शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२६

 

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक - 2026

मतदानासाठी मतदारांना विशेष नैमित्तिक रजा जाहिर

 

अमरावती, दि. 3 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष नैमित्तिक रजा जाहिर करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिनांक 22 सप्टेंबर, 2026 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये औरंगाबाद विभाग, पुणे‍ विभाग व नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच अमरावती विभाग व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक - 2026 चा कार्यक्रम जाहिर केलेला आहे. निवडणूकीचे मतदान शुक्रवार दि. 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत व मतमोजणी मंगळवार दि. 27 ऑक्टोबर, 2026 रोजी होणार आहे.

निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना मतदानांचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम 135B नुसार भर पगारी सुट्टी जाहीर करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने, सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 23 जून, 1991 रोजीच्या शासन निर्णयान्वये पदवीधर/शिक्षक मतदारसंघामध्ये मतदार असलेल्या व्यक्तींना विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आलेली आहे. या शासन निर्णयाची प्रत शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

निवडणुकीरिता मतदार असलेल्या खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना सदर विशेष नैमित्तिक रजा लागू होत नाही. त्यामुळे अशा मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी 2 तासांची विशेष सवलत देण्याबाबत संबंधित खाजगी आस्थापनांना त्यांच्या स्तरावरुन आवश्यक त्या सूचना देण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना या तरतुदीनुसार विशेष नैमित्तिक रजा जाहिर करण्यात आली असून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावावा असे आवाहन अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.

 

०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा