सोमवार, ८ जानेवारी, २०२४

विभागीय माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

 

विभागीय माहिती कार्यालयात

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

 

अमरावती, दि. 6 : ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार दिनानिमित्त विभागीय माहिती कार्यालयात सहायक संचालक (माहिती) विजय राऊत यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            वरिष्ठ लिपीक योगेश गावंडे, मनोज थोरात, नितीन खंडारकर, मनीष झिमटे, गजानन पवार, राजश्री चौरपगार आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीही आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.

00000

शुक्रवार, ५ जानेवारी, २०२४

रिध्दपूर येथील थीम पार्कची पालकमंत्र्यांकडून पाहणी

 मराठी विद्यापीठ येत्या जूनपासून सुरु होणार

- पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 








रिध्दपूर येथील थीम पार्कची पालकमंत्र्यांकडून पाहणी

 

अमरावती, दि. 4 (जिमाका): रिध्दपूर येथे येत्या जूनपासून सुरु होणाऱ्या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने करावयाच्या कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज रिध्दपूर येथे दिले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी आज रिध्दपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी थीम पार्क परिसराची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. नियोजित मराठी भाषा विद्यापीठ समिती सदस्य महंत कारंजेकर बाबा, गोविंद्रप्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे सचिव महंत वाईंदेशकर तसेच मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार, तहसीलदार नरेश आकनुरी, गोविंद गुरुकुल आश्रम शाळेचे सचिव सुभाष पावडे, मुख्याध्यापक संजय कोहळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मराठी भाषा विद्यापीठाची प्रस्तावित जागा थीम पार्कची पाहणी करताना श्री. पाटील म्हणाले की, येत्या जून 2024 पासून मराठी भाषा विद्यापीठ सुरु करण्यात येईल. त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी. विद्यापीठ स्थापनेच्यादृष्टीने अभ्यासक्रम, कुलगुरुंची निवड, विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोई-सुविधा तसेच आवश्यक बाबींची पुर्तता लवकरात लवकर करण्यात यावी. या विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी विशेष कॅम्पेन आयोजित करण्यात यावे. विद्यार्थी निवडीचे निकष, अभ्यासक्रम आदींबाबत लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांना दिले. येथील म्हाइंभट सभागृह, ज्ञानकेंद्र, भक्तनिवारा आदींची पाहणीही श्री. पाटील यांनी यावेळी केली.

मराठी भाषा विद्यापीठ सुरु व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे योगदान अमुल्य आहे. त्यांच्या अमुल्य भाषिक योगदानामुळे मराठी साहित्याची गंगोत्री रिध्दपूर ठरली आहे. यामुळे रिध्दपूर ही महानुभाव पंथाची सोबतच मराठी भाषेचीही काशी आहे. 'लिळाचरित्रा'सारखा आद्य ग्रंथ जेथे लिहिला गेला त्या स्थानाचे महत्त्व लक्षात घेऊन शासनामार्फत येत्या जूनपासून रिध्दपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ सुरु करण्यात येणार आहे. मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगारक्षम कसे होतील, याचाही विचार करण्यात आला असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी श्री गोविंद गुरुकुल आश्रम विद्यालय परिसरातील आद्य मराठी गद्य ग्रंथ लिळाचरित्राचे निर्मिती स्थान, वाजेश्वरी येथील दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी राजमठ मंदिरात श्री गोविंदप्रभू यांचे दर्शन घेतले. तसेच गोपीराज ग्रंथ संग्रहालयातील पुरातन पोथ्यांची पाहणी केली. येथील हस्तलिखित पोथ्या सातशे वर्षांपूर्वीच्या आहेत. येथील सहाशे वर्षापूर्वींच्या संत महात्म्यांच्या वापरातील कापडी भांडी, गाठी यांचीही पाहणी करुन येथील प्राचीन वस्तू आणि ग्रंथसंपदेचे जतन करण्याबाबतचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

0000


आदिवासी व सर्वसाधारण क्षेत्रातील विकास कामे तातडीने पूर्ण करा - पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील






 आदिवासी व सर्वसाधारण क्षेत्रातील विकास कामे तातडीने पूर्ण करा

- पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राज्य व जिल्हा परिषदस्तरीय प्रमुख

कार्यान्वयन यंत्रणांच्या विकास कामांचा आढावा

 

अमरावती, दि. 4 (जिमाका): आदिवासी घटक योजनेंतर्गत जिल्हा परिषद, विद्युत विभाग, बांधकाम विभाग, महिला व बाल कल्याण विभाग यांनी सन 2022-23 मधील आदिवासी क्षेत्रातील विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे दिले.

पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्री. व्यवहारे, मनपा आयुक्त देविदास पवार, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आदिवासी क्षेत्रात शासकीय विभागांच्या विविध योजना पोहोचविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत तरतूद करण्यात येते. त्याअंतर्गत आदिवासी घटक योजनेतील सर्व विभागांनी सन 2022-23 ची कामे लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी निर्धारित काळात निधी खर्च करुन विकास कामे पूर्ण करावीत. नजिकच्या काळात या विकास कामांची पाहणी करण्यात येईल. पाहणीच्यावेळी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच संबंधित यंत्रणाचे विभागप्रमुख उपस्थित राहतील, असे पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले.

सर्वसाधारण योजनेंतर्गत वन विभागाच्या विविध विभागांचा यावेळी आढावा घेतला. आदिवासी विभागातील पेसांतर्गत निधी, कृषी पंपाची विद्युत जोडणी, अमृत आहार योजना आदी विविध योजनांबाबत यावेळी माहिती घेण्यात आली. वन्यजीव व्यवस्थापन व निसर्ग संवर्धन कामे करताना वन विभागाने जिओ टॅगिंग करावे. जेणेकरुन वन विभागामार्फत करण्यात आलेली विकास कामे नागरिकांना ऑनलाईन बघता येईल. येत्या काळात आदिवासी विभागातील कोणत्याही दोन तालुक्यांची निवड करुन त्यांना प्रत्यक्ष भेट देण्यात येईल. त्या अनुषंगाने वन विभागातील विकास कामांचा आढावा प्रशासनामार्फत घेण्यात येईल.  केंद्र शासनाकडे वन विभागाचा प्रलंबित विकास कामांचा प्रशासनामार्फत पाठपुरावा करावा, असे श्री. पाटील म्हणाले.

जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 अंतर्गत वनविभागाच्या पाचही विभागाचा यावेळी आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे सन 2023-24 वरील प्राप्त निधी व खर्चाचा आढावाही यावेळी घेण्यात आला. तसेच सन 2023-24 चा निधी विहित कालावधीत खर्च होईल, ही दक्षता संबंधित विभागाने घ्यावी, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.

00000

‘मेळघाट हाट’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण;

 ‘मेळघाट हाट’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण;

महिला सशक्तीकरणासाठी अभिनव उपक्रमांना प्रोत्साहन द्या

- पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 

            अमरावती, दि. 4 (जिमाका):  मेळघाट क्षेत्रातील स्वयं सहाय्यता महिला बचत गटांच्या उत्पादनाला ‘मेळघाट हाट’ विक्री केंद्राच्या माध्यमातून उत्पादित वस्तू व साहित्याला हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी अशा अभिनव उपक्रमांना सर्व स्तरावरून प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी येथे केले.

 

            जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सायन्सकोर हायस्कुलच्या प्रांगणात महिला बचत गटांचे उत्पादन विक्री केंद्राचे उद्धाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी सुनील सोसे आदी यावेळी उपस्थित होते.

 

            पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, मेळघाट हाटच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रातील उत्पादित साहित्याला हक्काचे विक्री केंद्र मिळाले आहे. या मॉलच्या माध्यमातून उत्पादित वस्तू थेट ग्राहकांना विक्री करुन बचत गटातील महिलांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. या ठिकाणी ग्राहकांना वनौषधी, बांबूंपासून बनविलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, जंगली मेवा, मध यासारख्या वस्तूंची खरेदी करता येईल. आदिवासी महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन आदिवासी क्षेत्रात जास्तीत-जास्त बचत गटांचे जाळे निर्माण करावे. महिलांची कला-कौशल्ये तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन वाढवून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रशासनासोबतच स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

            विक्रीसाठी आणलेल्या साहित्यांना योग्य भाव मिळण्यासाठी विक्री साहित्याचे उत्तम मार्केटिंग, पॅकिंग व ब्रँडिंग करणे आवश्यक आहे. यासाठी महिला बचत गटांना प्रशिक्षित करावे. उत्पादित मालांना राज्यसह देशात बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येईल. मेळघाट क्षेत्रातील महिला बचत गटांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यकतेनुसार कर्ज पुरवठा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिली.

 

            मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंडा यांनी प्रास्ताविकेत मेळघाट हाटबाबत माहिती दिली. मेळघाटातील धारणी तसेच चिखलदरा तालुक्यातील स्वयंसहाय्यता महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी मेळघाट हाट विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे एकाच छताखाली मेळघाटातील उत्पादित केलेल्या 47 प्रकारच्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. प्रथम टप्प्यात एकूण 60 स्वयंसहाय्यता महिला बचत गटांच्या उत्पादनाचा समावेश करण्यात आला आहे. त्यात बांबूपासून निर्मित विविध उत्पादनांसह तृणधान्यांमध्ये सावा, कुटकी, ज्वारी, बाजरी तसेच कडधान्य, गहू, लाल तांदुळ, तूर दाळ, विविध प्रकारची लोणची, चिखलदऱ्यात उत्पादित होणारी प्रसिध्द कॉफी, मध, तूप, गृहशोभेच्या वस्तू, आरोग्याच्या दृष्टिकोनातून पौष्टिक खाद्यान्ने असे विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. येथे गोदाम, पॅकेजिंग, लेबलिंग युनिटसह ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आधुनिक पद्धतीच्या मॉल विक्री केंद्राचे स्वरूप देण्यात आले आहे.

            कार्यक्रमाची सुरुवातीला आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर मेळघाट हाट उद्घाटनाच्या कोनशिलेचे अनावरण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी मेळघाट हाट मॉलमधील विक्री साहित्याची पाहणी करून याबाबत महिला बचत गटांच्या महिलांकडून माहिती जाणून घेतली. तसेच विविध वस्तूंची खरेदीही केली. कार्यक्रमाचे संचालन व आभार शिप्रा मानकर यांनी मानले.

0000






मनुष्यबळाच्या सांख्यकीय माहितीचे विवरण सादर करा

 

मनुष्यबळाच्या सांख्यकीय माहितीचे विवरण सादर करा

          अमरावती, दि. 05 :  अमरावती विभागातील  अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये मनुष्यबळाचा सांख्यकीय माहितीचे त्रैमासिक विवरणपत्र दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करावी, असे आवाहन कौशल, विकास, रोजगार व उद्योजकता  उपआयुक्त द. ल. ठाकरे यांनी  केले आहे.

सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणा-या आस्थापनांनी त्याच्या आस्थापनेवर कार्यरत असणा-या सर्व कर्मचा-यांची             (एकुण स्त्री/पुरुष) अशी सांख्यीकी माहीती प्रत्येक तिमाहीस, सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 तरतुदीनुसार विहीत नमुना ईआर-१ (ER-१) मध्ये नियमीतपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक व सक्तीचे आहे.

त्या अनुषंगाने माहे डिसेंबर २०२३ अखेर संपणा-या तिमाहीची नमुना ईआर-१ (ER-१) मधील त्रैमासिक सांख्यीकीय माहीती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशिम या कार्यालयाव्दारे चालु असून, अमरावती विभागातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांकडुन शंभर टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकतस्थळावर नोदणीकृत सर्व आस्थापनांना यापुर्वीच प्राप्त युझर नेम व पासवर्डचा वापर करुन www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आपल्या लॉगीन मधून माहे डिसेंबर 2023 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करावे.        विवरणपत्र सादर करण्याचे अंतीम दि. 31 जानेवारी 2024 हे आहे. याची सर्व आस्थापनांनी नोंद घेऊन तिमाही विवरणपत्र विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे व कायद्याचे अनुपालन करुन सहकार्य करावे.

प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी तपशील (Employer Profile) मधील आवश्यक सर्व माहीती नोदवून तात्काळ अद्यावत करावा तसेच त्रैमासिक विवरणपत्र ईआर-१ (ER-१) किंवा आपला नोंदणी तपशील अद्यावत करताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास स्थानिक जिल्हा कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन उपआयुक्त श्री. ठाकरे यांनी केले आहे.  

00000

8 जानेवारीला प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळावा

 

8 जानेवारीला प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळावा

          अमरावती, दि. 05 :  मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती एन. एस. एस. हॉल अमरावती येथे PM National Apprenticeship Mela (PMNAM) अंतर्गत दि. 8 जानेवारीला  सकाळी 10.00 वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. भरती मेळाव्यात स्थानिक नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहेत तरी अमरावती जिल्ह्यातील सर्व व्यवसायातील आय. टी. आय. उत्तीर्ण सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी आवश्यक मुळ कागदपत्र व बायोडाटासह या रोजगार मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्र. सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, आर. जी. चुलेट यांनी केले आहे.

00000

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

विभागीय आयुक्तालयात 8 जानेवारीला विभागीय लोकशाही दिन

 विभागीय आयुक्तालयात 8 जानेवारीला विभागीय लोकशाही दिन

          अमरावती, दि. 04 :  विभागीय लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या दुस-या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार येत्या सोमवारी (दि. 8 जानेवारी रोजी) सकाळी 11 वाजता विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आले आहे.

विभागीय लोकशाही दिनासाठी यापूर्वी प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. विभागीय लोकशाही दिनात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी तसेच महिलांनी त्यांचे तक्रार अर्ज (तालुका, जिल्हा किंवा महापालिका लोकशाही दिनानंतर) विहित नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. नागरिकांनी तक्रार अर्ज dcgamravati@gmail.com किंवा dcg_amravati@rediffmail.com या ई-मेलवर विहित नमुन्यात पाठविण्याचे आवाहन आयुक्तालयाच्यावतीने करण्यात आले आहे.  

00000

बुधवार, ३ जानेवारी, २०२४

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

 



क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

 

            अमरावती, दि. ०३ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

   उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावने, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, विशेष कार्य अधिकारी हर्षल चौधरी, नायब तहसीलदार मधुकर धुळे यांचेसह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीही स्व. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली..

 

रविवार, ३१ डिसेंबर, २०२३

स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

 







स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

 

 

            मुंबई, दि. 31 : प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

 

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज ‘स्वच्छ माझा महाराष्ट्र’ या महास्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, माजी आमदार राज पुरोहित, उद्योगपती नादीर गोदरेज, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, डॉ. सुधाकर शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

महास्वच्छता अभियान राज्यभर

 

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यानंतर हे अभियान मुंबई शहरात राबवले. या अभियानाचा परिणाम खूप चांगला आहे. त्यामुळे हे अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येणार आहे. स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियानासाठी एक कार्य प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. या अभियानात लोकांना सहभागी करून घेण्यात यावे.

 

स्वच्छता अभियान लोकचळवळ झाली

 

            मुंबई शहरात सुरू केलेल्या या अभियानात शाळा, महाविद्यालय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध प्रतिष्ठान सहभागी होत आहेत. यामुळे या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप येत आहे. मुंबई डीप क्लीन ड्राईव्हचे एक मॉडेल तयार झाले आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज येथे सांगितले.

 

मुंबईत अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविणार

 

            विकास प्रकल्पामुळे तोडाव्या लागलेल्या झाडांचे पुनर्रोपण करणार आहे. मुंबईत रिकाम्या जागेवर झाडे लावली जाणार आहेत. मुंबई शहरात अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविण्यासाठी विचार सुरू आहे. ठाणे शहरातील कोपरी परिसरापासून गायमुख पर्यंत ग्रीन पॅच तयार केला जात आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

 

स्वच्छता कर्मचारी मुंबईचा खरा हिरो

 

            मुंबई शहरातील स्वच्छता कर्मचारी खरा हिरो आहे. कारण ते सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतात. मुंबई स्वच्छ ठेवतात. या कर्मचाऱ्यांच्या वसाहती स्वच्छ ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सफाई कर्मचारी यांना विमा सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सफाई कर्मचारी यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

 

 

स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवा, लोकप्रतिनिधींना सूचना

 

            मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र नेले जाणार आहे. हे अभियान आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध लोकप्रतिनिधींना केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे आमदार विद्या ठाकूर, आशिष शेलार, यामिनी जाधव, भारती लव्हेकर, प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, कालिदास कोळंबकर यांच्याशी संवाद साधला.

 

            तत्पूर्वी महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी मुंबई शहरात राबवल्या जात असलेल्या डीप क्लीन ड्राईव्हबाबत माहिती दिली. यावेळी स्वच्छता कर्मचारी संदीप पवार, शीला जाधव, मच्छिंद्र सावंत, स्वप्नील शिरवाळे, अर्चना मोरे यांचा सत्कार करण्यात आला.   अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी आभार मानले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. स्वच्छता कामात उपयोगी ठरणाऱ्या वाहनांच्या संचलनास हिरवा झेंडा दाखवून सुरवात केली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी वीर माता जिजाबाई भोसले उद्यान, सदानंद धवन उद्यान, भोईवाडा येथे भेट देऊन सफाई कर्मचारी व मुलांशी संवाद साधला.

0000