वृत्त क्र. 135
विभागात मतदार याद्यांच्या 'विशेष सखोल पुनरीक्षण' मोहिमेचे सुधारित
वेळापत्रक जाहीर;
३० जून ते ८ ऑगस्ट दरम्यान 'बीएलओ' करणार घरोघरी जाऊन पाहणी
अमरावती,
दि. २५: राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या संपूर्णपणे अद्ययावत, अचूक
आणि दोषविरहित करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 'विशेष सखोल पुनरीक्षण
(SIR) २०२६' ही विशेष मोहीम राबवली जात आहे. वाढते नागरीकरण, मतदारांचे होणारे स्थलांतर,
दुबार नोंदी आणि मृत मतदारांची नावे यामुळे मतदार याद्या दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे
बनले असून, या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या वतीने या मोहिमेचे
सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या नव्या कार्यक्रमानुसार अमरावती विभागातील सर्व
जिल्हा प्रशासन व निवडणूक यंत्रणांना अंमलबजावणीचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. सुधारित
वेळापत्रकानुसार, ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी
(BLO) प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेतील. यानंतर ८ ऑगस्टपर्यंत
मतदान केंद्रांची पुनर्रचना आणि सुसूत्रीकरणाचे काम पूर्ण केले जाईल. या प्रक्रियेनंतर
१७ ऑगस्ट २०२६ (सोमवार) रोजी मतदार याद्यांची प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. १७ ऑगस्ट
ते १६ सप्टेंबर दरम्यान नागरिकांना मतदार यादीबाबत आपले दावे व हरकती दाखल करता येतील,
तर १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत या सर्व हरकतींचा निपटारा केला जाईल. अखेर १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली
जाणार आहे.
गृहभेटीदरम्यान
'बीएलओ' अधिकाऱ्यांकडून मतदारांची सध्याची माहिती, सन २००२-२००४ च्या मागील SIR यादीशी
स्वतःची (Self-mapping) किंवा नातेवाईकांची जुळवणी (Progeny mapping), जन्म तारीख,
मोबाईल क्रमांक आणि ऐच्छिक आधार क्रमांक नोंदवला जाईल. प्रपत्रावर मतदाराची किंवा कुटुंबातील
प्रौढ सदस्याची स्वाक्षरी अनिवार्य असेल. जर भेटीदरम्यान घर बंद आढळले, तर अधिकारी
दारात नोटीस ठेवून संपर्क साधण्याचे आवाहन करतील. सतत तीन भेटींनंतरही मतदार अनुपस्थित
किंवा स्थलांतरित आढळल्यास, त्याचे नाव प्रारूप यादीतून वगळले जाईल. जुन्या नोंदींशी
जुळवणी न झाल्यास ओळख सिद्ध करण्यासाठी पासपोर्ट, जन्म दाखला, १० वी चे प्रमाणपत्र,
जात प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड यासारख्या १२ मान्यताप्राप्त वैध पुराव्यांपैकी एक
पुरावा सादर करावा लागेल.
तसेच, ज्या नवमतदारांचे वय १ ऑक्टोबर २०२६ पूर्वी १८ वर्षे पूर्ण होत आहे, त्यांना प्रारूप यादी प्रसिद्धीनंतर 'फॉर्म ६' भरून नाव नोंदवता येईल. नागरिक voters.eci.gov.in किंवा 'Voter Helpline App' द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात, मात्र बीएलओची प्रत्यक्ष गृहभेट अनिवार्य राहील. एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव नोंदवणे किंवा चुकीची माहिती देणे हा लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार १ वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद असलेला गुन्हा आहे.
****

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा