शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024; जिल्ह्यातील मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन

 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024;

जिल्ह्यातील मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन

          अमरावती, दि. 23 (विमाका) : जिल्हा नियोजन विभागातर्फे, सन 2024 च्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुररस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दि. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित मस्के यांनी केले आहे.

             गणेशोत्सवास दिनांक 7 सप्टेंबर रोजी सुरुवात होत आहे. नोंदणीकृत अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेची माहिती आणि अर्ज http://pldeshpandekalaacademy.org  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. जिल्हा नियोजन विभागाच्या दि. 31 जुलै 2024 च्या शासन निर्णयामध्ये स्पर्धा निवडीचे निकष, अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अर्जाच्या नमुन्यानुसार स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या Mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर अर्ज सादर करावा.

00000

राज्यातील शेतकरी बांधवांनी परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवास भेट द्यावी





राज्यातील
 शेतकरी बांधवांनी परळी वैजनाथ

राज्यस्तरीय कृषी महोत्सवास भेट द्यावी

     

अमरावती, दि. 23 : बदलत्या परिस्थितीत शेतक-यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यास अनन्यसाधारण महत्व आहे. प्रयोगशील व प्रगतीशील शेतक-यांचे माध्यमातून शेतक-यांना आपआपसातील विचारांची  देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वृध्दींगत होऊ शकतो. आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा शाश्वत पध्दतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या उन्नत होऊन जागतिक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिध्द करु शकतील. याकरीता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली  21 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत मौजे परळी वै. जि. बीड  येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या  कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री                   शिवराजसिंहजी चौहान (मंत्री, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संजय बनसोडे, (मंत्री, क्रीडा व युवक कल्याण बंदरे) यांच्या शुभहस्ते होणार आहे. याशिवाय इतर संसद सदस्य, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, कृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचावे, शासकीय योजनांची माहिती शेतक-यापर्यंत  पोहोचावी, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत व्हावी व शेतमालाला चांगला बाजार भाव मिळावा तसेच शेतकरी व वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा म्हणून या प्रदर्शनात 400 पेक्षा जास्त दालने लावण्यात येणार आहेत. तसेच परिसंवाद, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठाची दालने, विविध संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, प्रक्रिया उद्योग यांचे विशेष सादरीकरण होणार आहे. सदरील पाच दिवसाच्या कालावधीमध्ये पौष्टीक तृणधान्य महोत्सव, सेंद्रीय शेती दालन, खरेदीदार विक्रेता संमेलन, पशू प्रदर्शन, ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक, रानभाजी महोत्सव, धान्य व इतर शेतीमाल प्रदर्शन व विक्री, शेती निगडीत औजारे खरेदी विक्री दालन व कृषि उत्पादने, स्वयं सहाय्य महिला बचत गट निर्मित वस्तू /पदार्थ विक्री भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवात पाच लाखापेक्षा जास्त शेतकरी भेट देतील असे नियोजन करण्यात आलेले आहे.

मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्य साधारण महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश असतो. रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्या, फळभाज्या, कंदभाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरिराला आवश्यक असणारे पौष्ठिक अन्नघटक व औषधी गुणधर्म असतात. तसेच सदर रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक/बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे पुर्णपणे नैसर्गिक असल्याने या संपत्तीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. त्यांचे आरोग्य विषयक महत्व व माहिती जास्तीत जास्त ग्रामिण तसेच शहरीभागातील नागरिकांना होणेसाठी व विक्री व्यवस्था करुन रानभाज्यांच्या विक्रीतून शेतकऱ्यांनाही काही आर्थिक फायदा होणेसाठी लोकांमध्ये याबाबत जनजागृती करणेसाठी रानभाज्यांचे प्रदर्शन देखील या कृषी महोत्सवामध्ये आयोजित करण्यात आले आहे.






या महोत्सवात कृषी संलग्न विभागांचाही सक्रिय सहभाग असणार आहे.तरी 
राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी कृषी महोत्सवास भेट देऊन लाभ घेण्याचे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील शेतकरी बांधवाना केले आहे.

000000 

मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४

पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेंतर्गत अर्ज स्विकृतीस मुदतवाढ

 पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले 

योजनेंतर्गत अर्ज स्विकृतीस मुदतवाढ

     

अमरावती, दि. 20 : शैक्षणिक वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षात पंडीत दिनदयाल दपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत अर्ज स्विकृतीस उच्च शिक्षणाच्या द्वितीय, तृतीय, चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत तसेच प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 15 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक विजय साळवे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन मध्ये शासनाने निर्धारित केलेल्या व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थ्याकरीता वसतिगृह योजनेपासुन वंचित असलेल्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहु नये यासाठी शासन निर्णयान्वये आदिवासी विकास विभागाच्या स्वतंत्र योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र वसतिगृह निर्वाह भत्ता लागू केलेला आहे.

उच्च शिक्षणाचे द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षासाठी अर्ज स्विकारण्याची दि. 5 जुलै 2024 व अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दि. 30 सप्टेंबर 2024 तर निवड यादी जाहीर करण्याचा दि. 15 ऑक्टोबर 2024 राहील. तसेच उच्च शिक्षणाचे प्रथम वर्ष दि. 5 ऑगस्ट 2024 व अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दि. 15 आक्टोबर 2024 तर निवड यादी जाहीर करण्याचा दि. 30 ऑक्टोबर 2024 राहील.

तसेच संबंधित विद्यार्थ्यांनी शासन निर्णय दि. 6 सप्टेंबर 2019 मध्ये नमुद अटी व शर्तीची पूर्तता परीपूर्ण प्रस्ताव संबंधित जिल्ह्याचे सहायक संचालक व इतर मागास बहुजन कल्याण यांचेकडे सादर करण्यात यावे, असेही आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक विजय साळवे यांनी केले आहे.

000000


राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्तांनी दिली ‘सद्‌भावना दिवस’ प्रतिज्ञा

                                                             





राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त

उपायुक्तांनी दिली ‘सद्‌भावना दिवस’ प्रतिज्ञा

 

अमरावती, दि. 20: माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या 80 व्या जयंतीनिमित्त उपायुक्त गजेंद्र बावने यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘सद्‌भावना दिवस’ प्रतिज्ञा दिली.

जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची प्रतिज्ञा उपायुक्तांनी यावेळी उपस्थितांना दिली.

यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील नायब तहसीलदार श्याम देशमुख व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

0000

शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ ; लाडक्या बहिणींच्या जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे हीच या भावाची इच्छा - मुख्यमंत्री

 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ;


बहिणींच्या आनंदसोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी


लाडक्या भावाकडून रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण


लाडक्या बहिणींच्या जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे हीच या भावाची इच्छा - मुख्यमंत्री









 

            पुणे, दि. 17: महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा अहेर मिळणार आहे, अशा भावपूर्ण शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या

            म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछपत्रपती क्रीडानगरी येथे झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे आदी उपस्थित होते.

            आजचा दिवस लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे असे नमूद करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाखो बहिणी मिळाल्या याचा मनापासून आनंद आहे. त्यांचे प्रेम ही जीवनातील मोठी शिदोरी आहे. या योजनेसाठी पूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन करण्यात आले आहे. या दीड हजार रुपयांचे मोल गरजू बहिणींसाठी खूप आहे. त्यांना या रकमेतून कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासोबत आर्थिक उन्नती साधता येईल. आता मदतीसाठी कुणासमोर हात फैलावे लागणार नाही.

            महिलांना योजनेचे अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याची एकत्रित रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. काही महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडले गेल्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. प्रत्येक पात्र भगिनीला योजनेचा लाभ दिला जाईल. लाखो बहिणींच्या खात्यात दर महिन्याला निश्चित रक्कम जाईल याचे खूप समाधान आहे, अशा शब्दात श्री. शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. भावालाही मदत करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. जनतेची सेवा हेच शासनाचे ध्येय असून प्रत्येक योजना यादृष्टीनेच गतीने राबविण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

            महिला लखपती झालेल्या बघण्याची, त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्याची शासनाची इच्छा असून महिलांच्या विकासाच्या योजना राबविण्यासाठी हात आखडता घेतला जाणार नाही, बहिणींच्या हितासाठी शासन आवश्यक ते सर्व प्रकारचे प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

 

 

*महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू - देवेंद्र फडणवीस*


राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी असा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाही वेगाने वाढणार असून महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मार्च २०२५ पर्यंतची तरतूद केली असून पुढेही दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल, असेही ते म्हणाले.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, आजचा हा सावित्रींच्या लेकींचा कार्यक्रम आहे. पुणे ही समाजकारणाची आणि परिवर्तनाची भूमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरूवात पुण्यापासून केली जात आहे. हे सरकार बहिणींना लाभ देणारे सरकार आहे. १ कोटी ३ लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे कार्यक्रमापूर्वीच जमा झाले आहेत. ऑगस्टमध्ये ज्या महिलांच्या अर्जाची छाननी होईल, त्यांना जुलैपासूनच लाभ मिळेल. सप्टेंबरमध्ये ज्या महिलांच्या अर्जांची छाननी होईल, त्यांनाही जुलैपासूनच लाभ मिळेल. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि सचिव अनुपकुमार यादव यांच्या नेतृत्वात अतिशय गतीने योजनेचा लाभ देण्याचे काम झाले आहे.

            विकसित भारत करणे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे. महिलांचा विकास झाला, तरच भारत विकसित होऊ शकतो असे प्रधानमंत्री कायम म्हणतात. त्यामुळेच केंद्र आणि राज्यात आम्ही स्त्रीकेंद्रित योजना सुरू केल्या. लखपती दिदी, लेक लाडकी, शिक्षण शुल्क माफी योजना आणि लाडकी बहीण योजना या दृष्टीकोनातूनच सुरू करण्यात आल्या गेल्या. राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी, असा आमचा प्रयत्न आहे. 

            ही योजना म्हणजे आम्ही महिलांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. ही रक्षाबंधनानिमित्त दिलेली ओवाळणी आहे. आईचं आणि बहिणीचं प्रेम जगातील कोणतीही संपत्ती विकत घेऊ शकत नाही. माझ्या माय माऊलीला पंधराशे रुपयांचे मोल समजते, असेही ते म्हणाले.


रक्षाबंधन सणानिमित्ताने भावांकडून बहिणीला ओवाळणी-उपमुख्यमंत्री अजित पवार


            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, राज्यातील महिलांना अधिक सक्षम, सबल करण्यासाठी त्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्याकरीता अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेला माता-भागिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आजपर्यंत १ कोटी ३ लाख रुपये माता-भागिनींच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे मिळून ३ हजार रुपये जमा करण्यात आले आहे.  या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान, हसू दिसून येत आहे. *रक्षाबंधन* सणानिमित्ताने ओवाळणी म्हणून भेट दिली आहे.

माता-भगिनी जीवन जगताना त्यांच्या आशा अपेक्षा असतात परंतु स्वतःचे हीत बाजूला ठेवून कुटुंबाच्या भल्याकरीता त्या काम करीत असतात. या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या आशा- अपेक्षापूर्तीसाठी काम करण्यात येत आहे. यापुढेही या योजनेत सातत्य राहणार असून एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी श्री. सांगितले.  

            राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुलींना मोफत व्यवसायिक शिक्षण अशा विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. राज्याच्या हिताकरीता बेरोजगारी कमी करण्यासाठी, सर्व सामान्य नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी, मेट्रोचे जाळे निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासन मिळून काम करीत असून नागरिकांनी विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार म्हणाले.

योजनेमुळे महिलांना दिलासा मिळेल-डॉ.नीलम गोऱ्हे

            तीन दशकांच्या महिला धोरणाच्या इतिहासात या कार्यक्रमाच्या कार्यक्रमपत्रिकेत मान्यवरांच्या नावापुढे आईचे नाव लावल्याबद्दल समाधान व्यक्त करून विधान परिषद उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, महिलांची संख्या निम्मी असून दोन तृतीयांश तास त्या काम करतात. जगातील १ टक्के संपत्ती महिलांच्या नावावर आहे. अशा स्थितीत या योजनेमुळे महिलांना निश्चितपणे दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रबोधनाची परंपरा आणि महिला विकासाचा वारसा असलेल्या पुण्यात या योजनेचा समारंभ होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.


योजनेद्वारे २ कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न-कु. आदिती तटकरे


            कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंत्री कु.तटकरे यांनी केले. दोन दिवसांनी रक्षाबंधन साजरा होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या तीन लाडक्या भावांनी आधीच ओवाळणी दिली. या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला. १ कोटी ३५ लक्ष महिला लाभासाठी पात्र ठरल्या, त्यापैकी १ कोटी ३ लक्ष महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक आदींनी यासाठी खूप परिश्रम केले. २ कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

            यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'यशस्विनी प्लॅटफॉर्म' पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात योजनेच्या धनादेशाचे आणि स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.

            कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार मेधा कुलकर्णी, सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, आमदार प्रा. राम शिंदे, उमा खापरे, योगेश टिळेकर, प्रसाद लाड, दिलीप मोहिते पाटील, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, राहुल कुल, महेश लांडगे, सिद्धार्थ शिरोळे, अश्विनी जगताप, सुनील कांबळे, सुनील शेळके, महिला व बालविकास सचिव अनुपकुमार यादव, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, क्रीडा आयुक्त डॉ.राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, एकात्मिक बालविकास योजना सेवा आयुक्त कैलास पगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

0000000


l पर्व महिला सक्षमीकरणाचे l मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ चा राज्यस्तरीय शुभारंभ…

 



l पर्व महिला सक्षमीकरणाचे l मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ चा राज्यस्तरीय शुभारंभ… #मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण #लाडकी_बहिण #महाराष्ट्र #माझी_लाडकी_बहिण

विशेष चित्रफीत पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा…

https://youtu.be/HkYdwMNNlcU






'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा अमरावती येथे वचनपूर्ती सोहळा थाटात संपन्न

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा अमरावती येथे वचनपूर्ती सोहळा थाटात संपन्न

शासनाची प्रत्येक योजना गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा

-         खासदार डॉ. अनिल  बोंडे

 

जिल्ह्यात ३ लक्ष ९५ हजार पात्र महिलांचे अर्ज मंजूर

महिलांच्या चेहऱ्यावर हास्य आणि समाधान

 

अमरावती,दि. १७ :महिलांना आत्मनिर्भय व स्वावलंबी बनविण्यासाठी 'मुख्यमंत्री  माझी लाडकी बहीण योजना' राज्य शासनाने सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या  मुहूर्तावर  राज्यातील १ कोटी ४७ लाख बहिणींना मुख्यमंत्री महोदयांच्या रुपाने त्यांचा 'भाऊराया' भेटला आहे. शासनाची प्रत्येक  गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. ज्या पात्र बहिणींचा अर्ज अद्याप अर्ज भरायचा राहिलेला आहे, त्या बहिणींना अन्य महिलांनी सहकार्य करण्याचे आवाहन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे केले .

    नियोजन भवन येथे आज 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या राज्यस्तरीय शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे या योजनेचा वचनपूर्ती सोहळा थाटात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रवी राणा, आमदार प्रतापदादा अडसड, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा योजनेचे नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .

            खासदार डॉ. बोंडे म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री  माझी लाडकी बहीण योजना राज्य शासन राबवित आहे. अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ४ लक्ष लाभार्थ्यांपैकी ३ लक्ष ९५ हजार लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत . उर्वरित ५ हजार अर्जावर येत्या दोन दिवसात कार्यवाही होईल. नवीन अर्जाची नोंदणी सुरू आहे. बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा झाला आहे. उर्वरित पात्र महिलांच्या खात्यात लवकरच निधी जमा होईल. पात्र महिलांचे संयुक्त खाते असल्यासही निधी जमा होईल. ज्या महिलांचे खाते आधार लिंक नाही, त्यांनी तात्काळ आधार लिंक करून घ्यावे. जेणेकरून त्यांचा निधी लवकरात लवकर खात्यावर जमा होईल. ज्या पात्र महिला लाभार्थ्यांचे अर्ज भरायला विलंब झाला  त्यांनाही ही योजना लागू झाली तेव्हापासून या योजनेचा लाभ मिळेल.

            खासदार डॉ. बोंडे पुढे म्हणाले की, मुलींच्या शिक्षणावर विशेष भर द्या. राज्य शासन ‘मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना’ या वर्षीपासून राबवित आहे. या योजनेंतर्गत मेडीकल, इंजिनिअरींगसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित पात्र मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क रक्कमेच्या ५० टक्के ऐवजी १०० टक्के शुल्क माफीचा लाभ मंजूर करण्यात येत आहे. यासाठी मुलींच्या शिक्षणावर विशेष भर द्या. तसेच मुलींसाठी अग्निवीर योजना सुरू असून याचा लाभ मुलींनी घ्यावा. याचप्रमाणे  जेष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री  तीर्थदर्शन योजना’ सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये जेष्ठ नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची आणि दर्शनाची संधी देण्यात येत आहे. या योजनेचा लाभार्थ्यांना लाभ घेण्याच्या आवाहन त्यांनी यावेळी केले .

          आमदार श्री.अडसड यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही राज्य शासनाची  महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे सांगून पुढे म्हणाले की, या योजनेत सहभागी होण्यासाठी अमरावती जिल्ह्यात सर्वत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने नाव नोंदणी केली जात आहे. तसेच जिल्ह्यातील महिलांना योजनेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी २४/ ७ तास मदतकक्ष स्थापन करण्यात आला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स या क्षेत्रीय  स्तरावर उत्तमरित्या जबाबदारी सांभाळीत असल्याचे ते यावेळी म्हणाले .

   जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्या समन्वय व एकत्रितपणे काम केल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यात अल्पावधीत यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. पात्र लाभार्थी महिलांची नोंदणी केल्यापासून ते त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होईपर्यंत या सर्व कार्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांची खूप मोलाची मदत होत आहे. योजनेचे नोडल अधिकारी डॉ . कैलास घोडके या योजनेची अंमलबजावणी उत्तमरित्या करीत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

       खासदार डॉ. बोंडे ,आमदार श्री. राणा, श्री .अडसड, जिल्हाधिकारी श्री. कटियार यांना रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भगिनींनी राख्या बांधल्या. यामुळे या शासकीय कार्यक्रमाला एक कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले होते. पुणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कैलास घोडके यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन  पर्यवेक्षिका कीर्ती खन्ना यांनी तर आभार मनपाचे नरेंद्र वानखडे यांनी मानले.