शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

राष्ट्रीय नमुना पाहणीला सुरुवात नागरिकांनी आवश्यक सर्व माहिती द्यावी


राष्ट्रीय नमुना पाहणीला सुरुवात
नागरिकांनी आवश्यक सर्व माहिती द्यावी

अमरावती, दि. 06  : केंद्रशासनाच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (Ministry of Statistics & Programme Implementation) अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (National Statistical Office) द्वारे दरवर्षी संपूर्ण देशात राष्ट्रीय नमुना पाहणीच्या विविध विषयावर नियोजनात्मक माहिती व आकडेवारीचे संकलन करण्याचे काम करते. या अनुषंगाने जाने-2020 ते डिसेंबर-2020 या कालावधीत राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 78 व्या फेरीमध्ये "देशांतर्गत पर्यटनावरील खर्च" व ''बहुविध निर्देशांक पाहणी' या विषयावर विस्तृत माहिती गोळा केली जाणार असून महाराष्ट्रामध्ये राज्य नमुन्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत असलेल्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत केली जाणार आहे. 78 व्या फेरीमार्फत गोळा करण्यात येणाऱ्या माहितीचा उपयोग हा पर्यटनाचे देशाच्या आर्थिक स्थितीमधील महत्व, पर्यटनाशी निगडीत विविध क्षेत्रामधील रोजगार निर्मिती, मागास वर्गीयांचा विकास या सारख्या विविध विषयाकरिता, तसेच United Nation ने ठरवून दिलेल्या शाश्वत विकास ध्येय 2030 च्या अनुषंगाने देशस्तरावरील काही महत्वाची निर्देशांक काढण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे.
अमरावती विभागातील सर्व नागरिकांनी, महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत येणाऱ्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामधील अधिकारी/कर्मचारी यांना माहिती गोळा करण्यास सहकार्य करुन आवश्यक व योग्य माहिती द्यावी, असे आवाहन सहसंचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, प्रादेशिक कार्यालय, अमरावती यांनी केले आहे.
000000





मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

शासकीय आश्रम शाळेवर शिक्षक पदभरती प्रक्रिया पात्र उमेदवारांची चाचणी परिक्षा 9 रोजी


शासकीय आश्रम शाळेवर शिक्षक पदभरती प्रक्रिया
पात्र उमेदवारांची चाचणी परिक्षा 9 रोजी

अमरावती, दि. 04 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयाकडून शासकीय आश्रमशाळेवर संगणक शिक्षक व कला कार्यानुभव शिक्षक पदांवर कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. पदभरतीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधून संगणक शिक्षक पदासाठी 114 उमेदवार व कला कार्यानुभव शिक्षक पदासाठी 144 प्रात्र उमेदवारांची यादी कार्यालयात प्रसिध्द करण्यात आली असून पात्र उमेदवारांची चाचणी परिक्षा रविवार, दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 12.30 या वेळेत सिताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिव्हील लाईन येथे घेण्यात येणार आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र परिक्षेच्या तीन दिवस पूर्वी इ-मेलवर प्राप्त न झाल्यास कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावे असे प्रकल्प अधिकारी, यांनी कळविले आहे.
****






शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे सौरउर्जा तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे आयोजन


शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे
सौरउर्जा तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे आयोजन

अमरावती, दि. 4 : ग्रामीण अल्प शिक्षीत युवक व युवतींना स्वयंरोजगारातून स्वावलंबी होता यावे यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्रालय, व केंद्रिय प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलीटेक्निक योजना शासकीय तंत्रनिकेतन,अमरावती येथे राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत स्वंयरोजगारासाठी उपयुक्त तांत्रिक कौशल्य व सौर उर्जेवर आधारित 15 दिवस कालावधीचे नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन संस्थेत करण्यात येत आहे.
 प्रशिक्षणात नाव नोंदविण्यासाठीचे अर्ज कार्यालयामध्ये उपलब्ध असून या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी वयाची अट नाही. मुलाखत पद्धतीने प्रशिक्षणार्थ्याची निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलीटेक्निक योजना कार्यालय, मुलींचे वसतीगृहासमोर, शासकीय तंत्रनिकेतन परीसर गाडगे नगर, अमरावती येथे संपर्क साधावा, असे संस्थेचे प्राचार्य डॉ. आर. पी. मोगरे व योजनेचे समन्वयक प्रा. एस. जे. गायकवाड यांनी कळविले आहे.
00000


सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०

शासकीय आश्रम शाळेवर शिक्षक पदभरती प्रक्रिया


शासकीय आश्रम शाळेवर शिक्षक पदभरती प्रक्रिया
पात्र उमेदवारांची चाचणी परिक्षा 9 रोजी

अमरावती, दि. 03 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयाकडून शासकीय आश्रमशाळेवर संगणक शिक्षक व कला कार्यानुभव शिक्षक पदांवर कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. पदभरतीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधून संगणक शिक्षक पदासाठी 114 उमेदवार व कला कार्यानुभव शिक्षक पदासाठी 144 प्रात्र उमेदवारांची यादी कार्यालयात प्रसिध्द करण्यात आली असून पात्र उमेदवारांची चाचणी परिक्षा रविवार, दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 12.30 या वेळेत सिताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिव्हील लाईन येथे घेण्यात येणार आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र परिक्षेच्या तीन दिवस पूर्वी इ-मेलवर प्राप्त न झाल्यास कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावे असे प्रकल्प अधिकारी, यांनी कळविले आहे.
****






महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी कृषीकर्ज खात्याची तातडीने नोंदणी करावी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल




महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी
कृषीकर्ज खात्याची तातडीने नोंदणी करावी
-          जिल्हाधिकारी शैलेश नवाल
अमरावती, दि. 3 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया एक फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. ही माहिती सात फेब्रुवारीपर्यंत पूर्णत: भरण्यात यावी, तसेच यात काही अडचणी येत असल्यास याबाबत जिल्हा प्रशासनास अवगत करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात आज महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया, तसेच या प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी बँकेच्या प्रतिनिधीकडून जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरू शकतील अशा खातेदाराची बँकनिहाय माहिती घेतली. काही बँका एकत्रितपणे नागपूर किंवा मुंबई येथून शेतकऱ्यांची नावे नोंदणी करीत आहेत. यामध्ये जिल्ह्यातील किती खातेदारांची नावे नोंदणी करण्यात आली, याची माहिती कळविण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांची माहिती नोंदविण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत कालावधी असला तरी सात फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण नावे नोंदविण्यासाठी प्रयत्न करावे. नावे पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी येत असलेल्या अडचणी जिल्हा प्रशासनास सांगाव्यात. या समस्या शासनास कळविण्यात येतील.
            कर्जदार शेतकरी स्वत:हून बँकांना माहिती देत आहेत. त्यामुळे आलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांची माहिती व्यवस्थित भरावी, यातून कोणताही पात्र लाभार्थी सुटू नये, याची खबरदारी बँकांनी घ्यावी. शेतकरी पात्र असून त्यांची नोंदणी झाली नसल्याचे प्रकार समोर आल्यास, अशा प्रकरणी बँकांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. ज्या अडचणी बँकस्तरावर सोडविणे शक्य आहे, अशा सर्व समस्या त्याच ठिकाणी सोडवाव्यात, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.
00000


मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

अमरावती येथे विभागीय कार्यालयांसाठी स्वतंत्र इमारती
-उपमुख्यमंत्री अजित पवार
*पोलिसांच्या वाहनासाठी तरतूद
*निकषानुसार वार्षिक नियोजनचा निधी
*उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याच्या सूचना
अमरावती, दि. 28 : अमरावती येथे विभागीय प्रशासकीय कार्यालय, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, विशेष पोलिस महानिरीक्षक आदी कार्यालये जुन्याच इमारतीमध्ये आहेत. या कार्यालयांच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतील येत्या वर्षांच्या प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी येथील नियोजन भवनात बैठक घेण्यात आली. यावेळी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, अकोलाचे पालकमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पियूष सिंह आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, अमरावतीसह अकोला, बुलडाणा येथील शासकीय कार्यालये जुन्या इमारतींमध्ये आहेत. अमरावती येथील विभागीय कार्यालये विविध ठिकाणी तसेच जुन्या जागेत आहेत. त्यामुळे ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी असावीत, यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पोलिस विभागातील विभागीय कार्यालयांच्या स्वतंत्र इमारतींसाठीही निधी देण्यात येतील.
राज्यातील सर्व जिल्ह्यांना लोकसंख्या, ग्रामीण लोकसंख्या, जिल्ह्याचे क्षेत्रफळ, मानव विकास निर्देशांक आदी निकषांनुसार जिल्हा वार्षिक योजनेंत देण्यात येणारा निधी कळविण्यात आला आहे. या निधीच्या मर्यादेतच आराखडा तयार करण्यात यावा, जिल्ह्याच्या विकासासाठी देण्यात येणाऱ्या एकत्रित निधीपैकी वीस टक्के निधी शाळांच्या बांधकामासाठी द्यावा लागणार आहे. अमरावती आणि अकोला येथील विमानतळाचा विकास जलदगतीने होण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. मनरेगामधून शाळा खोल्या बांधकाम करण्यासाठी येत्या काळात परवानगी देण्यात येणार आहे. शाळांच्या बांधकामासाठी काही ठिकाणी स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या संस्थांची विश्वासार्हता तपासावी, त्यानंतरच त्यांना बांधकामाची परवानगी देण्यात यावी.
वन विभागाच्या आक्षेपामुळे रस्ते आणि विजेची कामे करण्यात येत असलेली अडचण दूर करण्यासाठी नागपूर येथे सर्व यंत्रणांची एकत्रित बैठक घेऊन हे प्रश्न मार्गी काढण्यात येतील. विभागातील लोणार, सिंदखेड आणि शेगाव विकास आराखड्यांची कामे योग्य पद्धतीने व्हावीत. लोणार सरोवराजवळील अतिक्रमण हटविण्यासोबतच सांडपाण्यास पायबंद घालावा, ही कामे जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात करण्यात यावीत. बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्यानुसारच हा प्रकल्प पूर्णत्वास येईल.
जलसंधारणाची कामे करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना आवश्यक असलेली इंधनाची सुविधा जिल्हा योजनेतून करण्यात यावी. कमी खर्चात पांदन रस्ते तयार करण्यासाठी अकोला जिल्ह्याला प्रायोगिक तत्वावर 15 कोटी रूपये देण्यात येतील. हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यातील इतर भागातही हा उपक्रम राबविण्यात येईल. कामांवरील खर्च कमी करण्याबरोबरच राज्याचे उत्पन्न वाढविण्याचे स्त्रोत लोकप्रतिनिधींनी सूचवावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी अत्यावश्यक सेवेतील पदे भरण्याच्या प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. तसेच जिल्हास्तरावरील सर्वच ठिकाणी पोलिस विभागातील वाहने जुनी झालेली आहे. त्या सर्वांना नवीन वाहनांसाठी निधी देण्यात येतील. जिल्हा वार्षिक योजनेमधून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग योग्यरित्या करावा. या निधीचा उपयोग आकांक्षित जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी व्हावा, यासाठी चालू वर्षातील संपूर्ण नियतव्यय उपलब्ध करून देण्यात येतील. अधिकारी यांनी सकारात्मकतेने कार्य करावे. या निधीचा संपूर्ण विनियोग करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
00000










शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०

वाढीव गुण प्रस्ताव सादर करण्यास 25 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ


वाढीव गुण प्रस्ताव सादर करण्यास
25 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 24 : शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविण्याचा व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण (अतिरिक्त गुण) देण्याचे प्रस्ताव विभागीय मंडळाकडे सादर करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी पर्यंत देण्यात आली होती. मार्च 2020 मधील इयत्ता 10 वी मध्ये प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे प्रस्ताव शाळेकडे सादर करण्यास 15 फेब्रुवारीपर्यंत, तर शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. असे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.
****

मंगळवार, २१ जानेवारी, २०२०

वित्त, नियोजन मंत्र्यांकडून मंगळवारी जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा




वित्त, नियोजन मंत्र्यांकडून मंगळवारी
जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

अमरावती, दि. 21 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त, नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी, दि. 28 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता अमरावती विभागातील जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे.
ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार विभागातील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2020-21 करिता जिल्हानिहाय बैठका घेतील. या बैठकीला संबंधित विभागप्रमुखांनी उपस्थित राहावे, असे नियोजन उपआयुक्त यांनी कळविले आहे.
****


शनिवार, १८ जानेवारी, २०२०

रेल्वे स्टेशन ते अंध विद्यालयापर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा


रेल्वे स्टेशन ते अंध विद्यालयापर्यंत
नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

अमरावती, दि. 18 : अमरावती-चांदूररेल्वे या राष्ट्रीय महामार्गाच्या रेल्वे स्टेशन ते अंध विद्यालयापर्यंत कॉक्रीट रोड बांधकाम टप्प्याटप्प्यामध्ये करण्यात येत आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत जेल क्वार्टर ते चपराशीपूरा चौक यामधील उजव्या बाजूचे 95 मीटर लांब रस्त्याचे रुंदीकरण काम सुरु आहे. हा रस्ता दि. 10 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2020 पर्यंत डाव्याबाजूने असलेल्या पुर्ण झालेल्या दोन पदरामधून वाहतूक सुरु राहिल. यासाठी पोलीस विभागाकडून परवानगी घेण्यात आली असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
****

शोभिवंत मत्स्य्‍व्यवसायासाठी 22 ते 24 जानेवारी प्रशिक्षण


शोभिवंत मत्स्य्‍व्यवसायासाठी
22 ते 24 जानेवारी प्रशिक्षण

अमरावती, दि. 18 : शोभवंत मत्स्यव्यवसाय उद्योग यशस्वीरित्या करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी दि. 22 ते 24 जानेवारी दरम्यान कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण इ-क्लास, विद्याभारती महाविद्यालय, कॅम्प येथे होणार असून मुंबई येथील तारापोरवाला मत्स्यालयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
राष्ट्रीय मत्स्यिकी विकास महामंडळ, हैदराबाद, मत्स्यपालन विभाग आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या वतीने नीलक्रांती योजनेअंतर्गत शोभिवंत मत्स्यव्यवसायाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण सर्वांसाठी विनामूल्य असून प्रशिक्षणासाठी प्रवेश मर्यादीत राहणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ विभागातील नवउद्योजक, तरुण-तरुणी व मत्स्यव्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सर्वांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0721-2662801 व 9960563107 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय विजय शिखरे यांनी केले आहे.
****