बुधवार, २८ जून, २०२३

युपीएससी मुख्य परीक्षेकरीता पात्र विद्यर्थ्यांना महाज्योतीतर्फे 50 हजार रुपयाच्या अर्थसहाय्य

 

युपीएससी मुख्य परीक्षेकरीता पात्र विद्यर्थ्यांना महाज्योतीतर्फे

                                                50 हजार रुपयाच्या अर्थसहाय्य

        अमरावती दि. 28 : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना युपीएससी मुख्य परीक्षेकरीता पात्र झालेल्या विद्यार्थ्यांसाठी रुपये 50 हजार एकरकमी अर्थसहाय्य योजनेकरीता महाज्योतीतर्फे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. तसेच नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी असावा. विद्यार्थी हा दि. 12 जुन 2023 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोग - पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेला असावा. केंद्रीय लोकसेवा आयोग मुख्य परिक्षेसाठी पात्र असावा. ज्या उमेदवारांना सदर परीक्षेसाठी इतर संस्था,सारथी, पुणे कडून अर्थसहाय्य मिळत आहे किंवा त्यासाठी अर्ज केला आहे अश्या उमेदवारांना या योजनेच्या लाभासाठी अर्ज करता येणार नाही, याची नोंद घ्यावी.
                अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, पूर्व परीक्षेचे प्रवेश पत्र, बँकेचे तपशील, पूर्व परिक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रासह माहाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे.

नोटीस बोर्डवर अर्ज करण्याबाबत मार्गदर्शक तपशील दिलेला आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2023 आहे. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास महाज्योतीच्या कॉल सेंटरवर 0712-2870120-21 या क्रमांकावर संपर्क साधावा.

याआधी केंद्रीय लोकसेवा आयोग- पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र नॉन क्रिमीलेअर गटातील उमेदवारांना 15,000 रुपये देण्याचे प्रावधान होते. ते आता 50,000 रुपये करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी ना.श्री. अतुल सावे मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, सरकार तथा अध्यक्ष महाज्योती, नागपूर यांचे आभार मानले आहे.

                                                                00000

महाज्योतीच्या जेईई/नीट/एमएचटी-सीईटी प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

 

महाज्योतीच्या जेईई/नीट/एमएचटी-सीईटी प्रशिक्षणाचा

लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

महाज्योतीचे www.mahajyoti.org या संकेतस्थळ उपलब्ध

 

अमरावती, दि. 28 : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूरमार्फत जेईई/नीट/एमएचटी-सीईटी करिता दहावी नंतर प्रशिक्षण देण्यात येते. सदर प्रशिक्षण हे दोन वर्षासाठी असून त्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब व दररोज 6 जीबी डेटा देण्यात येतो. 10 वी उत्तीर्ण झालेल्या व विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना महाज्योतीच्या जेईई/नीट/एमएचटी-सीईटी प्रशिक्षणाचा लाभ घेता यावा, यासाठी महाज्योती संस्थेने इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी दि. 5 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, विद्यार्थी हा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा. तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा. योजनेच्या संदर्भातील सर्व अटी व शर्ती या महाज्योतीच्या www.mahajyoti.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या संकेतस्थळावरील सूचना फलकात जाऊन प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.

तसेच ज्या उमेदवारांनी या आधी जेईई/नीट/एमएचटी-सीईटी प्रशिक्षणासाठी अर्ज केलेले आहेत मात्र कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही अश्या उमेदवारांना त्यांचे आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी दि. 15 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ज्या उमेदवारांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही अश्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन महाज्योती मार्फत करण्यात आलेले आहे.

0000

 

 

अपंग बालकांना शासकीय संस्थेत मोफत प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

 अपंग बालकांना शासकीय संस्थेत मोफत प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

अमरावती, दि. 28:   महाराष्ट्र शासनाच्या अपंग कल्याण आयुक्तालय पुणे अंतर्गत अपंग (अस्थिव्यंग) बालकांसाठी मोफत शिक्षण, वसतीगृह तसेच गरजेनुसार अस्थिव्यंगोपचार शस्त्रक्रिया व कृत्रिम अवयव पुरविण्याची सुविधा पुरविणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय निवासी संस्था किल्ला भाग मिरज येथे कार्यरत आहे. या संस्थेत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुकांनी याठिकाणी प्रवेशासाठी संपर्क साधावे, असे आवाहन संस्थेव्दारे करण्यात आले आहे.

मोफत शिक्षण सुविधा

 या संस्थेच्या परिसरात इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण विनामुल्य दिले जाते. तसेच इयत्ता 5 वी पासून पुढील शिक्षण माध्यमिक शाळेमार्फत दिल्या जाते. शाळेत जाण्या-येण्याकरिता मोफत वाहतुकीची सुविधा, पाठ्यपुस्तके, वहया व इतर शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेश मोफत. मुलींसाठी विशेष काळजी घेण्यासाठी महिला काळजीवाहक आदी सुविधा या संस्थेत आहे.

वसतिगृह सुविधा

वसतिगृहात अपंग मुला मुलीची स्वतंत्र निवासव्यवस्था व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक विद्यार्थ्यास कॉट, गादी, बिछाना व इतर साहित्याचा पुरवठा. दररोज अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय, पिण्यासाठी शुध्द व थंडगार पाण्याची सुविधा आहे.

शस्त्रक्रिया भौतिकोपचार सुविधा

अस्थिव्यंगोपचार तज्ञांच्या सल्ल्यानुसार गरजेनुसार शस्त्रक्रिया व भौतिकोपचाराची सुविधा आहे. गरजेनुसार कृत्रिम अवयव, कुबडया, तीन चाकी सायकल वाटप केल्या जाते. वयोगट 0.6 करिता मोफत EARLY INTERVENTION CENTRE अंतर्गत भौतिकोपचार केल्या जाते.

प्रवेशाबाबत अटी

प्रवेशित उमेदवार हा अस्थिव्यंग असला पाहिजे. त्याचे वयोगट 6 ते 17 वर्ष असावे. प्रवेश अर्जासोबत जिल्हा शल्या चिकित्सक यांनी दिलेला अपंगत्वाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, 3 फोटो जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज व माहितीपत्रक पत्यावर समक्ष अथवा पोस्टाद्वारे मोफत मिळतील. त्यासाठी संपर्काचा पत्ता पुढीलप्रमाणे दिला आहे.

संपर्काचा पत्ता :

अधिक्षक, शासकीय अपंग बालगृह व शाळा, किल्ला भाग, बी.एस.एन.एल. ऑफिस शेजारी, मिरज. 496490 आहे. अधिक माहितीसाठी  मोबाईल क्र. 9325555981, 9552234586,  9422216459 यावर संपर्क साधावा, असे अधिक्षक, शासकीय अपंग बालक गृह व शाळा शाळा, मिरज यांनी कळविले आहे.

00000

परिवहन कार्यालयातर्फे एका जप्त वाहनाचा 17 जुलैला लिलाव

 परिवहन कार्यालयातर्फे एका जप्त वाहनाचा 17 जुलैला लिलाव

अमरावती, दि, 28:  प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जप्त केलेल्या एका वाहनाचा लिलाव दि. 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता होईल. पाहणीसाठी वाहन कार्यालयाच्या आवारात उपलब्ध आहे.  

  वायुवेग पथकाने थकित कर, तसेच विविध गुन्ह्यांखाली अडकवून ठेवलेल्या वाहनाच्या मालकाला त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पंजीबध्द डाकेने नोटीस पाठविण्यात आली आहे. लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर व पर्यावरण कर भरण्याची संधी वाहनमालकाला राहील.

वाहनाचा क्रमांक एमएच 27सी0724 असून प्रकार एचजीव्ही टिप्पर, चासिस क्र.  403121सीव्हीझेड711992, इंजिन क्रमांक 497डी44 सीव्हीझेड871875 व रंग रूबी रेड आहे.  वाहनाची नोंदणी 17 एप्रिल, 2004 रोजीची व बनावट – टाटा मोटर्स लि. यांची आहे. 

 जाहीर ई-लिलावात एचजीव्ही संवर्गातील एक वाहन उपलब्ध आहे. ई-लिलावात सहभागी होण्यासाठी दि. 3 ते 10 जुलैदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, अमरावती येथे 17 हजार रू. रकमेचा आरटीओ, अमरावती या नावाने अनामत धनाकर्षासह (डिमांड ड्राफ्ट) नाव नोंदणी करुन प्रत्यक्ष येऊन पूर्तता करावी. अर्जदार जीएसटीधारक असावा. 

कोणतेही कारण न देता सदर जाहिर ई-लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्यावे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कर वसुली अधिकारी, अमरावती यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत.

 

00000


पेरणीची घाई करू नका; कृषी विभागाचा शेतकरी बांधवांना सल्ला

 पेरणीची घाई करू नका; कृषी विभागाचा शेतकरी बांधवांना सल्ला

अमरावती,दि. 28 : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते यांनी केले आहे.

अमरावती जिल्ह्यातील सरासरी 145.7 मि.मि. पर्जन्यमानाच्या तुलनेत दि. 27 जूनअखेर  54 मि.मि. अर्थात सरासरीच्या 37.1 टक्के पाऊस झाला आहे. मान्सूनच्या आगमनास विलंब व हवामान बदलामुळे सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकला आहे. भारतीय हवामान विभागाने आज दिलेल्या हवामान अंदाजानुसार दि. 2 ते 8 जुलै दरम्यान कमी पाऊस पडण्याची व पावसात खंड निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे.

 त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी घाई करु नये. सर्वसामान्यतः 80 ते 100 मिमि. पर्यत पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये. जमिनीत पेरणीसाठी योग्य ओल असल्याची खात्री करावी. पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करावी. ज्या शेतक-यांनी पेरणी केली आहे, त्यांनी पिकांसाठी संरक्षित सिंचनाचा वापर करावा. जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी आच्छादनासारख्या (मल्चिंग) तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन एसएओ श्री. सातपुते यांनी केले.

00000


मंगळवार, २७ जून, २०२३

शेतकरी बांधवांनी खात्याचे नवीनीकरण करून घ्यावे - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 शेतकरी बांधवांनी खात्याचे नवीनीकरण करून घ्यावे

-          जिल्हाधिकारी पवनीत कौर

अमरावती, दि. 27 : शेतकरी बांधवांनी कर्जखात्याचे विहित मुदतीत नवीनीकरण करून घ्यावे जेणेकरून नवे कर्ज व व्याज सवलत योजनेचा लाभ मिळू शकेल, असे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे सांगितले.

            दरवर्षी मिळणा-या कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणे आवश्यक असते. परतफेड न झाल्यास पुढील वर्षी कर्ज उपलब्ध होण्यास अडचण येते. कर्जफेड करणा-या शेतक-यांना नवीन वर्षासाठी पुन्हा कर्ज दिले जाते. मुदतीत परतफेड न केल्यास कर्जखाते थकित होते. थकित खातेधारकांना बँका पीककर्ज देत नाही. त्यामुळे मुदतीत कर्जाची परतफेड करून खात्याचे नवीनीकरण करणे आवश्यक आहे. येत्या 31 जुलैपूर्वी शेतकरी बांधवांनी आपल्या मागील पीककर्जाची परतफेड करून खाते नवीनीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

नवीनीकरण केलेल्या शेतक-यांना पीकविमा योजनेचा लाभ घेता येतो, तसेच डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचाही लाभ मिळू शकतो. वाढीव कर्ज घेण्यास शेतकरी पात्र होतात. कर्ज खाते नवीनीकरण केलेल्या शेतक-यांना बँकांच्या इतर कर्ज योजनांचा देखील लाभ होतो.

००००


बकरी ईदनिमित्त गुरूवारी सार्वजनिक सुट्टी

 बकरी ईदनिमित्त गुरूवारी सार्वजनिक सुट्टी

अमरावती, दि. 27 : अधिसूचित सुट्टीतील बदलानुसार बकरी ईदनिमित्त गुरूवारी (29 जून) सार्वजनिक सुट्टी असेल.

राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांत बकरी ईद या सणाची सुट्टी बुधवार दि. 28 जून 2023 रोजी दर्शविण्यात आली होती. तथापि, बकरी ईद (ईद- उल- झुआ) हा सण गुरूवारी येत असल्याने सार्वजनिक सुट्टीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार बकरी ईदनिमित्त सुट्टीचा दिवस गुरूवार, दि. 29 जून 2023 आहे.

०००

शुक्रवार, २३ जून, २०२३

राज्यपाल रमेश बैस शनिवारी अमरावतीत विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ

 

सुधारित दौरा

राज्यपाल रमेश बैस शनिवारी अमरावतीत

विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ

 

अमरावती, दि. 23 : राज्यपाल रमेश बैस हे उद्या शनिवारी (24 जून) अमरावती दौ-यावर असून, त्यांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ व विविध कार्यक्रम होतील.

सुधारित दौऱ्यानुसार, नागपूर येथील राजभवन येथून राज्यपालांचे शनिवारी सकाळी 8 वाजता वाहनाने अमरावतीकडे प्रयाण होईल. सकाळी 10 वाजता अमरावती येथे शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10.35 वा. विश्रामगृह येथून स्वामी विवेकानंद सभागृहाकडे प्रयाण.

सकाळी 10.50 वाजता पी. आर. पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटस् परिसरातील स्वामी विवेकानंद सभागृह येथे आगमन व राखीव.

स्वामी विवेकानंद सभागृह येथे सकाळी 11 ते 12.45 वा. दरम्यान येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 39 वा पदवीदान समारंभ, त्यानंतर राखीव, दु. 1.30 वाजता स्वामी विवेकानंद सभागृह येथून सेवाग्रामकडे प्रयाण.

                                                          00000

 

परदेशी शिक्षणाची संधी मिळवून देणारी शिष्यवृत्ती योजना

 परदेशी शिक्षणाची संधी मिळवून देणारी शिष्यवृत्ती योजना

समाजाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय कोणताही देश प्रगत होऊ शकत नाही. त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित, मागास, आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षित करणे व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक ठरते. गरीब व वंचित घटकांतील विद्यार्थी अनेकदा गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत शैक्षणिक भत्ते, शिष्यवृत्ती व योजनांची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अंमलबजावणी केली जाते.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय समाजास मुख्य प्रवाहात आणून सर्वांगीण विकासासाठी आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाच्या अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजना अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे.

 

विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना ही शासनाची महत्वाची योजना आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेणे कठीण असते. अशा विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून ही राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी.) उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा उद्देश आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

 

हा लाभ दिला जातो

योजनेसाठी पात्र असणा-या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ योजनेतून दिला जातो. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे व पीएचडीसाठी 40 वर्षे कमाल वयोमर्यादा असते. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एमडी, एमएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी पात्र आहेत. विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये ज्या परदेशी विद्यापीठांचे रँकिंग 300 पर्यंत आहे, त्याच विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही योजना देय आहे.  

 

अर्ज कुठे करावा

विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरून डाऊनलोड करून घ्यावा. परिपूर्ण अर्ज समाजकल्याण आयुक्तालय, 3, चर्च पथ, पुणे 411001 या पत्त्यावर पाठवावा.

 

अर्ज करण्यास मुदतवाढ

वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळवून देणारी ही महत्वपूर्ण योजना आहे. परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत 20 जूनपर्यंत होती. ती आता 5 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत.

-         प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे

०००

गुरुवार, २२ जून, २०२३

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित       

          अमरावती, दि. 22 : महिला व बाल विभागामार्फत महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व स्वयंसेवी संस्थांना दरवर्षी पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. सन 2020-21, 2021-22, 2022-23 व सन 2023-24 या वर्षांसाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येणार असून, स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

            इच्छूक व्यक्ती, स्वयंसेवी संस्था यांनी विहित नमुन्यातील अर्जासाठी, तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, दत्तात्रय सदन, दसरा मैदान रोड, भुतेश्वर चौक, देशपांडेवाडी, अमरावती यांच्याशी दूरध्वनी क्र. (0721) 2990412 या क्रमांकावर कार्यालयाशी संपर्क साधावा व आवश्यक सर्व प्रमाणपत्रांसह तीन प्रतींत 7 दिवसांच्या आत अर्ज पाठवावा. मुदतीनंतर येणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

000000

‘नशामुक्त भारत’ पंधरवड्यात ‘हसतखेळत व्यसनमुक्ती’बाबत मार्गदर्शन

 ‘नशामुक्त भारत’ पंधरवड्यात ‘हसतखेळत व्यसनमुक्ती’बाबत मार्गदर्शन

            अमरावती,दि. 22 :  समाजकल्याण विभागातर्फे नशामुक्त भारत पंधरवड्यात केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे निवृत्त अधिक्षक व लेखक जी. बी. देशमुख यांचे हसत खेळत व्यसनमुक्ती या विषयावर व्याख्यान नुकतेच झाले.

            प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, लेखाधिकारी विश्वास डाखोरे, विशेष अधिकारी  राजेंद्र भेलाऊ, सहायक लेखाधिकारी राजेश रायकवार आदी उपस्थित होते.

            श्री. देशमुख यांनी आपल्या व्याख्यानातून सर्वांशी हसतखेळत संवाद साधत नर्मविनोदी शैलीत विषयाची प्रभावी मांडणी केली व उपस्थितांची मने जिंकली. व्यसनमुक्तीमुळे आयुष्यात अनेक सकारात्मक बदल होऊन जीवन सुखमय व आनंदी होते. त्यामुळे स्वत: व्यसनमुक्त राहून इतर व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करण्याचा संकल्प करूया व सभोवताल सुंदर करूया, असे आवाहन त्यांनी केले. 

            नशामुक्त भारत अभियात सर्वांनी सहभागी होऊन सशक्त भारत निर्माण करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन प्रादेशिक उपायुक्त श्री. वारे यांनी  केले. मंगला देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. श्री. जाधवर यांनी आभार मानले.

            प्रादेशिक उपायुक्त कार्यालय, सहायक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, तसेच सामाजिक न्याय भवन परिसरात असेलेल्या महामंडळातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

बुधवार, २१ जून, २०२३

अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा शाळांमधून ‘इट राइट’ मोहिम प्रभावीपणे राबवा - आरडीसी विवेक घोडके

 अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा


शाळांमधून ‘इट राइट’ मोहिम प्रभावीपणे राबवा

-         आरडीसी विवेक घोडके

अमरावती, दि. 21 :  ‘जंक फूड’मुळे कमी वयात अनेकांना आजार जडल्याचे आढळून येत आहे. बालकांमध्येही दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सुरू केलेली ‘इट राइट’ (योग्य खा) मोहिम शाळांमध्ये प्रभावीपणे राबवावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी आज केली.

अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सहआयुक्त गणेश परळीकर, सहायक आयुक्त शरद कोलते, पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार अमरावती जिल्ह्यात हायजीन रेटिंग, इट राईट कॅम्पस, इट राईट स्कूल, फॉसटॅक ट्रेनिंग आदी कार्यक्रम राबवावयाचे आहेत. बालकांना आरोग्यदायी व पोषक अन्न मिळावे या दृष्टीने विद्यार्थी व पालक दोहोंची जाणीवजागृती करावी, असे आरडीसी श्री. घोडके यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पुरेसे मनुष्यबळ नसल्याने तपासावयाचे अन्न नमुने प्रलंबित राहतात, अशी तक्रार आहे. त्याच्या निराकरणासाठी तत्काळ कार्यवाही व्हावी, असेही त्यांनी सांगितले.  

 अन्न व औषध प्रशासनाने वर्षभरात केलेल्या कारवाईचा आढावा यावेळी घेण्यात आला.  अन्न व औषध प्रशासनाने दि. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत अन्नपदार्थाच्या 218 तपासण्या केल्या.  कारवाईत 22 लक्ष 65 हजार 842 रू. किंमतीच्या पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे, 1 एप्रिल 2023 ते 21 जून 2023 या कालावधीत 23 तपासण्या व 30 हजार 400 रू. किंमतीचा पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

०००

उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) पदावर अनिल भटकर रुजू

 उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) पदावर अनिल भटकर रुजू

अमरावती दि. 21 : जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) या पदावर अनिल भटकर हे सोमवारी रुजू झाले.


तत्पूर्वी उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी हे या पदावर कार्यरत होते. त्यांची बदली झाल्यावर काही दिवस प्रभार उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्याकडे होता.  श्री. भटकर यांनी श्री. लंके यांच्याकडून पदाचा कार्यभार घेतला. यापूर्वी श्री. भटकर हे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून मुंबई येथे कार्यरत होते.

श्री. भटकर यांनी यापूर्वी महसूल खात्यात विविध ठिकाणी तहसीलदार व अनेक पदांवर प्रदीर्घ सेवा बजावली आहे. अमरावती येथे पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी, राज्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली.  

000


 






अंगणवाड्यांत चिमुकल्यांनी आज केली योग प्रात्यक्षिके
 

अमरावती, दि. 21 :  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अंगणवाडी केंद्रांतील चिमुकल्यांनी योग प्रात्यक्षिके  करून आज आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला.

            जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. मन आणि शरीर यांचे संतुलन साधण्यासाठी योग उपयुक्त आहे. त्यादृष्टीने नव्या पिढीवर योगसंस्कार करण्याच्या हेतूने अंगणवाड्यांतही हा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनानुसार महिला व बालविकास विभागाकडून हा उपक्रम राबविण्यात आला.

            हा उपक्रम राबविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले. अंगणवाडी ताई आणि पर्यवेक्षिका यांना  योगाबाबतचे मार्गदर्शनपर व्हिडिओ पाठविण्यात आले. अंगणवाड्यांतील बालकांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबापर्यंत योगाचे महत्व पोहोचविण्याचाही उद्देश होता, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांनी सांगितले.

         उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका आणि विस्तार अधिकारी यांनी विविध अंगणवाड्यांत उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेतला. अनेक केंद्रांमध्ये पालकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. 

0000

 मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरु

यादीत सुधारणा करण्यासाठी सहकार्य करावे,

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आवाहन

 

        अमरावती, दि. 2 : भारत निवडणूक आयोगाने छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. नागरिकांनी दुबार नोंदणी, मयत मतदार व स्थलांतरित मतदार यांची माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना देऊन यादीत सुधारणा करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.

            निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यातील पूर्व उपक्रमात त्यानुसार मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण दि. 20 जुलैपूर्वी घेण्यात येईल. मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण, ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, मतदार यादीत सुधारणा करणे आदी कामे दि. 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबरदरम्यान करण्यात येतील. त्यानंतर 30 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान नमुना १-८ तयार करणे, अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी तयार होईल.

पुनरीक्षण उपक्रमात 17 ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. हरकती व दावे स्वीकारण्याचा कालावधी दि. 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर असेल. दि. 26 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकाली काढल्या जातील. डाटाबेस अद्ययावत करणे व पुरवणी याद्यांची छपाई 1 जानेवारी 2024 पर्यंत केली जाई व मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारी रोजी केली जाईल.  

दुबार मतदार, स्थलांतरित मतदार व मयत मतदारांची 100 टक्के वगळणी करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना माहिती द्यावी. हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी नेमलेल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  (बीएलओ) यांना सर्व सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले.

०००


दिवाणखेड तेथील अमृत सरोवराच्या परिसरात योगदिन साजरा योगाच्या माध्यमातून उपस्थितांना प्रसन्नतेची अनुभूती























 दिवाणखेड तेथील अमृत सरोवराच्या परिसरात योगदिन साजरा

योगाच्या माध्यमातून उपस्थितांना प्रसन्नतेची अनुभूती

अमरावती, दि. २१ : अमृत सरोवराचा निसर्गसुंदर परिसर, विस्तीर्ण जलाशय, पहाटेची आल्हाददायक हवा, निरामय शांततेत योग, प्रार्थना व ध्यानधारणा अशा चित्तवृत्ती उल्हसित करणाऱ्या वातावरणाचा प्रसन्न अनुभव आज उपस्थितांनी घेतला. तिवसा तालुक्यातील दिवाणखेड येथील अमृत सरोवर येथे जागतिक योगदिनाचे निमित्त साधून योगदिन साजरा करण्यात आला.

रोहयो उपायुक्त विजय भाकरे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी किरण जोशी, उपजिल्हाधिकारी राम लंके, तहसीलदार वैभव फरतारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुनील जाधव, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास घोडके, गटविकास अधिकारी उज्ज्वला ढाले, नायब तहसीलदार आशिष नागरे, नरेंद्र कुरळकर, गोपाळ कडू, दिवाणखेडचे सरपंच बाळूभाऊ उईके यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, योगप्रेमी, ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी झाले होते. योग प्रशिक्षक अशोक बेंडे, राहूल दोडके, सचिन पांडे यांनी सहभागींना योगाचे धडे दिले. यावेळी प्राणायाम, श्वसनपद्धती, विविध आसनक्रियांची प्रात्यक्षिके करण्यात आली. विविध आसने, ध्यानधारणा, ओंकार, प्रार्थनेद्वारे प्रसन्नतेची अनुभूती उपस्थितांना यावेळी मिळाली.

रोहयो उपायुक्त श्री. भाकरे म्हणाले की, चांगल्या जीवनासाठी शरीर व मन दोन्ही सुदृढ असणे आवश्यक आहे. मन आणि शरीराचे संतुलन योगातून साधले जाते. त्यामुळे निरामय आरोग्यासाठी सर्वांनी योगाचा अवलंब करावा.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशातील प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरे निर्माण करण्यात येत आहेत. अमरावती जिल्ह्यातही 75 सरोवरे विकसित करण्यात येत असून, 42 ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. अमृत सरोवराचा परिसर पर्यावरणदृष्ट्या अत्यंत सुंदर, शांत, प्रसन्न असल्यामुळे योग साधना करण्यासाठी योग्य ठिकाण आहे. हे लक्षात घेऊन आजचा जागतिक योगदान सरोवराच्या परिसरात साजरा करण्यात आला, असे उपजिल्हाधिकारी श्री. लंके यांनी यावेळी सांगितले. तिवसा तहसील कार्यालयाचे प्रशांत जायदे, बबलू ढोक, गुरूदेव गटरी, रितेश चेले, राजू चेले आदींनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

०००