गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

विभागीय आयुक्तालयात सोमवारी लोकशाही दिन

 विभागीय आयुक्तालयात सोमवारी लोकशाही दिन

अमरावती, दि. 07 :  विभागीय लोकशाही दिन सप्टेंबर महिन्याच्या दुस-या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार येत्या सोमवारी (दि. 11 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात लोकशाही दिन होईल.

विभागीय लोकशाही दिनासाठी यापूर्वी प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. विभागीय लोकशाही दिनात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी तसेच महिलांनी आपले अर्ज (तालुका, जिल्हा किंवा महापालिका लोकशाही दिनानंतर) विहित नमुन्यात 15 दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. नागरिकांनी तक्रार अर्ज dcgamravati@gmail.com किंवा dcg_amravati@rediffmail.com या ई-मेलवर विहित नमुन्यात पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

००००००

11 सप्टेंबरला आयटीआय उर्त्तीणांसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

                                                  11 सप्टेंबरला आयटीआय उर्त्तीणांसाठी

प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

अमरावती, दि. 07 : मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्रद्वारा औघोगिक संस्था, अमरावती एन.एस.एस.हॉल अमरावती येथे PM National Apprenticeship Mela (PMNAN) अंतर्गत दि. 11 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यांत आला आहे.

            या भरती मेळाव्यात औरंगाबाद, पुणे  येथील व स्थानिक नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहेत. तरी अमरावती जिल्ह्यातील सर्व व्यवसायातील आय. टी. आय. उत्तीर्ण सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी आवश्यक मुळ कागदपत्रे व बायोडाटासह उपस्थित राहावे. या भरती मेळाव्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अंशकालीन प्राचार्य एस. के. बोरकर व सहाय्यक प्रशिक्षणाथी सल्लागार आर. जी. चुलेट यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

000000

विभागीय आयुक्त कार्यालयात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन


                                                                विभागीय आयुक्त कार्यालयात

राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

 

             अमरावती, दि.7 : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजय पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 यावेळी उपायुक्त गजेंद्र बावने, तहसीलदार वैशाली पाथरे, संतोष काकडे, नायब तहसीलदार मधुकर धुळे, श्याम देशमुख, संदीप टांक, अ. का. उध्दव काळे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

 

0000

सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी रविंद्र लाखोडे यांची निवड

 अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीच्या

अध्यक्षपदी रविंद्र लाखोडे यांची निवड

 

अमरावती, दि. 4 : अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष या पदावर दै. दिव्य मराठीचे उपसंपादक रविंद्र लाखोडे यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली.

वृत्तपत्रे, वृत्तसंस्था व प्रसार माध्यमांशी संबंधित व्यक्तींना राज्य शासनातर्फे अधिस्वीकृती पत्रिका देण्यासंबंधीचे कामकाज राज्य व विभागीय समितीव्दारे केल्या जाते. अमरावती विभागीय समितीवरील सदस्यांची निवड करुन समितीचे गठण नुकतेच राज्य शासनाने केले आहे. त्यानुसार अमरावती येथील विभागीय माहिती कार्यालयात अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीची अध्यक्ष निवडीसाठी प्रथम बैठक आज संपन्न झाली.

समितीचे सदस्य सर्वश्री जयराम आहुजा, गोपाल हरणे, सुरेंद्र आकोडे, राजेंद्र काळे, विभागीय माहिती उपसंचालक अनिल आलुरकर, जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, सहायक संचालक (माहिती) विजय राऊत, प्रदर्शन सहायक विश्वनाथ धुमाळ यावेळी उपस्थित होते.

अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य गोपाल हरणे यांनी सूचक म्हणून अध्यक्ष पदासाठी रविंद्र लाखोडे यांचे नाव सुचविले. त्यास सदस्य जयराम आहुजा यांनी अनुमोदन दिले. सदस्य सुरेंद्र आकोडे, राजेंद्र काळे यांनी श्री. लाखोडे यांच्या नावाला समर्थन दिले. त्यानुसार समितीच्या सर्व सदस्यांच्या सर्वानुमते श्री. लाखोडे यांची समितीच्या अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.

विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य सचिव तथा विभागीय माहिती उपसंचालक श्री. आलुरकर यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून नवनियुक्त अध्यक्ष श्री. लाखोडे यांचा सत्कार केला. यावेळी अन्य सदस्यांनीही श्री. लाखोडे यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

0000




शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

इयत्ता पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्जाबाबत सूचना

 

इयत्ता पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्जाबाबत सूचना

ऑनलॉईन नावनोंदणी अर्ज सादर करण्यासाठी 
http://msbos.mh-ssc.ac.in संकेतस्थळ उपलब्ध 

 

अमरावती दि. 1 :  महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या तसेच जानेवारी-फेब्रुवारी 2024 मध्ये होणाऱ्या मुल्यमापन सत्रासाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी प्रवेश अर्ज दि. 1 ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत.

ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.        

दि. 1 ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत. दि. 2 ते 20 सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे.  दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करावे.

इयत्ता पाचवी व आठवीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा तसेच अर्ज भरतेवेळी संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे अमरावती विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव निलिमा टाके यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले यांनी कळविले आहे.

 

000000

बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञान

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत

द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञान

 

अमरावती दि. 28 : द्राक्ष हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारे महत्वाचे फळपिक आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींपासून द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हर घटकाचा शासकीय योजनेंतर्गत समावेश करण्याबाबत शेतकरी तसेच लोकप्रतिनिधींद्वारे सातत्याने मागणी होती.

त्यानुसार राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर हा शंभर हेक्टर क्षेत्राचा प्रकल्प प्रमुख द्राक्ष उत्पादक जिल्ह्यांमध्ये राबविण्याकरिता शासनाकडून 22 मे 2023 च्या शासन निर्णयानुसार प्रायोगिक तत्वावर राबविण्याकरिता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार महाडिबीटी प्रणालीवर सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

योजनेचा उद्देश :

गारपीट व अवकाळी पाऊस यापासुन द्राक्ष बांगाचे संरक्षण करणे, शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतिच्या निर्यातक्षम द्राक्ष पिकांच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणे, फळबागांकरीता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकरीता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागातील युवकांना कृषि क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे हा योजनेचा उद्देश आहे.

योजनेची व्याप्ती : द्राक्ष उत्पादक 8 जिल्हे - नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर व सातारा या जिल्ह्यात योजनेची व्याप्ती राहील.

मंजूर कार्यक्रम : राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत रु.614.04 लाख (अक्षरी रु. सहा कोटी चौदा लाख चार हजार फक्त) रक्कमेच्या कार्यक्रमास मंजूरी असून क्षेत्र मर्यादा 20 गुंठे ते 1 एकर दरम्यान प्रति लाभार्थी लाभ देय राहील. रु. 4 लाख 81 हजार 344 प्रती एकर खर्चाचे मापदंड असून रु.2 लाख 40 हजार 672 प्रती एकर (खर्चाच्या 50 टक्के) अनुदान मर्यादा राहील.

नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.

आवश्यक कागदपत्रे : 7/12 उतारा (द्राक्ष पिकाच्या नोंदीसह), 8-अ, आधार कार्डाची छायांकीत प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमाती शेतकऱ्यांसाठी), विहीत नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र, चतु:सीमा नकाशा आदी कागदपत्रे योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्ययक राहील, असे कृषी विभागाने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

 

 

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

 

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

अमरावती दि. 28 :  1 जून ते दि. 28 ऑगस्ट या कालावधीचे राज्याचे सरासरी पर्जन्यमान 796.8 मिमी असून या खरीप हंगामात दि.28 ऑगस्ट 2023 पर्यंत प्रत्यक्षात 675.4 मिमी  (दि. 28 ऑगस्ट पर्यंतच्या सरासरीच्या 85%) एवढा पाऊस पडलेला आहे. 

            खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र 142 लाख हेक्टर असून दि.28 ऑगस्ट 2023 अखेर प्रत्यक्षात 139.84 लाख हेक्टर (98 टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. राज्यात पेरणीची कामे पुर्ण झालेली आहेत. आज दि.28.08.2023 रोजीपर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची 50.28 लाख हे. क्षेत्रावर, कापूस पिकाची 42.08 लाख हे. क्षेत्रावर, तूर पिकाची 11.15 लाख हे. मका पिकाची 9.00 लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच भात पिकाची 14.96 लाख हे. क्षेत्रावर पुर्नलागवड झाली आहे.

राज्यामध्ये दि.25 जुलै-2023 ते आज दि.28.08.2023 अखेर 484 महसूल मंडळामध्ये 15 ते 21 दिवसांचा तर 376 महसूल मंडळामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला आहे.

खरीप हंगाम 2023 करीता 19.21 लाख क्विं.बियाणे गरजेच्या तुलनेत प्राथमिक अंदाजानुसार 21.78 लाख क्विं.बियाणे उपलब्ध होते.  त्यानुसार राज्यात 19,72,182 क्विंटल (102%) बियाणे पुरवठा झालेला आहे.

खरीप हंगाम 2023 करिता राज्यास 43.13 लाख मे. टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून  आतापर्यंत 57.57 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध  झाला आहे. त्यापैकी 36.48 लाख मे.टन खतांची विक्री झालेली असून सद्यस्थितीत राज्यात 21.09 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी.

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या 1१ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   त्यापैकी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी 31 ऑगस्ट 2023 हि पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून  जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्त  श्रीसुनील चव्हाण यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना केले आहे. 

००००० 

इयत्ता पाचवी व आठवीचा मुल्यमापनचा अहवाल जाहीर

 

इयत्ता पाचवी व आठवीचा मुल्यमापनचा अहवाल जाहीर

अमरावती दि. 29 :  जुन, 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर) व इयत्ता आठवीच्या (उच्च प्राथमिक स्तर)  मुल्यमापनाचा ऑनलाईन निकाल गुरुवारी (ता. 24 ऑगस्ट) मंडळामार्फत जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मुल्यमापनामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा ! देण्यात आल्या आहेत. मुल्यमापन अहवालाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

मुल्यमापनाची वैशिष्टये :

इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर) व इयत्ता आठवी ( उच्च प्राथमिक स्तर) साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांकडून मूल्यमापन प्रक्रियेसाठी दि. 2 मे ते 9 मे 2023 या कालावधीत ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यात आली होती. इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर) व इयत्ता आठवी (उच्च प्राथमिक स्तर) मुल्यमापन दि. 20 जून ते 30 जून 2023 या कालावधीत घेण्यात आलीत.

सदर मुल्यमापनासाठी राज्यातील पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व लातूर या सात विभागीय मंडळामधून एकूण संपर्क केंद्रावर एकूण 90 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यातील विद्यार्थ्यांनी मूल्यमापनासाठी इयत्ता पाचवीची 22 मुले, 13 मुली अशी  एकुण 35 तर इयत्ता 8 वीसाठी 37 मुले, 14 मुली अशी एकुण 51 आवेदनपत्रे भरली होती. त्यापैकी इयत्ता पाचवीसाठी 35 विद्यार्थी व इयत्ता आठवीसाठी 51 विद्यार्थी असे एकूण 86 विद्यार्थी प्रत्यक्ष मुल्यमापनासाठी प्रविष्ठ झाली होती. सदर विद्यार्थ्यांचे अंतिम मुल्यमापनानुसार इयत्ता पाचवीसाठी 35 विद्यार्थी व इयत्ता आठवी साठी 51 विद्यार्थ्यांनी अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केले असून त्याची टक्केवारी 100 टक्के आहे.

विषयांची संख्या :

इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीकरिता सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनासाठी विषयांची संख्या अनुक्रमे 11 व 26 होती. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता मुल्यमापनासाठी विषयांची संख्या अनुक्रमे 12 व 27 होती. दिव्यांग इयत्ता पाचवीसाठी 10 मुलं व 6 मुली 6 तसेच इयत्ता आठवीसाठी  15 मुले व 6 मुली विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिनांक 16 ऑक्टोबर 2018 च्या शासन निर्णयानुसार अनुषंगिक सर्व सवलती देण्यात आलेल्या आहेत.

निकालाची कार्यपध्दती :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या जुन, 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर) व इयत्ता आठवी (उच्च प्राथमिक स्तर) च्या मूल्यमापनामध्ये प्रविष्ठ विद्यार्थ्यांचा ऑनलाईन निकाल www.msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर गुरूवार दि. 24 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 1.00 वाजता जाहीर करण्यात आला असून उपरोक्त नमूद संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची विषयनिहाय श्रेणी दर्शविण्यात आली आहे. विद्यार्थ्याला सदर माहितीची प्रिंट (Printout) घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांना त्यांनी इयत्ता पाचवी/इयत्ता आठवी पर्यंतची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र यथावकाश वितरित करण्यात येईल.

निकालाची सर्वसाधारण माहिती :

विभागीय मंडळनिहाय निकालाची माहिती इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर) मूल्यमापन जून, 2023

अमरावती विभागीय मंडळ मुल्यमापनासाठी नोंदणी झालेले विद्यार्थी 1 आहे. मूल्यमापनास प्रविष्ठ विद्यार्थी 1 आहे. अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त विद्यार्थी 1 आहे. टक्केवारी 100 आहे.

विभागीय मंडळनिहाय निकालाची माहिती इयत्ता आठवी (प्राथमिक स्तर) मूल्यमापन जून, 2023

अमरावती विभागी मंडळ मूल्यमापनासाठी नोंदणी झालेले विद्यार्थी 2 आहे. मूल्यमापनास प्रविष्ठ विद्यार्थी 2 आहे. अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त विद्यार्थी 2 आहे तसेच टक्केवारी 100 आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मुक्त मंडळ पुणे यांचेव्दारे प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

0000

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचा कालावधी जाहीर सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर उपलब्ध

 

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचा कालावधी जाहीर

सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर उपलब्ध

 

अमरावती दि. 28 : फेब्रुवारी व मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.दहावी) च्या लेखी परीक्षांचा कालावधी शिक्षण मंडळाव्दारे जाहीर करण्यात आला आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बुधवार, दि. 21 फेब्रुवारी ते शनिवार, दि. 23 मार्च 2024 दरम्यान होणार आहे. तसेच  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा शुक्रवार दि. 01 मार्च ते शुक्रवार दि. 22 मार्च 2024 दरम्यान होणार आहे.

उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दि. 28 ऑगस्ट 2023 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

शाळा/कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2024 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. इयत्ता बारावी व इयत्ता दहावीच्या परीक्षा प्रचलित पध्दतीनुसार आयोजित करण्यात येतील याची सर्व कनिष्ठ महाविद्यालये व माध्यमिक शाळा, विद्यार्थी, शिक्षक, पालक व संबंधीत घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल.

सदर वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे 15 दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. तद्नंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही, असे राज्यमंडळ पुण्याच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

खरीप हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

 खरीप हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट

शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

 

 

अमरावती, दि. 28: जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा, यासाठी पिक स्पर्धा खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त कृषी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

 

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या 11 पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

        पिकस्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी :

•         पीकस्पर्धेसाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे.

•         स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.300 व आदिवासी गटासाठी रक्कम रु. 150 राहिल.

•         स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी  शेतकऱ्याकडे स्‍वतःच्‍या  नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे  आवश्‍यक आहे. स्पर्धेत भाग घेणा-या शेतक-याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.

 

•         पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेसाठी  सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची  भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर (1 एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

•         पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतक-यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

 

 

अर्ज कोठे करावा व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -

१) विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)

२) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन

३) 7/12, 8-अ चा उतारा

४) जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)

५) पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा

६) बँक खाते चेक, पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

 

 पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरूप-  सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम याप्रमाणे :  तालुका पातळीवर पहिले बक्षिस 5 हजार रूपये, दुसरे बक्षिस 3 तीन हजार रूपये, तिसरे बक्षिस 2 हजार रूपये, जिल्हा पातळीवर पहिले बक्षिस 10 हजार रूपये, दुसरे बक्षिस 7 हजार रूपये, तिसरे बक्षिस 5 हजार रूपये, तसेच राज्यपातळीवर पहिले बक्षिस 50 हजार रूपये, दुसरे बक्षिस 40 हजार रूपये व तिसरे बक्षिस 30 हजार रूपये याप्रमाणे वितरीत करण्यात येईल.

 

खरीप हंगाम सन 2023 पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्त कृषी सुनील चव्हाण यांनी केले आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

00000