शुक्रवार, २ जून, २०२३

गुरुकुंजात प्रार्थनेला वन मंत्र्यांची उपस्थिती विवेकपूर्ण जीवनपद्धतीसाठी राष्ट्रसंतांचे विचार अंगिकारणे आवश्यक - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

 गुरुकुंजात प्रार्थनेला वन मंत्र्यांची उपस्थिती

 

विवेकपूर्ण जीवनपद्धतीसाठी राष्ट्रसंतांचे विचार अंगिकारणे आवश्यक

- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

 

अमरावती, दि. 20 : धावपळीच्या  व स्पर्धेच्या आजच्या युगात  मनःशांती, तणाव निरसन, विवेकपूर्ण जीवनपद्धतीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार अंगिकारणे आवश्यक आहे. ग्रामगीतेचे नियमित पठण, प्रार्थना व भजन आदींचा समावेश आपल्या जीवनशैलीत व्हावा, असे आवाहन वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

श्री. मुनगंटीवार यांनी आज पहाटे गुरुकुंज मोझरी आश्रमाला भेट देऊन सामुहीक प्रार्थनेत सहभाग घेतला. येथील सर्व तीर्थकुंडात मंत्री श्री. मुनगंटीवार यांचे वडील कै. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या अस्थिंचे विसर्जन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, उप सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, सरचिटणीस जर्नादन बोथे गुरुजी, सुभाष सोनारे, निवेदिता चौधरी यांच्यासह आश्रमाचे सदस्य व सेवेकरी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी मंत्री महोदयांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सामुहीक प्रार्थनेत सहभाग घेऊन ध्यानसाधना केली. कारे धरी गिरीधारी अबोला, नको वेळ लावू प्रभू भेटण्याला, सबका भला करो, यही आवाज कहेंगे या भजनगीतांचे गायन झाले. भगवद्गगीतेच्या अध्यायाचे पठन, प्रभु श्रीरामाचा जयघोष झाला.

यावेळी मंत्री महोदयांनी श्री गुरुदेव जीवन विद्या सुसंस्कार व छंद शिबिराला व श्री गुरुदेव आयुर्वेदीक महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली. या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी शिबिरातील विद्यार्थ्यांव्दारे खंजिर वाजवून हनुमान चालीसाचे सादरीकरण झाले. खंजीराच्या वादन ऐकून मन प्रसन्न झाले. ते म्हणाले, आनंदाचा महामार्ग दाखवणिाऱ्या राष्ट्रसंतांच्या भूमीत आपण जन्मला आहात. तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. सुदृढ मनासाठी व सकारात्मक विचारांसाठी भजन आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

 

0000

जिल्ह्याचा विकास आराखडा साकार करण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे - प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे

 जिल्ह्याच्या विकासप्रक्रियेत सहभागी व्हा! जिल्हा प्रशासनाचे नागरिक व संस्थांना आवाहन

 

जिल्ह्याचा विकास आराखडा साकार करण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे

-         प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे

 

अमरावती, दि. 22 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाला 2047 पर्यंत ‘विकसित भारत @2047’  करण्याचा संकल्प केंद्र शासनाने केला आहे. त्यासाठी स्थानिक वैशिष्ट्ये व गरजा लक्षात घेऊन जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. हा आराखडा परिपूर्ण होण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक, संस्था व आस्थापनांनी त्यांच्या सूचना, संकल्पना, अभिप्राय प्रशासनाला कळविण्याचे आवाहन प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी केले आहे.

 

केंद्र शासनाने 2047 पर्यंत भारत विकसित देश करण्याचा संकल्प केला असून, सन 2025-26 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्द‍िष्ट जाहीर केले आहे. विकसित भारताची ही उद्द‍िष्टे साध्य करताना राज्यांचा विकास गतीने होणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलीयन डॉलर, सन 2037 पर्यत 2.5 ट्रिलीयन डॉलर व सन 2047 पर्यंत 3.5 ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे राज्याचे मुख्य ध्येय आहे.

हे उद्दिष्ट गाठण्यासाठी विकासाचे केंद्र म्हणुन जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक विकासासाठी व सर्वसमावेशक दृष्टिकोन विकसित करणे शक्य होईल. जिल्हाकेंद्री नियोजनामुळे शाश्वत विकास उद्द‍िष्टे साध्य करण्यासही मदत होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती आण‍ि नैसर्गिक संसाधनांमधील असमानता, तसेच जलद शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा विकास आराखडा आकारास येणार आहे. आराखडा परिपूर्ण होण्यासाठी लोकसहभागही तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील आस्थापना, संस्था व नागरिकांनी आराखडा तयार करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे. 

अमरावती जिल्ह्यायातील विकासाच्या संभाव्य संधी ओळखून संभाव्य गुंतवणुकीला व विकासाला चालना देऊ शकणा-या बाबींविषयी नागरिकांनी सूचना द्याव्यात. विकासासाठी कृषी व संलग्न सेवा, उद्योग (वस्तुनिर्माणसह), जलसंधारण, पायाभुत सुविधा, शिक्षण,आरोग्य,कौशल्य विकास, पर्यटन आदी विविध क्षेत्रांची वृध्दी होण्याच्या अनुषंगाने संकल्पना, सूचना द्याव्यात. याबाबतच्या मार्गदर्शक सुचना  https://drive.google.com/file/d/1erHWFXadeK3AasoN28K_sDCuwSZfZjfF/view?usp=share_link  या लिंकवर पाहता येतील. संस्था, आस्थापना व नागरिकांनी अभिप्राय dpoamt.amravati@gmail.com या ई- मेलवर लेखी स्वरुपात दि.5 जूनपर्यंत कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

वन विभागातर्फे जैवविविधता दिवस साजरा

 वन विभागातर्फे जैवविविधता दिवस साजरा

अमरावती, दि. 22 : जैवविविधतेबाबत जागरुकता वाढविण्यासाठी ‘युनो’तर्फे 22 मे रोजी आंतरराष्ट्रीय जैविविधता दिवस जाहीर करण्यात आला आहे. त्यानिमित्त अमरावतीत वनविभागातर्फे ‘जैवविविधता समृद्धी : करारापासून कृतीपर्यंत’ या विषयावर कार्यक्रम झाला.   

मुख्य वनसंरक्षक जी. के. अनारसे अध्यक्षस्थानी होते. वनराईचे अध्यक्ष मधु घारड,, मानद वन्यजीव रक्षक सावन देशमुख, डॉ. जयंत वडतकर, उपवनसंरक्षक अर्जुना.के. आर. अक्षय गजभिये, चंद्रशेखरन बाला, विभागीय वनअधिकारी.शरद करे आदींनी या कार्यक्रमात जैवविविधेचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. अमरावती वनवृत्ताअंतर्गत येणा-या अमरावती, अकोला, बुलडाणा, मेळघाट आदी प्रादेशिक विभागातील अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार यावेळी करण्यात आला.

संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यासाठी वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांना आहारातील भरडधान्याचे महत्व पटवून देण्यासाठी भरडधान्याचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले. सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांनी आभार मानले.   

 

0000000

जप्त केलेली वाळू तत्काळ आवास योजनेच्या लाभार्थ्यांना वितरीत

 जप्त केलेली वाळू तत्काळ आवास योजनेच्या लाभार्थ्यांना वितरीत

महसूल प्रशासनाची गतिमान कार्यवाही

अमरावती, दि. 28 : चांदूर बाजार येथील महसूल पथकाने तालुक्यातील बेलुरा गढी येथे आज 42 ब्रास अवैध रेतीसाठा जप्त केला. आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पाच ब्रासपर्यंत वाळू विनामूल्य देण्याची तरतूद आहे. त्यानुसार घरकुल लाभार्थ्यांना ही वाळू तत्काळ वितरितही करण्यात आली.

अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूकीला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या निर्देशानुसार विविध तालुक्यात महसूल पथकांकडून गतिमान कार्यवाही होत आहे. बेलुरा गढी येथे अवैध रेतीसाठा असल्याची माहिती मिळताच चांदूर बाजार तहसील पथकाने आज साडेदहाच्या सुमारास तिथे पोहोचून कारवाई केली. त्यात 42 ब्रास वाळू पंचांसमक्ष जप्त करण्यात आली.

जप्त केलेली वाळू चोरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे पथकाने तुळजापूर गढी येथील ग्रामपंचायत सचिवांकडून घरकुल लाभार्थ्यांची यादी मिळवली. या यादीतील लाभार्थ्यांना उपलब्ध वाळूमधून त्यांच्या मागणीनुसार वाळू वितरित करण्यात आली. एकूण 17 लाभार्थ्यांना ही 42 ब्रास वाळू वितरित करण्यात आली.

प्रधानमंत्री आवास योजना व इतर राज्य पुरस्कृत आवास योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील व्यक्तींना विनामूल्य पाच ब्रास वाळू मिळण्याची तरतूद आहे. त्यानुसार ही कार्यवाही झाली. पथकात उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांच्या मार्गदर्शनात ना. तहसीलदार प्रथमेश मोहोड, मंडळ अधिकारी एस. आर. धांडे, तलाठी अतुल पाटील, हरिष लळित, स्वप्नील पचारे यांचा समावेश होता.

वाळूचे अवैध उत्खनन रोखण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक कुठेही होता कामा नये. उपविभागीय अधिका-यांनी स्वत: या बाबीचे संनियंत्रण करावे. भरारी पथकांनी सातत्याने निगराणी ठेवावी. तपासणी व कार्यवाहीत हयगय होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

०००

शेतक-यांच्या तक्रारी निवारणासाठी प्रतिसादात्मक कार्यपद्धती विकसित करा - जिल्हाधिकारी विजय भाकरे

 शेतक-यांच्या तक्रारी निवारणासाठी प्रतिसादात्मक कार्यपद्धती विकसित करा  

 -         जिल्हाधिकारी विजय भाकरे

 

अमरावती, दि. 29 : बी-बियाणे, खते आदी कृषी निविष्ठांची उपलब्धता, पीक कर्ज, पीक विमा आदींबाबत शेतकरी बांधवांच्या अनेक तक्रारी प्राप्त होतात. त्यांचे तत्काळ निराकरण करावे व तक्रारकर्त्यांना कार्यवाहीची माहिती मिळून त्याचे समाधान होऊ शकेल, अशी प्रतिसादात्मक कार्यपद्धती (रिस्पॉन्सिव्ह प्रोसिजर) अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने तत्काळ विकसित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी आज येथे दिले.   

जिल्हाधिका-यांना दैनंदिन कामकाजात प्राप्त होणा-या क्षेत्रीय स्तरावरील निवेदने व तक्रारींत साधारणत: 30 टक्के निवेदने पांदण रस्ता, वहिवाट रस्ता, निविष्ठा पुरवठा, पीक कर्ज, विमा आदी शेतीसंबंधित असतात. निवेदने देण्यासाठी शेतकरी बांधव खेड्यापाड्यातून जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतो. तालुका पातळीवरील कामे कुशल रीतीने व प्रतिसादात्मक पद्धतीने झाल्यास शेतकरी बांधवांना जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गरज भासणार नाही व तक्रारींचेही वेळेत निराकरण होईल, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

निवेदने अथवा तक्रारी मिळाल्यानंतर वेळीच निकाली काढून कार्यवाहीची माहिती शेतकरी बांधवांना द्यावी. शेतक-यांना दूरच्या ठिकाणांहून जिल्ह्याला येण्याची गरज भासू नये.  तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे काय झाले, याची माहिती त्याला मिळाली पाहिजे. या प्रतिसादात्मक कृतीमुळे त्याला अपेक्षित कार्यवाही होणे शक्य होईल. त्यांना जिल्हास्तरावर प्रत्यक्ष निवेदन घेऊन येण्याची गरज भासणार नाही, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी कृषी विभाग, उपजिल्हा सहकार निबंधक यांना दिले आहेत.

अद्ययावत माध्यमांचा वापर करा

तक्रार निवारणासाठी कक्ष स्थापन करताना टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर, इतरही अद्ययावत माध्यमांचा वापर अधिकारी व कर्मचारी यांनी करावा.  माहिती व सातत्यपूर्ण प्रतिसाद देऊ शकेल असे ॲप विकसित करावे. व्हाटसॲप आदी सोशल मीडियाचाही वापर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

 

गंभीर प्रकरणी  जिल्हाधिकारी सुनावणी घेणार

दैनंदिन कामकाजात काही निवेदने गंभीर स्वरुपाची व त्यासंबंधी तत्काळ त्या त्या स्तरावरच निवारण होणे गरजेचे असते. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात डेस्क स्थापण्यात आला आहे. त्याद्वारे महत्वपूर्ण निवेदने, तक्रारींवर कार्यवाही होईल. निवेदनात नमूद तक्रारीशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची त्यासंदर्भात प्रत्यक्ष सुनावणी जिल्हाधिका-यांकडून घेतली जाणार आहे. 

 

रस्ते निवाडा कार्यपद्धतीत अचूकतेसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण

क्षेत्रीय स्तरावर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अति. तहसीलदार व संबंधित अधिकारी यांच्याकडे पांदण रस्ता, शिव रस्ता, वहिवाट रस्ता आदी रस्त्याशी संबंधित प्रकरणे व अपील घेतली जातात. ही प्रकरणे न्यायपद्धतीने सर्व बाबी लक्षात घेऊन निकाली काढणे आवश्यक असते. याबाबतच्या कार्यपद्धतीत सुधारणा आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन संबंधित यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांची जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

000


दिव्यांग व दुर्बल घटकांच्या उत्थानाकरीता मनरेगा योजना लाभदायी -दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चुभाऊ कडू

 दिव्यांग व दुर्बल घटकांच्या उत्थानाकरीता मनरेगा योजना लाभदायी

-दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चुभाऊ कडू

 

रोहयो विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांच्या कार्याचे कौतुक

 

अमरावती, दि. 29 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेचा लाभ घेऊन शेतकरी बांधवांनी व भूमिहीन कुटुंबांनी आर्थिकरित्या समृध्द व्हावे. दिव्यांग व दुर्बल घटकांच्या उत्ताथासाठी मनरेगा योजना लाभदायी असल्याचे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चुभाऊ कडू यांनी केले.

मनरेगा योजनेंतर्गत दिव्यांग, विधवा तसेच दिव्यांग महिला शेतकरी आदींच्या शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर वृक्ष लागवड, फळबाग लागवड करणे तसेच आंबा अतिधन लागवड ते निर्यात या विषयावर तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शनपर कार्यशाळा कुरुळपूर्णा येथील विठ्ठन जिनींग येथे नुकतीच सपन्न झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार बच्चुभाऊ कडू व रोहयो विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आंबा लागवडी तज्ज्ञ डॉ.भगवानराव कापसे तसेच क्षमता बांधणी सदस्य सुमित गोरले, राम पराडकर, श्रीमती प्रियंका ढवळे, शक्तिकुमार तायडे, तुषार लोखंडे, श्रीमती सीमा ताकसांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री. कडू म्हणाले की, रोहयो विभागाच्या 25 मेच्या शासन निर्णयानुसार मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायती मार्फत रोपवन संरक्षण व संगोपन योजना प्रायोगिक तत्त्वावर अचलपूर आणि चांदुरबाजार तालुक्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी रोहयो विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांचे त्यांनी अभिनंदन केले व शासनाचे आभार मानले. श्री. नंदकुमार यांनी शेतकऱ्यांचा सर्वांगिण हिताचा विचार करुन तत्काळ शासन निर्णय निर्गमित केला. अशाप्रकारे शेतकरी हिताचा विचार करणारे व कृषी विकासाबाबत दूरदृष्टी असणारे ते एकमेव सचिव आहेत, असे कौतुक श्री. कडू यांनी अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांच्याप्रती केले.

          कार्यशाळेत मनरेगा योजनेत क्षमता बांधनी करताना तज्ज्ञ व्यक्तींकडून मनरेगाची ओळख, रोहयो म्हणजे काय? मनरेगा म्हणजे काय? व मनरेगाची उ्दिष्टे तसेच वैशिष्टये, अगोदरची रोहयो  योजना आणि आताची मनरेगा यातील फरक या संदर्भात उपस्थित शेतकरी बांधवांना, नागरिकांना सविस्तर माहिती दिली. मनरेगा अंतर्गत शेतकरी, भूमिहीन, व्यावसायिक कुटूंबासाठी तसेच दिव्यांग महिलासाठी, बचतगटांव्दारे कोणती कामे केली जाऊ शकतात याबाबत मार्गदर्शन केले.

          मनरेगाच्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक कामातून शाश्वत स्वरूपाची मत्ता निर्माण करून सुविधा संपन्न होण्यासाठी मनरेगाची मदत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मनरेगा योजने अंतर्गत कामे करून सुविधा संपन्न झालेल्या कुटुबांची यशोगाथाची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. त्यात गिरगुटी येथील सार्वजनिक वृक्ष लागवडीतून महिला सक्षमीकरण, खोमारपाडा येथील शेततळे आणि मत्स्य व्यवसाय, जामखेड तालुक्यातील पेरू बागेच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी या तीन शेतकऱ्यांचा यशोगाथा उपस्थितांना दाखविण्यात आल्या.

मनरेगातर्फे अभिसरण आणि संयोजन, एनजीओ संस्थांची मदत, फळबाग लागवडीसाठी घटकनिहाय दिला जाणारा खर्च, किमान व कमाल क्षेत्र मर्यादा, अर्ज करण्यासाठी लागणारी  कागदपत्रे, लागवडीसाठी कार्यान्वयन यंत्रणा, लागवडीसाठी लागणारी फळझाडे, वृक्ष, औषधी पिके/फुल, मसाला पिकांची माहिती, पिकनिहाय अनुदान रक्कम आदीबाबत कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. फळबाग लागवडीची पूर्व तयारी मध्ये जमिनीची निवड, हवामान क्षेत्रानुसार लागवड, कलम /रोपाची उपलब्धता, फळबाग लागवडीच्या विविध पद्धती, लागवडीनंतर काळजी इत्यादीबाबत क्षमता बांधणी सदस्य सुमित गोरले, राम पराडकर, श्रीमती प्रियंका ढवळे, शक्तिकुमार तायडे, तुषार लोखंडे, श्रीमती सीमा ताकसांडे आदींनी उपस्थितांना मागर्दर्शन केले.

डॉ.भगवानराव कापसे यांनी आंबा लागवडीच्या विविध पद्धती, विविध जाती, देशानुसार उत्पादन आणि उत्पन्न यावर मार्गदर्शन करून महाराष्ट्रामध्ये आंबा अतिधन लागवड करून उत्पादन आणि उत्पन्न मध्ये कशी वाढ करता येऊ शकते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत चांदुरबाजार व अचलपूर क्षेत्रातील दिव्यांग, विधवा, शेतकरी महिला तसेच भूमीहीन आणि पुरुष शेतकरी यांच्यासह शेकडो संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मनरेगा अंतर्गत विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. भगवानराव कापसे, मनरेगाचे क्षमता बांधणी सदस्य, चांदूरबाजारचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, रोहयो विभागाची यंत्रणा व चांदुरबाजारचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. मनरेगा योजनेच्या कार्यान्वयन यंत्रणेत काम करणाऱ्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

0000

--

वाळूचोरी व शासकीय कामात अडथळा आणणा-यांविरुद्ध गुन्हा दाखल

 वाळूचोरी व शासकीय कामात अडथळा आणणा-यांविरुद्ध गुन्हा दाखल

खनिकर्म अधिकारी पथकाची कार्यवाही

अमरावती, दि. 30 : वाळूची अवैध वाहतूक व ती रोखण्यासाठी आलेल्या शासकीय पथकाच्या कामात अडथळा आणणा-या व्यक्ती व वाहनाचे चालक, मालक यांच्याविरोधात मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा खनिकर्म अधिका-यांच्या पथकाने ही कारवाई केली.  

वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या निर्देशानुसार  जिल्ह्यात भरारी पथके नेमण्यात आली आहेत. त्यानुसार वाळूचोरांविरूद्ध दंडात्मक कारवायाही ठिकठिकाणी होत आहेत.

जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान खा. शेख यांच्यासह पथक मंगळवारी (दि. 30 मे) पहाटे पावणेतीन वाजता धामणगाव रेल्वे, मंगरूळ दस्तगीर, गोकुळसरा, दिघी महल्ले रस्त्यावरून जात असताना दिघी महल्ले गावाजवळ त्यांना वाळूने भरलेला ट्रॅक्टर व एक टिप्पर वाहन येताना दिसले. पथकाचे वाहन पाहून ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टर चालू अवस्थेत रस्त्यावर सोडून अंधारात पळ काढला. हा चालू ट्रॅक्टर पथकाच्या वाहनाच्या दिशेने येत होता. हे लक्षात घेऊन पथकाच्या चालकाने आपले वाहन मागे घेतले. पुढे तो ट्रॅक्टर पुलाच्या कड्याला जाऊन थांबला. ट्रॅक्टरमध्ये अंदाजे एक ते दीड ब्रास वाळू होती.

या वेळेत ट्रॅक्टरच्या मागून येणा-या टिप्परने रिव्हर्स घेऊन पळ काढला.  दरम्यान, एका स्कॉर्पिओ गाडी पथकाच्या वाहनाच्या दिशेने भरधाव आली व पथकाच्या वाहनाला पुढे जाण्यास काहीवेळ अडथळा निर्माण केला. पथकासोबत पोलीस कर्मचारी पाहून या स्कॉर्पिओनेही मागे जात पळ काढला. याबाबत पथकाने मंगरूळ दस्तगीर येथील ठाणेदार यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानुसार एफआयआर दाखल करून जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर मंगरूळ दस्तगीर पोलीसांकडे सोपवून पथक पुढे निघाले.

पुढील कारवाईसाठी पथक जात असताना गोकुळसरा- दिघी महल्ले कॅनॉल रस्त्यावर अंदाजे एक ते दोन ब्रास वाळू खाली पडलेली दिसून आली. दिघी महल्ले गावाकडे जात असताना एका टू व्हीलर गाडीनेही पथकाच्या वाहनाचा पाठलाग केला.

मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यात अनुप महल्ले (रा. पेठ रघुनाथपूर), सतीश देवरकर (रा. गोकुळसरा) यांच्यासह वाहन ट्रॅक्टर स्वराज्य क्र. 744 एफई चे चालक-मालक, स्कॉर्पिओ गाडी क्र. एमएच-27- 6055 चे चालक-मालक, पल्सर ब्लॅक गाडी क्र. एमएच 27- 2201 यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानुसार रेतीचोरी भारतीय दंडसंहिता कलम 379, शासकीय कामात अडथळा करून जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडी व ट्रॅक्टर पळविल्याने कलम 353, 341 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

०००

 

विभागीय मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक जुने रस्ते-पुल व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट अहवाल पंधरा दिवसांत सादर करा - विभागीय आयुक्त निधी पाण्डेय

 विभागीय मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक

 

 जुने रस्ते-पुल व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट अहवाल पंधरा दिवसांत सादर करा

 

-  विभागीय आयुक्त निधी पाण्डेय

 

अमरावती, दि. 31 : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवावी. बाधित गावांत तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत पोहोचण्याच्यादृष्टीने प्रभावी नियोजन करावे. जुने रस्ते-पुल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन त्याचा अहवाल पंधरा दिवसांत सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले.

          विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय मान्सूनपूर्व आढावा बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, उपायुक्त संजय पवार तसेच पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा  परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीव्दारे यावेळी बैठकीला उपस्थित होते.

          विभागीय आयुक्त श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मान्सून पूर्वतयारी आपापल्या जिल्ह्यात करुन ठेवावी. राज्य शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार जुने रस्ते, पुल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घ्यावे. ज्याठिकाणी दुरुस्ती करावयाची आहे त्याठिकाणी आताच दुरुस्ती करुन घ्यावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पंधरा दिवसांत सादर करण्यात यावा. नैसर्गिक आपत्ती किंवा पुरामुळे जीवित व वित्तीय हाणी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

          पावसाळ्यात काही गावांचा संपर्क तुटतो. त्यादृष्टीने उंच ठिकाणी निवारा, भोजन व्यवस्था तसेच धान्य, औषधसाठा आदी सामुग्रींची तजवीज आधीच करून ठेवावी. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलू नयेत यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी. अवकाळी पावसानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘महावितरण’ने प्रभावी नियोजन करावे. त्यानुसार पावसाळ्यातही जलद सेवा उपलब्ध होईल यादृष्टीने तयारी ठेवावी. जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष 24x7 नेहमी कार्यान्वित ठेवावीत. एसडीआरएफ तसेच एनडीआरएफ ची बचाव पथके स्थापन करुन आवश्यक साहित्यानिशी सुसज्ज ठेवावी. बचाव पथकांचे प्रशिक्षण व मॉकड्रीलही जिल्हा प्रशासनाने घ्यावी.

त्या पुढे म्हणाल्या की, प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. ब्रिटीशकालीन तलावांच्या नियंत्रणाची जबाबदारी जिल्हा परिषदेची की जलसंधारण विभागाची याबाबत स्पष्टता निर्माण होण्यासाठी ही बाब वरिष्ठ स्तरावरून तपासून स्वतंत्रपणे आदेश तत्काळ निर्गमित करण्यात येतील. नदी खोलीकरण व पुर संरक्षण भिंतीची तपासणी व आवश्यकतेनुरुप दुरुस्ती करण्यात यावी. शहरातील नाल्यांचे सफाई आदी कामे तातडीने पूर्ण करावी.जिल्हा परिषद शाळांचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेबाबत खातरजमा करावी.

धरणातील जलसाठ्याच्या नियंत्रणासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करावे. नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी (ब्लू लाईन, रेड लाईन) सीमांकन करावे, तसेच पूर प्रतिबंधक समिती स्थापन करावी. धरणातील पाणी सोडताना तहसीलदार, पोलीस व कंट्रोलरूमला 24 तास आधी कळवावे. सर्व प्रकल्पाची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी. बिनतारी यंत्रणा कार्यान्वित करावी. हवामान खात्याकडून इशारे प्राप्त होताच सर्वदूर माहिती जलद गतीने पोहोचवावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे, बचाव पथकांची मोटर बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग्ज, रोप बंडल, सर्च लाईट, मेगा फोन, ग्लोव्हज, रेनकोट, स्कूबा डायव्हिंग कीट, हेल्मेट आदी विविध साधने, बचाव पथकांची मॉक ड्रिल, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, विज पुरवठा, नियंत्रण कक्ष, विजेचे संकेत देणारे दामिनी ॲप, नदी-नाल्यांची सफाई व खोलीकरण आदी बाबीं संदर्भात पूर्वतयारी संबंधित जिल्हाप्रमुखांनी यावेळी बैठकीत माहिती दिली.

0000

--

दहावीचा निकाल आज शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

 दहावीचा निकाल आज

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

 

        अमरावती दि. 1 :  मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल 2 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे निकाल पाहता येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेचा निकाल महामंडळाने अधिकृत केलेल्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे.

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण या संकेतस्थळावर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळ खालीलप्रमाणे आहेत.

1) www.mahresult.nic.in

2) http://sscresult.mkcl.org

3) https://ssc.mahresults.org.in

4) https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board

5) https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-10th-result-2023

6) http://mh10.abpmajha.com

            यासोबतच  mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

          ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यानं संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://verification.mh-ssc.ac.in) स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासंदर्भात आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. गुण पडताळणीसाठी शनिवार, दि. 3 जून ते सोमवार दि. 12 जूनपर्यंत व छायाप्रतीसाठी शनिवार, दि. 3 जून ते गुरुवार दि. 22 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. तसेच ॲानलाईन पध्दतीने शुल्क डेबीट कार्ड/क्रेडीट कार्ड/युपीआय/नेट बॅकींग याव्दारे भरता येईल, अशी माहिती अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

0000

विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी शिक्षण मंडळाकडून समुपदेशकांची नियुक्ती संपर्कसाठी भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर

 विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी

शिक्षण मंडळाकडून समुपदेशकांची नियुक्ती

 

संपर्कसाठी भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर

 

अमरावती, दि. 2  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10वी) ची लेखी परीक्षा दि. 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आली होती.

सदर परीक्षेचा निकाल दि. 2 जून, 2023 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला असून  निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरु करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने  समुपदेशकांचे भ्रमणध्वनी पुढीलप्रमाणे देण्यात आले आहे.

7386400970, 8308755241, 9834951752, 8421150528, 9404682716, 9373546299, 8999923229, 9321315928, 7387647902 , 8767753069

वरीलप्रमाणे समुपदेशकांचया भ्रमणध्वनी क्रमांकावर परीक्षेच्या निकालापासून 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना नि:शुल्क आवश्यक ते समुपदेशन करण्यात येईल. याची विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे राज्य मंडळ, पुणेच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

000000