बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२६

पुढील वर्षी घरचे सोयाबीन बियाणे

वापरण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन करावे.

-कृषी सहसंचालक गणेश घोरपडे




 अमरावती दि. 14 : पुढील वर्षी चांगल्या दर्जाचे व रास्त किमतीत सोयाबीन बियाणे उपलब्ध होण्यासाठी, शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरण्याचे नियोजन आतापासूनच करावे, असे आवाहन अमरावती विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक गणेश घोरपडे यांनी केले आहे. 

चालू वर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात घट झाली असून, त्याचा परिणाम खरीप हंगामातील प्रमुख पिकांच्या उत्पादनावर होत आहे. सोयाबीन हे अमरावती विभागातील प्रमुख खरीप पीक असल्याने, यंदाच्या कमी उत्पादनामुळे पुढील वर्षी बियाण्याच्या उपलब्धतेबाबत समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांनी स्वतःजवळ चांगल्या दर्जाचे बियाणे असल्यास ते पुढील खरीप हंगामातील पेरणीसाठी वापरणे हा अत्यंत चांगला पर्याय ठरू शकतो. ज्या शेतकऱ्यांनी संरक्षित ओलीत केले आहे आणि ज्यांचे सोयाबीन उत्पादन समाधानकारक दर्जाचे आहे, त्यांनी पुढील खरीप हंगामासाठी आवश्यक तेवढे बियाणे राखून ठेवावे. तसेच, आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांनाही ते उपलब्ध करून द्यावे. शेतकरी बांधवांना विनंती आहे की, पुढील हंगामात आवश्यक असलेल्या बियाण्याची उपलब्धता आत्तापासूनच सुनिश्चित केल्यास, गावात अथवा परिसरात चांगल्या दर्जाचे बियाणे वाजवी किंमतीत उपलब्ध होईल. 

पुढील हंगामात वापरायच्या सोयाबीन बियाण्यासाठी पिकाची योग्य पद्धतीने मळणी करावी. बियाण्याची उगवणक्षमता टिकवण्यासाठी मळणी यंत्राचा आरपीएम 350 ते 400 पेक्षा कमी ठेवावा. वेगवेगळ्या वाणांचे बियाणे काढणी व मळणीच्या वेळी एकमेकांत मिसळणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. मळणीसाठी वापरलेले यंत्र पूर्वीच्या पिकाचे अवशेष न राहता स्वच्छ करावे, यामुळे वाणांची भेसळ टाळता येते. बियाणे साठवताना जास्त मोठी थप्पी लावू नये. तसेच, वाहतूक व हाताळणी करताना बियाण्याची आदळापट होणार नाही, याची काळजी घ्यावी; कारण सोयाबीन बियाणे उगवणीसाठी संवेदनशील असते. असा सल्ला श्री. घोरपडे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. 

सन 2026-27 मधील अनियमित पर्जन्यमान व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आगामी खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची संभाव्य कमतरता लक्षात घेता, अमरावती विभागातील शेतकरी बांधवांनी स्वतःकडील सोयाबीन बियाणे शास्त्रीय पद्धतीने जतन व साठवणूक करणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत शेतकरी वर्गात व्यापक जनजागृती व्हावी व त्यांनी स्वतःकडील बियाणे शास्त्रीय पद्धतीने जतन करून बियाण्याबाबत स्वयंपूर्ण व्हावे, या उद्देशाने कृषी विभाग "घरगुती सोयाबीन बियाणे जतन व साठवणूक मोहीम" राबवित आहे. असेही श्री घोरपडे यांनी कळविले आहे.

*****

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा