बुधवार, २५ जानेवारी, २०२३

नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

 नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

 

        अमरावती, दि. २३ : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन केले.

            यावेळी उपायुक्त संजय पवार, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थिती होते. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000

सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

 सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

अमरावती, दि. 24 : संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) नवी दिल्ली यांच्यामार्फत पदवीधर उमेदवारासाठी दि. 16 एप्रिल 2023 रोजी कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या संरक्षण दलातील अधिकारी पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांकरीता राज्य शासनाकडून छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे पूर्वतयारी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील युवकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी दि. 30 जानेवारीला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

युपीएससीच्या कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) परीक्षेच्या माध्यमातून कायमस्वरुपी व अल्पमुदतीचे कमीशनसाठी युवकांची निवड केल्या जाते. राज्यातील युवक-युवतींना भारतीय सैन्य दलात अधिकारी पदाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनातर्फे छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे सीडीएस परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षणाचे (सीडीएस कोर्स क्र.60) दि. 1 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2023 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी निवड होणाऱ्या प्रशिक्षणार्थिंची निवास, भोजन व प्रशिक्षणाची नि:शुल्क सुविधा करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांनी सैन्यदलात अधिकारी बनण्याच्या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास दि. 30 जानेवारी मुलाखतीस कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे. मुलाखतीला येताना डिपार्टमेन्ट ऑफ सैनिक वेलफेअर, पुणे (DSW) या संकेतस्थळाच्या फेसबुक, वेबपेज सर्च करुन त्यातील सीडीएस-60 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्ठाची प्रिंट काढून तो पूर्ण भरुन मुलाखतीस हजर राहावे.

अधिक माहितीसाठी दि. 21 डिसेंबर 2022 चे रोजगार समाचार वृत्तपत्र, युपीएससीचे www.upsconline.nic.in संकेतस्थळ तसेच छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्रमांक 0253-245032 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

00000

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

 


‘युवकांसमोरील आदर्श’ या विषयावर परिसंवाद

 

अमरावती, दि. 24 : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त ‘युवकांसमोरील आदर्श’ या विषयावर आयोजित परिसंवाद कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या सभागृहात जयंती कार्यक्रम संपन्न झाला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डॉ.ए.एम. महल्ले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक राजेश बुरंगे, प्रा. टि.सी. भगत, प्रभारी अधिकारी प्रा. ए. एम. मुकादम, प्रा. एन.जी. गाडगे तसेच सर्व शाखांचे व्दितीय वर्षाचे विद्यार्थी व एन.एस.एस स्वयंसेवक उपस्थित होते.

प्रारंभी श्री. बुरंगे यांच्याहस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विद्यार्थ्यांनी ‘एकता स्वतंत्रता समानता रहे’ हे देशभक्ती गीत गायले.

आजच्या युवकाला जर चांगली शिकवण दिली तर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांसारखा देश घडू शकतो. संस्थेच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली असून ते सध्या भारतीय नागरी सेवेमध्ये सेवा बजावत आहेत. अशा यशस्वी कर्तबगार विद्यार्थ्यांकडून संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी प्रेरणा घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. महल्ले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

‘युवकांसमोरील आदर्श’ या विषयावर श्री. राजेश बुरांगे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, तरुणांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेत त्यांचे विचार आचरणात आणावे. राष्ट्रीय सेवा योजनेचे रक्तदान हे मुख्य काम असून रक्तदानातून अनेक गरजू व्यक्तिंचे प्राण वाचविल्या जाऊ शकते, यासाठी सर्वांनी नियमित रक्तदान करावे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील शेवटाला होईल यादृष्टीने प्रयत्न करावे,  असेही श्री. बुरांगे यांनी यावेळी सांगितले.

संस्थेव्दारे आयोजित चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या कु. आचल तराळे या विद्यार्थीनीचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौरभ महाजन यांनी केले.

0000

राष्ट्रीय मतदारदिन लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 राष्ट्रीय मतदारदिन

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य

-        विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

अमरावती, दि. २५ : लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. त्यामुळे मतदार यादीत नाव नसलेल्या १८ वर्षांवरील युवक, तसेच प्रत्येकाने मतदार नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे कार्यक्रम विद्यापीठाच्या सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू विजयकुमार चौबे, प्र. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यांथन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, धनुर्विद्यापटू मधुरा धामणकर आदी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी यावेळी मतदारदिनाची प्रतिज्ञा घेतली.

निवडणुकीच्या दृष्टीने मतदार नोंदणी महत्वाची असते. त्यामुळे वयाची १८ वर्षे पूर्ण करणा-या प्रत्येकाने मतदार यादीत आपले नाव असण्याची दक्षता घ्यावी व आपला मताधिकार बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे यांनी केले. मतदार म्हणून कर्तव्य बजावण्याच्या शपथेचा उल्लेख करत कुलगुरू डॉ. चौबे म्हणाले की, मतदार प्रतिज्ञेचे पावित्र्य जाणून ती सर्वांनी ती आचरणात आणावी व मतदार म्हणून आपले कर्तव्य पूर्ण करावे.

 

मतदार नोंदणीसाठी उत्कृष्ट कार्य करणा-या अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी, स्वयंसेवक आदींचा यावेळी गौरव करण्यात आला. डॉ. व्यवहारे यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक राजेश बुरंगे यांनी सूत्रसंचालन केले. अमर कथोरे यांनी स्वागतगीत म्हटले. तहसीलदार संतोष काकडे यांनी आभार मानले. उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार मदन जाधव, नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख, क्रीडा प्रशिक्षक पवन तांबट आदी यावेळी उपस्थित होते.   

०००

जप्त रेतीसाठ्याचा चांदूर रेल्वे येथे शुक्रवारी लिलाव

 जप्त रेतीसाठ्याचा चांदूर रेल्वे येथे शुक्रवारी लिलाव

अमरावती, दि. 25: अवैधरीत्या साठा केल्याचे आढळल्यावरून पथकाने जप्त केलेल्या 120 ब्रास वाळूचा जाहीर लिलाव चांदूर रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात शुक्रवारी (27 जानेवारी) दुपारी 4 वाजता होणार आहे.  इच्छूकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

धामणगाव तालुक्यातील नायगाव रेतीघाटाचा 2021-2022 या आर्थिक वर्षात लिलाव झाला होता. या घाटातून अवैध वाळू उत्खनन करुन त्याची विनापरवाना साठवणूक झाल्याचे निदर्शनास येताच विशेष पथकाकडून  ते साठे जप्त करण्यात आले. या 120 ब्रास वाळूची हातची किंमत 72 हजार रू. ठेवण्यात आली आहे. त्यानुसार लिलाव होईल.

लिलावात सहभागी होणारे व्यक्ती, संस्था व शासकीय विभाग यांना लिलावात सहभागी होण्याकरीता अर्जासोबत ई-मेल आयडी, पॅन कार्ड, जीएसटी नंबर, करारपत्र, रहिवास पुरावा व आयकर भरणा करत असल्याबाबतचा पुरावा आदी दस्तऐवज द्यावे लागतील. अपसेट प्राईसच्या 25 टक्के इसारा रक्कम व इतर सर्व रकमा धनादेशाद्वारा भराव्या लागतील.

सर्वोच्च बोली धारकाने सर्वोच्च बोलीची 100 टक्के रक्कम लिलावाच्या दिवसानंतर कार्यालयीन कामकाजाच्या 12 तासाच्या आत भरणा करणे आवश्यक आहे.

 

000000

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची पत्रकार परिषद, निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध; प्रशासन सुसज्ज

 अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची पत्रकार परिषद

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध; प्रशासन सुसज्ज

अमरावती, दि. 5 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीसाठी मतदान दि. 30 जानेवारीला सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत व मतमोजणी 2 फेब्रुवारीला होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपायुक्त संजय पवार, अजय लहाने, गजेंद्र बावणे, विजय भाकरे आदी उपस्थित होते.

डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली असून, नामनिर्देशन पत्रे स्वीकारायला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन प्राप्त नाही. नामनिर्देशन पत्रे दि. 12 जानेवारीपर्यंत स्वीकारण्यात येतील. त्यांची छाननी दि. 13 जानेवारीला होईल. उमेदवारी अर्ज दि. 16 जानेवारीपर्यंत मागे घेता येतील. निवडणूक प्रक्रिया दि. 4 फेब्रुवारीला पूर्ण करण्यात येईल.  

मतदार संख्या






अंतिम मतदार यादीनुसार, अमरावती विभागात 1 लाख 20 हजार 944 पुरूष, 64 हजार 906 महिला व इतर 75 अशा एकूण 1 लाख 85 हजार 925 मतदारांची नोंदणी आहे. त्यात अमरावती जिल्ह्यात 33 हजार 236 पुरूष, 23 हजार 329 महिला, इतर 64 असे एकूण 56 हजार 629 पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. अकोला जिल्ह्यात 27 हजार 943 पुरूष, 16 हजार 552 महिला व 11 इतर असे एकूण 44 हजार 506, तसेच बुलडाणा जिल्ह्यात 26 हजार 161 पुरूष, 10 हजार 336 महिला (इतर शून्य) असे एकूण 36 हजार 497 मतदार नोंदणी आहे.

वाशिम जिल्ह्यात 11 हजार 78 पुरूष, 3 हजार 966 महिला (इतर शून्य) असे एकूण 15 हजार 44 आणि यवतमाळ जिल्ह्यात 22 हजार 526 पुरूष, 10 हजार 723 महिला (इतर शून्य) एकूण 33 हजार 249 मतदारांची नोंदणी आहे.

मतदान केंद्रे

विभागात संभाव्य 262 मतदान केंद्रे असतील. त्यात अमरावती जिल्ह्यात 75, अकोला जिल्ह्यात 61, बुलडाणा जिल्ह्यात 52, वाशिम जिल्ह्यात 26 व यवतमाळ जिल्ह्यात 48 केंद्रे असतील.

निवडणूक प्रक्रियेसाठी नोडल अधिका-यांच्या नियुक्त्या यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून 288, मतदान अधिकारी म्हणून 1 हजार 153 व सूक्ष्म निरीक्षक म्हणून 289  अधिकारी व कर्मचा-यांना जबाबदारी देण्यात येत आहे.

निवडणुकीदरम्यान मतदानाच्या प्रक्रियेबाबत भरीव जनजागृती करण्यात येईल जेणेकरून मतदान बाद होणार नाही. आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोविड-19 बाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे. मतमोजणीचे प्रशिक्षण, वाहतूक आराखडा, मतमोजणी केंद्र निश्चिती आदी प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सहायक आयुक्त श्यामकांत म्हस्के, विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे, निकिता जावरकर, रवी महाले, नायब तहसीलदार मधुकर धुळे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, निवडणूक निर्णय अधिका-यांनी आज राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांना निवडणूकविषयक विविध बाबींची माहिती दिली, तसेच त्यांचे शंकानिरसन केले. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

बुधवार, ४ जानेवारी, २०२३

निवडणुकीची कामे समन्वयपूर्वक पार पाडावीत - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक

निवडणुकीची कामे समन्वयपूर्वक पार पाडावीत

                                                 -         विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

अमरावती, दि. 4 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीची मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने नोडल अधिकारी व जिल्हा यंत्रणांनी समन्वयपूर्वक कामे करावीत, असे आदेश विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे दिले.

निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कार्यालयातील सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. उपायुक्त संजय पवार, अजय लहाने, गजेंद्र बावणे, विजय भाकरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.  

डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, नामांकन प्रक्रिया, मतदान साहित्य व्यवस्थापन, कर्मचारी प्रशिक्षण, मतदान व मतमोजणी केंद्रावरील व्यवस्था, मनुष्यबळ व्यवस्थापन, मतदार यादी आदी सर्व प्रक्रिया समन्वयाने दक्षतापूर्वक पार पाडावी. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे. माध्यम प्रमाणीकरण समितीबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

मतमोजणी केंद्र, स्ट्राँगरूम येथे चोख बंदोबस्त ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्याअनुषंगाने बैठकीनंतर विलासनगर येथील गोदामाची पाहणी निवडणूक निर्णय अधिका-यांनी केली. त्याचप्रमाणे, पशुसंवर्धन कार्यालयाच्या परिसरात निर्माण होत असलेल्या ईव्हीएम गोडाऊनची पाहणीही करण्यात आली.

विभागीय स्तरावरील नोडल अधिका-यांच्या नेमणुकीचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी निर्गमित केला असून, उपायुक्त श्री. पवार, तहसीलदार वैशाली पाथरे व नायब तहसीलदार राजेश चौधरी यांच्याकडे नामांकन प्रक्रिया, मतपत्रिका छपाई, टपाली मतपत्रिका आदी जबाबदारी देण्यात आली आहे.

आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, पोलीस विभागाशी समन्वय, तक्रार नियंत्रण व निवारण कक्षाची जबाबदारी उपायुक्त श्री. लहाने, संबंधित जिल्ह्यांचे अपर जिल्हाधिकारी, तहसीलदार निकिता जावरकर यांच्याकडे, तसेच वाहतूक आराखडा, व्यवस्थेची जबाबदारी श्रीमती जावरकर, नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे, कमलेश वानखडे यांच्याकडे देण्यात आली आहे.

मतदान व मतमोजणीबाबत प्रशिक्षणाची जबाबदारी सहायक आयुक्त श्यामकांत म्हस्के, विजय सूर्यवंशी  यांच्याकडे, तर चिन्हांकित मतदार यादी व टपाली मतपत्रिका, तसेच मतदान साहित्य व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिका-यांकडे आहे. मतमोजणी केंद्रावरील व्यवस्था. मतमोजणी प्रक्रिया आदींबाबत उपायुक्त श्री. बावणे, श्री. म्हस्के, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, तहसीलदार रवी महाले, विजय सूर्यवंशी, संतोष नटवे, सचिन पवार, पवन चेचरे, प्रतिक पावडे यांच्याकडे जबाबदारी आहे. विविध परवानगी कक्षाबाबत उपायुक्त श्री. भाकरे यांच्याकडे, तर मतदान केंद्रावरील व्यवस्थेबाबत संबंधित सर्व निवासी उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिका-यांकडे जबाबदारी आहे.

मनुष्यबळ व्यवस्थापन, निवडणूक आयोगास अहवाल सादर करणे आदी जबाबदारी सहायक आयुक्त श्री. काळकर, नायब तहसीलदार संजय मुरतकर, सुजन सोळंके यांच्याकडे आहे.

000000

 

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांचे अमरावतीत आगमन व स्वागत

 

मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल

यांचे अमरावतीत आगमन व स्वागत

 

अमरावती, दि. 23 : मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांचे आज सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या उपस्थितीत सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठक डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधीनी येथील सभाकक्षात उदया, 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होईल. या बैठकीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल उपस्थित राहतील .

0000



गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

 

शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पिकस्पर्धेत

सहभागी होण्याचे आवाहन

 

* अंतिम मुदत 31 डिसेंबर

 

 

अमरावती, दि. 22 : जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा, यासाठी पिक स्पर्धा रब्बी हंगाम 2022 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक के. एस. मुळे पाटील यांनी केले आहे. पिकस्पर्धेत सहभागी होण्याची 31 डिसेंबर ही अंतीम मुदत आहे.

पीकस्पर्धेमध्ये रब्बी पीके ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस अशा एकूण पाच पीकांचा समावेश करण्यात आला आहे. पीक स्पर्धेतील पिकांची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान हजार हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र हजार हेक्टरपेक्षा कमी असल्यास स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची विहित मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

स्पर्धक संख्या, पीकस्पर्धा क्षेत्र, कापणी प्रयोग यासाठी सहभागी लाभार्थ्यांचे स्वत:च्या शेतावर त्या पीकाखाली भात पिकासाठी किमान 20 आर व इतर पिकासाठी 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

बक्षिसांचे स्वरुप

राज्यस्तरावरील पिकस्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील. तालुका पातळीसाठी पहिले बक्षिस रु. 5 हजार, दुसरे बक्षिस 3 हजार व तिसरे बक्षिस 2 हजार असे स्वरुप आहे. जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षिस 10 हजार, दुसरे बक्षिस 7 हजार व तिसरे बक्षिस 5 हजार असे स्वरुप आहे. तसेच राज्य पातळीसाठी पहिले बक्षिस 50 हजार, दुसरे बक्षिस 40 हजार व तिसरे बक्षिस 30 हजार असे स्वरुप आहे.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) रक्कम 300 रुपये राहील. तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान 10 व आदिवासी गटासाठी किमान 5 यापेक्षा प्रवेश अर्ज कमी असल्यास, पिकस्पर्धा रद्द करण्यात येऊन प्रवेश शुल्क परत देण्यात येईल. या पिकस्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे. 

0000

मेळघाटात नियमितपणे राबविणार सामाजिक उपक्रम - धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन

 

धर्मादाय आयुक्तांकडून आदिवासी गोरगरिबांना वस्त्रदान

 

मेळघाटात नियमितपणे राबविणार सामाजिक उपक्रम

                           - धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन

 

(फोटो ओळ : आदिवासी बांधवांना वस्त्रदान करताना धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन व मान्यवर)

 

अमरावती, दि. 21 : धर्मादाय सहआयुक्त कार्यालय व सार्वजनिक न्यास वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलदरा तालुक्यात गोरगरीब आदिवासी बांधवांसाठी वस्त्रदान उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र केशव महाजन यांच्याहस्ते गरजू आदिवासी बांधवांना वस्त्रदान करण्यात आले. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात व मेळघाटात गरजू गरीब लोकांना धर्मादाय विभागाच्यावतीने वस्त्रदानाचा उपक्रम नियमितपणे राबविला जाणार असल्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांनी सांगितले.

आमदार राजकुमार पटेल, अमरावती विभागाचे धर्मादाय सहआयुक्त संभाजी ठाकरे, धर्मादाय उप आयुक्त नवनाथ जगताप, सहायक धर्मादाय आयुक्त रोहिणी पाठक, वकील संघाचे अध्यक्ष प्रमोद बोथरा, उपाध्यक्ष अॅड. मिलिंद देशपांडे, सचिव अॅड. नरेश पारडशिंगे, सार्वजनिक न्यास विभागाचे अधीक्षक पिंकी राय, नीलेश करलुके, निरीक्षक संतोष राऊत, उमेश लुंगे, रवींद्र गुल्हाने, विक्रम पवार, अस्मिता पटेल, सचिन बाकल, सचिन कांबळे तसेच चिखलदरा नगरपरिषदेचे नगरसेवक आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. महाजन म्हणाले की, समाजात आजही अनेक गरीब लोकांना पुरेसे वस्त्र मिळत नाही, दैनंदिन परिधान करावयाची वस्त्र घेण्याची त्यांची ऐपत नाही. थंडीमध्ये सुध्दा गरीब लोकांना ओढण्यासाठी गरम लोकरचे कपडे मिळत नाहीत. अशा गरजू लोकांसाठी धर्मादाय सह आयुक्त व वकिल संघटनेव्दारे राबविला जाणारा वस्त्रदान कार्यक्रम हा स्तुत्य व कौतुकास्पद उपक्रम आहे. प्रत्येक व्यक्तीला सुरळीतपणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. समाजातील दानशुर व्यक्तींनी गोरगरीब लोकांचे जीवन सुखकर होण्यासाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून वस्त्रदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमासाठी ज्या धर्मादाय संस्थांनी दान केले त्यांचे श्री. महाजन यांनी कौतूक केले. समाजातील गरीब लोकांचे जीवन सुखमय करण्याचे धर्मादाय संस्थेचा मुळ उद्देश असून तो सफल करण्यासाठी धर्मादाय विभागाने पुढाकार घेऊन वस्त्रदानाचा उपक्रम प्रभावीपणे राबवावा. धर्मादाय विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. आरोग्याच्या सुविधा मिळविणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून त्या अंतर्गत धर्मादाय रुग्णालयातील मोफत व सवलतीच्या दरात उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सुविधांचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. महाजन यांनी केले.

धर्मादाय विभागाव्दारे राबविण्यात येणारा गोरगरीब आदिवासी बांधवांसाठी वस्त्रदान हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून कौतूक केले. समाजातील इतर धनाड्य व्यक्तींनी सुध्दा याचे अनुकरण करुन अशाप्रकारचे उपक्रम नियमितपणे राबविले जावेत, असे आमदार राजकुमार पटेल यांनी यावेळी सांगितले.

श्री. ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील धर्मादाय संस्थाना गरजु गरीब लोकांसाठी वस्त्रदान करण्याचे आवाहन धर्मादाय विभागाव्दारे करण्यात आले होते. त्याला धर्मादाय संस्थांनी भरभरुन प्रतिसाद देत आपापल्यापरीने गरीब लोकांसाठी साडया, चादरी, ब्लैंकेट, टावेल, कपडे इत्यादी वस्त्रांचे दान  केले. त्या दान केलेल्या वस्त्रांचे वितरण राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांच्या शुभ हस्ते गरजू आदिवासी बांधवांना करण्यात आले. या वस्त्रदान कार्यक्रमाचा सुमारे दोन हजार गरीब आदिवासी बांधवांनी लाभ घेतला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोरगरीब आदिवासी बांधवांना व महिलांना वस्त्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांनी, तर सुत्र संचालन अधीक्षक पिंकी राय यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय अधीक्षक नीलेश करलुके, संतोष राऊत व अ‍ॅड. कुलकर्णी यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मादाय सह-आयुक्त कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच वकील संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले. 

 

0000