागी होणार आहेत. मेळाव्याच्या अनुषंगाने शासकीय विभागांनी सुध्दा त्यांच्या आस्थापनेवरील रिक्त /अधिसुचित पदांची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाला सादर करावी. अंशकालीन उमेदवारांना बाह्यस्त्रोताव्दारे नियुक्तीही मेळाव्याच्या माध्यमातून देता येणार आहे. रोजगार मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक शासकीय विभागाचे काम महत्वपूर्ण आहे. मेळाव्याचे आयोजन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रत्येक विभागांनी समन्वय व नियोजनासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी. नमो महारोजगार मेळाव्याचा अमरावती विभागातील जास्तीत जास्त युवक-युवतींना लाभ मिळावा, यासाठी मेळाव्याबाबत व्यापक प्रचार प्रसिध्दी करावी, अशा सूचना सहाय्यक आयुक्त श्रीमती बारस्कर यांनी यावेळी दिल्या. मेळाव्याच्या आयोजनाबाबत निश्चित तारीख व वेळ यानंतरच्या बैठकीत जाहीर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 0000

गुरुवार, ६ जून, २०२४

इयत्ता 10 वीच्या गुणपत्रिकांचे 11 जूनला वितरण

इयत्ता 10 वीच्या गुणपत्रिकांचे 11 जूनला वितरण अमरावती, दि. 05 : मार्च 2024 मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांमार्फत मंगळवार दि. 11 जून 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता करण्यात येणार असून माध्यमिक शाळांमार्फत त्याच दिवशी दुपारी 3.00 वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व संबंधित मुख्याध्यापक व विद्यार्थी, पालकांनी याची नोंद घ्यावी, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावती विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव निलिमा टाके यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी ) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर दि. 27 जून 2024 रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे, असेही मंडळाव्दारे कळविण्यात आले आहे. 0000

बुधवार, ५ जून, २०२४

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 विभागातील चारही लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततेत

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 विभागातील चारही लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततेत अमरावती, दि. 4 : अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ-वाशिम व बुलडाणा या चार लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया संबंधित जिल्ह्यात आज (ता.4 जून) शांततेत पार पडली. विजयी झालेल्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी पुढीलप्रमाणे- अमरावती लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे हे विजयी झाले. त्यांना एकूण 5 लक्ष 26 हजार 271 मते मिळाली. अकोला लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनुप संजय धोत्रे हे विजयी झाले. त्यांना एकूण 4 लाख 57 हजार 30 मते मिळाली. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय उत्तमराव देशमुख विजयी झाले. त्यांना एकूण 5 लाख 94 हजार 807 मते मिळाली. बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार प्रतापराव गणपतराव जाधव हे विजयी झाले. त्यांना एकूण 3 लाख 49 हजार 867 मते मिळाली. 0000

मंगळवार, ४ जून, २०२४

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी व 8 वीसाठी प्रवेश अर्ज स्विकारण्यास 3 जूनपासून सुरुवात

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी व 8 वीसाठी प्रवेश अर्ज स्विकारण्यास 3 जूनपासून सुरुवात · प्रवेश अर्ज सादर करण्याची 15 जून अंतीम मुदत अमरावती, दि. 03 : महाराष्ट्र राज्य मुक्त मंडळामध्ये इयत्ता पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज दि. 3 जून ते 15 जून 2024 (रात्री 11.59 वाजेपर्यंत) या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणेचे सचिव माणिक बांगर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे- दि. 3 जून ते दि. 15 जूनपर्यंत विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज स्विकारले जाईल. विद्यार्थ्यांनी दि. 5 ते 18 जूनपर्यंत मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावीत. दि. 24 जूनला संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करणे अनिवार्य राहील. उपरोक्त नमूद कालावधीत मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेशासाठी http://msbos-mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच अर्ज भरतेवेळी संकेतस्थळावर दिलेल्या सूचना वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी, असेही मंडळाचे सचिव श्री. बांगर यांनी कळविले आहे. 00000

विभागीय आयुक्तालयात 10 जूनला विभागीय लोकशाही दिन

विभागीय आयुक्तालयात 10 जूनला विभागीय लोकशाही दिन अमरावती, दि. 03 : विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार येत्या सोमवारी दि. 10 जून रोजी सकाळी 11 वाजता विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आले आहे, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजय पवार यांनी पत्राव्दारे कळविले आहे. विभागीय लोकशाही दिनासाठी यापूर्वी प्राप्त तक्रारींचे निराकरण त्यात करण्यात येईल. विभागीय लोकशाही दिनात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी तसेच महिलांनी त्यांचे तक्रार अर्ज (तालुका, जिल्हा किंवा महापालिका लोकशाही दिनानंतर) विहित नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. नागरिकांनी तक्रार अर्ज dcgamravati@gmail.com किंवा dcg_amravati@rediffmail.com या ई-मेलवर विहित नमुन्यात पाठविण्याचे आवाहन आयुक्तालयाच्यावतीने करण्यात आले आहे. 00000