सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

सहकारी संस्थांनी नाविन्यपूर्ण उपक्रमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे
 -         सहकार मंत्री सुभाष देशमुख
  
 कृषी प्रक्रिया उद्योगासाठी व्याज अनुदान देणार


अमरावती, दि. 26 : राज्याच्या आर्थिक विकासात सहकार चळवळीचा मोठा वाटा आहे. यापुढेही सहकारी संस्थांची जोमदार वाटचाल व्हावी म्हणून बळकटीकरणासाठी संस्थांनी शासकीय अनुदानावर पूर्णपणे विसंबून राहू नये. तर, स्वत:च्या योगदानातून नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून संस्थेचा विकास साधावा, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संघातर्फे विदर्भ को- ऑप मार्केटिंग फेडरेशनच्या सहकार्याने सहकारी संस्थांसाठी कार्यशाळेचे आयोजन अभियंताभवन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. देशमुख बोलत होते.  आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार यशोमती ठाकूर,  फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र शिंगणे, संचालक एस. हरीबाबू, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, भाजपा पदाधिकारी निवेदीता दिघळे तसेच अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले की,  राज्य सहकारी संघाची निर्मिती राज्यघटनेनुसार झाली आहे. तेव्हापासून संघाद्वारे विविध सहकारी संस्थांच्या पदाधिकारी, कर्मचारी यांना संस्थांच्या बळकटीकरण आणि पारदर्शक व्यवहारासाठी प्रशिक्षण देण्यात येते.  संघाची शताब्दी साजरा होणे ही राज्यासाठी गौरवाची बाब आहे. राज्यात ज्या-ज्या ठिकाणी सहकाराचा विकास झाला आहे, त्या भागाचा सर्वांगीण विकास झाला आहे. सहकारी संस्थांच्या विकासासाठी सहकार विभागाकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी देऊन आढावा घेण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
विदर्भातील पिकांच्या उत्पादनाविषयी आढावा घेऊन ते पुढे म्हणाले की, विदर्भात सोयाबीन, तूर, कापूस व कडधान्य पिकांची उत्पादन क्षमता चांगली आहे. या भागात दरवर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले होते. शेतकऱ्यांनी सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. सहकारी संस्थांनीसुध्दा या क्षेत्रात प्रक्रिया उद्योगासाठी पुढे येऊन कृती आराखडा तयार करुन शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. यासाठी व्याज अनुदान देण्यात येईल, असे आश्वासन श्री. देशमुख यांनी दिले.
राज्यात बचत गटाची संख्या चार लाख आहे. या गटांना प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.  बचत गटांनी निर्माण केलेल्या मालास बाजारपेठ उपलब्ध करुन दिल्यास नक्कीच प्रगती होईल. फेडरेशनमध्ये आलेल्या मालाची खरेदी-विक्री प्रक्रियेमध्ये बोगसपणा रोखण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. तूर विक्रीसाठी सुध्दा ऑनलाईन पध्दती महत्वपूर्ण ठरली आहे,  असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
आमदार अनिल बोंडे यांनी अमरावती विभागातील सहकारी संस्थांच्या मागण्यांविषयी व प्रशिक्षणा संदर्भात मागणी मांडली.  डॉ. शिंगणे यांनीही मनोगत व्यक्त केले. श्री. इंदलकर यांनी आभार मानले.  


शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७

 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भिमटेकडी, बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे लोकार्पण
                                             -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील
* भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी 2 कोटीचा निधी प्राप्त

अमरावती 27- भिमटेकडी व शिवटेकडींचे सौंदर्यीकरण पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या 2 कोटींच्या निधीतून करण्यात येत आहे. काम पूर्ण झाल्यानंतर भिमटेकडी स्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी दिली.
शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही स्थळांची पाहणी पालकमंत्री महोदयांनी आज केली. यावेळी त्यांच्या समवेत मनपा आयुक्त हेमंत पवार, बौध्द धम्म प्रचार समितीचे पदाधिकारी श्री. आकोडे, तायडे, शहारे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर, नगरसेवक दिनेश बुब, आर्कीटेक्चर श्री. खंडारकर, कंत्राटदार श्री. अग्रवाल आदी उपस्थित होते.
            प्रारंभी पालकमंत्री महोदय व इतर मान्यवरांनी भिमटेकडीला भेट दिली. तेथील परिसराची, बांधकामाची पाहणी त्यांनी केली. सदर वास्तुचे सद्यस्थितीत 75 टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती मनपा आयुक्त यांनी दिली. भिमटेकडीची उर्वरित स्थापत्य कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे आदेश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. भिमटेकडी येथील वास्तू तयार झाल्यावर या पवित्र स्थळाची पवित्रता कायम राहील यासाठी संस्थेने व नागरिकांनी दक्षता घ्यावी. हा परिसर रमनिय व सुंदर होण्यासाठी मोठया प्रमाणात झाडे लावावीत. विद्यार्थ्यांना या स्मारकाच्या माध्यमातून प्रेरणा मिळण्यासाठी नवीन उपक्रम राबवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी शिवटेकडीला भेट दिली. शिवटेकडीच्या परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व परिसराची पाहणी त्यांनी केली. परिसरातील जलशुध्दीकरण पाण्याच्या टाकीचे काम तातडीने पूर्ण करावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. भिमटेकडी आणि शिवटेकडीच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच आवश्यक सोयी-सुविधांकरीता आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी मनपा प्रशासनाला दिल्या. शहर सौंदर्यीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले
पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी मागील वर्षी भिमटेकडीची पाहणी केली होती. त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे वेळोवेळी भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी निधी मिळण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही पवित्र स्थळांच्या विकासाकरीता 2 कोटी 42 लाख रुपये निधी 11 ऑक्टोंबर रोजी मंजूर झाला आहे. सदर निधी महानगरपालिका प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला असून प्राप्त निधीतून दोन्ही पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येईल. या दोन्ही पर्यटन स्थळांच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून 4 कोटी 57 लाख रुपयाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी टप्प्याने टप्प्याने हा निधी मनपा प्रशासनाला मिळाला आहे.

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

आय चिंतन संमेलनाच्या माध्यमातून
नवे शोध सामान्यांपर्यंत पोहोचवा
                                            -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील

विदर्भ ऑप्थॅलमिक सोसायटीच्या 42 व्या वार्षिक परिषदेचे
पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

अमरावती दि. 7 : नेत्र शस्त्रक्रीयेच्या क्षेत्रात घडून आलेले नवे बदल आणि नवनवीन संशोधन सर्वांपर्यंत पोहोचावेत या उदात्त हेतूने विदर्भ ऑप्थलमिक सोसायटीने केलेले परिषदेचे आयोजन स्तुत्य उपक्रम आहे. आय चिंतनाच्या या तीन दिवसीय संमेलनाच्या माध्यमातून नेत्र शस्त्रक्रीयेच्या क्षेत्रात झालेले नवे शोध व शस्त्रक्रीयेविषयी माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी केले.
हॉटेल ग्रॅन्ड महफील येथे आयोजित तीन दिवसीय विदर्भ ऑप्थॅलमिक सोसायटीच्या 42 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन श्री. पोटे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. पी. टी. लहाने, डॉ. अनिल धामोरीकर, डॉ. ललीत वर्मा, डॉ. वरुन नायर, डॉ. प्रकाश मराठे,  डॉ. सेनीन अग्रवाल, डॉ. सेनील सगने, डॉ. अनिल हरवानी, डॉ. बिपीन सगने, डॉ. शैनक मोकादम, डॉ. राजेश जवादे, डॉ. प्रवीण व्यवहारे, डॉ. अतुल कढाणे, डॉ. प्रशांत बावनकुळे आदी उपस्थित होते.
यावेळी विदर्भ संघटनेच्या मोबाईल ॲपचा शुभारंभ पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तीन दिवस (6, 7 व 8 ऑक्टोंबर) चालणाऱ्या या परिषदेमध्ये नेत्र शस्त्रक्रीया क्षेत्रात झालेले नवीन संशोधन या विषयावर तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान व लाईव्ह शस्त्रक्रीयेसंबंधी माहिती देण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका आपल्या भाषणातून विषद केली. डॉ. नायर यांनी नेत्र चिकित्सेच्या क्षेत्रात घडून आलेल्या नवनवीन सर्जरीविषयी या संमलेनात माहिती मिळणार असल्याचे सांगितले. या परिषदेत देशातील 20 राष्ट्रीय आणि 72 लोकल पातळीवरील फॅकल्टीज नेत्र चिकीत्सेवर आपले संशोधन मांडणार असून संघटनेच्या सर्व सदस्यांसाठी मोठी उपलब्धी असणार आहे, असे डॉ. बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित डॉ. अनिल लद्दड, डॉ. बी. आर. देशमुख, डॉ. विरल शहा, डॉ. कौस्तुभ भट्टाचार्य, डॉ. मनिपाल जॉर्ज, डॉ. सुजाता गुहा, डॉ. सौरभ लुथरा, डॉ. संतोष अग्रवाल आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. निता व्यवहारे व डॉ. अनुराधा तोटे यांनी तर डॉ. अतुल कढाने यांनी आभार मानले.

000000




शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्र्यांचे निर्देश

शासकीय अभिलेख तातडीने संगणकीकृत करा
                     - बबनराव लोणीकर
                                                                                               
अमरावती, दि. 29 : संपूर्ण देशभरात स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयातही स्वच्छता असणे अपरिहार्य आहे. त्यामुळे मोठी जागा व्यापणारे शासकीय अभिलेख संगणकीकृत करावे व कार्यालयात सातत्यपूर्ण स्वच्छता निर्माण करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज येथे दिले.
‘स्वच्छता ही सेवा’ या कार्यक्रमांतर्गत श्री. लोणीकर यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस आयुक्त कार्यालय व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात जाऊन तेथील रेकॉर्डरुमची व परिसराची पाहणी केली व अधिकारी- कर्मचा-यांशी संवाद साधला. पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले की, परिसरातील स्वच्छतेसोबतच कार्यालयात अनेक वर्षांपासून जतन केलेले अभिलेख व दस्तावेज मोठी जागा व्यापतात. त्यामुळे ते संगणकीकृत करुन कार्यालयांची स्वच्छता करावी.
 श्री. लोणीकर पुढे म्हणाले की, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये जुने अभिलेख सुरक्षित ठेवणे आव्हानात्मक असते; पण तंत्रज्ञानाच्या साह्याने हे काम सुलभ झाले आहे. विशिष्ट आज्ञावलींच्या मदतीने सर्व अभिलेख व माहिती सुरक्षित ठेवता येते व त्यातून हवी ती माहिती तातडीने मिळणे शक्य होते. त्यामुळे या अभिलेखांचे संगणकीकरण लवकरात लवकर शासकीय कार्यालयांची स्वच्छ, सुसज्ज करावीत.  शासकीय कार्यालयांत जिल्ह्यातील नागरिकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे स्वच्छता अभियानाचा प्रसार करताना आपले कार्यालयही स्वच्छ असावे, या जाणिवेतून सर्वांनी काम केले पाहिजे.
यावेळी विविध कार्यालयांचे अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.





00000

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

शेती व शेतकऱ्यांच्या समस्या प्राथमिकतेने सोडविणे आवश्यक
-         पालकमंत्री प्रविण पोटे

·        शोभा फडणवीस लिखीत ‘धांडोळा शेतीचा’ पुस्तकाचे
पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन
अमरावती, दि. 15 : शेती आणि शेतकरी जगले तरच देश जगेल. सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रथम शेतीविषयक समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे. वर्तमानातून भविष्यात पाहतांना शेती व शेतकऱ्यांच्या हिताकडे प्राथमिकतेने पाहणे गरजेचे आहे. ‘धांडोळा शेतीचा’ या पुस्तकाच्या माध्यमातून श्रीमती शोभा फडणवीस यांनी शेतीच्या समस्यांवर प्रभावी उपाय सूचविले आहेत. हा प्रयत्न शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त समस्या सोडवण्यात यशस्वी होईल, असा विश्वास पालकमंत्री प्रविण पोटे यांनी व्यक्त केला. श्रीमती शोभा फडणवीस लिखीत ‘धांडोळा शेतीचा’ या पुस्तकाच्या विमोचन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. टाऊन हॉल येथे आयोजित कार्यक्रमात उपमहापौर संध्या टिकले, खासदार रामदास तडस, आमदार रमेश बुंदिले, ॲड. यशोमती ठाकूर, मनपा स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, वनस्पतीशास्त्रज्ञ केशव ठाकरे, मनपाचे झोन सभापती लविना हर्षे व सुरेखा लुंगारे, शिक्षण सभापती चेतन गावंडे, उपसभापती पद्मजा कौंडण्य उपस्थित होते.
प्रविण पोटे म्हणाले, राज्यात शेती व शेतकऱ्यांच्या असंख्य समस्यांनी उग्र रुप धारण केले आहे. त्याचे परिणाम शेतकरी बांधवांसह समाजातील सर्व घटक भोगत आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भविष्यातील शेती नियोजन व परिवर्तनाच्या दिशेने सूचविलेल्या उपाययोजनांचा निश्चितच सकारात्मक परिणाम होईल. सिंचन, कर्ज, हमी भाव, खत विषयक समस्या यावरील उपायांच्या प्रभावी अंमलबजावणीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देता येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
श्रीमती शोभा फडणवीस यांनी ‘धांडोळा शेतीचा’ या पुस्तकाच्या विषयाबाबत पार्श्वभूमी सांगितली. शेतकरी बांधवांच्या समस्या, त्यांचे उध्वस्त होणारे कुटुंब, आत्महत्या या सोबतच शेतकरी ह्या स्थितीपर्यंत का पोहोचला यावरही चिंतन व उपाय करणे गरजेचे आहे. पंचवार्षिक योजना, शाश्वत शेतीचा विकास, सेंद्रिय खत वापरण्याबाबत मार्गदर्शन या सर्व बाबींवर पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे. शासन, प्रशासन व समाजाने या क्षेत्रातील त्रृटी दूर करण्याला प्राथमिकता द्यावी, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी केले. खासदार रामदास तडस व वनस्पतीशास्त्रज्ञ केशव ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन क्षिप्रा मानकर यांनी केले. कार्यक्रमाला महिला, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.         

00000

बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या हस्ते व्हीएमव्ही महाविद्यालयात
फिफा विश्वचषक स्पर्धेच्या रॅलीचे उद्घाटन

‘ महाराष्ट्र मिशन वन मिलीयन ’
या फुटबॉलच्या अनोखा उपक्रमास अमरावतीत शुभारंभ

अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय ! जयघोषने वातावरण क्रीडामय…

परिसरात जागोजागी फुटबॉल सेल्फी पॉईंट

अमरावती. दि. 12 : जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा ) 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा 6 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर दरम्यान भारतात होत आहे. या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने देशभरात क्रीडा संस्कृती रुजविण्याचा ड्रीम प्रोजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील मुला-मुली मध्ये फुटबॉलची आवड निर्माण करण्यासाठी ‘ महाराष्ट्र मिशन वन मिलीयन ’ हा फुटबॉलचा अनोखा उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. या मिशनचा शुभारंभ व्हीएमव्ही महाविद्यालयात आयोजित फिफा विश्वचषक स्पर्धेच्या रॅलीला पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आज हिरवी झेंडी दाखवून केला.  
या मिशनसंदर्भात अधिक माहिती देतांना श्री. पोटे म्हणाले, राज्यातील मुला-मुली मध्ये फुटबॉल या खेळासंबंधी आवड निर्माण करण्यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी  महाराष्ट्र फुटबॉल मिशन एक मिलीयन अंतर्गत राज्यातील शाळा व महाविद्यालय मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे.  फुटबॉल हा जगातील अतिशय लोकप्रिय खेळ आहे. एकाच दिवशी 10 लाख मुलांनी फुटबॉल खेळावा यासाठी 30 हजार शाळांमध्ये एक लाख फुटबॉलचे वितरण करण्यात येणार आहे. एक मिलीयन पेक्षा जास्त मुले फुटबॉल खेळतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या व्टिटरवरुन व्यक्त केला आहे, असेही पालकमंत्री महोदयांनी सांगितले.
या फुटबॉल रॅलीमध्ये शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञन संस्थेच्या संचालक डॉ. अर्चना नेरकर, प्राध्यापक , क्रीडा शिक्षक, एनसीसीचे प्रशिक्षक व विद्यार्थी तसेच मोठया संख्येने महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थींनी सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारीत व्हावा व सर्व वातावरण क्रीडामय होण्यासाठी महाविद्यालयाव्दारे परिसरात विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट सुरु करण्यात आली आहेत. यावेळी अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय ! या जयघोषने वातावरण क्रीडामय झाले होते.

*******

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०१७

पालकमंत्र्यांनी दिली अवयवदानाची शपथ
* अनूप गायकवाडच्या अवयवदानाची आठवण
* रूग्णालयाच्या कार्यक्रमात नागरीकांचा सहभाग

अमरावती. दि. 29 : अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी अवयव प्रत्यारोपण करणे शक्य आहे. यामुळे गंभीर आजारावर निदान होत आहे. अवयव प्रत्यारोपणासाठी अवयवदान आवश्यक आहे. अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी महाअवयवदान महोत्सवानिमित्त येथील इर्विन रूग्णालयात पालकमंत्री प्रविण पोटे यांनी अवयवदानाबाबत शपथ दिली.
यावेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुळकर्णी, आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लोहकपुरे, रक्तपेढी प्रमुख डॉ. विलास जाधव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पोटे यांनी देश आणि राज्य पातळीवर अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून इर्विन रूग्णालयात अवयवदानाबाबत शपथ देण्यात येत आहे. अमरावतीमधील अनूप गायकवाड यांच्या कुटुंबियांनी दु:खाच्या काळातही अवयवदानाबाबत घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. मृत्यू हा दु:खाचा प्रसंग असला तरी अवयवदानासाठी समाजातील नागरीकांनी पुढे येण्याची गरज आहे. मानवी अवयव कृत्रिमरित्या तयार करता येणे शक्य नाही, त्यासाठी मृत्यू पूर्वी आणि नंतरही विविध मानवी अवयव दान करण्यासाठी नागरीकांना प्रवृत्त करावे लागणार आहे. अवयवदानामुळे अनेकांना जीवनदान मिळण्यास मदत होते. अवयवदानात जात, धर्म विचारात घेतली जात नाही, त्यामुळे समाजात एकोपा निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. समाजातील प्रत्येक नागरीकाने अवयवदानाचा संकल्प केल्यास तो पुढच्या पिढीसाठी एक संदेशच असणार असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुळकर्णी यांनी अवयवदान उपक्रम अत्यंत गरजेचा झाला असल्याचे सांगून यात सर्वस्तरातील नागरीकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, समाजातील सर्व नागरीकांनी अवयवदानाच संकल्प करावा, त्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तसेच अवयवदान महोत्सव ही संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्‍यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी अवयवदानाबाबत माहिती दिली.

00000




सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी
वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनव्दारे
उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणी
-किशोर तिवारी

विकास कामांची एककेंद्राभिमुखता ठरवावी
                                             -प्रविण परदेशी

             अमरावती, दि. 26 : वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची पुनर्रचना व विस्तार करण्यात आला असून यामध्ये आता मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम आणि वर्धा या सहा जिल्ह्यांचा मिशनमध्ये अगोदरच समावेश होता. पश्चिम विदर्भ, मराठवाडा व वर्धा अशा 14 जिल्ह्यात मिशन कार्यरत राहणार असून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मिशनव्दारे विविध उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणी करण्यात येणार, असे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज सांगितले.
शनिवार, 26 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. बैठकीला अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, मुख्य वनसंरक्षक श्री. चव्हाण, श्री. रेड्डी, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर यांचेसह सर्व विभागप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी श्री. तिवारी आणि श्री. परदेशी यांनी व्हीडिओ कॉन्फरसिंगव्दारे जिल्हानिहाय त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांकडून केम (कृषी समृध्दी समन्वयीत कृषी विकास) प्रकल्प, शेतकरी कर्जमाफी, आरोग्य विभाग, आत्मा, पीक कर्ज वाटप, पीक पेरणी, शासकीय धान्य खरेदी, आदिवासी विकास विभाग, अन्न व नागरी पुरवठा, कृषी सोलर पंप, सिंचन विहिरी, नरेगा, बाजार समित्या, सिंचन प्रकल्प, जनआरोग्य योजना, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, रोजगार निर्मिती, मुद्रा कर्ज आदी मुद्दांबाबत सविस्तर आढावा घेतला.
श्री. परदेशी म्हणाले की, मेळघाटात आदिवासींच्या विकासासाठी वन विभाग व आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. प्रत्येक योजनेतून प्राप्त होणाऱ्या निधीचा उपयोग गावातील प्राधान्य क्रमाने करावयाच्या मुलभूत कामास केल्यास लोकसहभागातून ते काम जलदगतीने पूर्ण होईल. यासाठी सर्व विकास कामांची एककेंद्राभिमुखता ठरविण्यात यावी. जिल्हा प्रशासनाने यासाठी मासिक बैठकीचे आयोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.


पुढे बोलतांना ते म्हणाले, मेळघाटात बांबू रोपणाकरिता भरपूर वाव आहे. बांबू झाडाच्या रोपणातून तेथील स्थानिकांना चांगला रोजगार प्राप्त होऊ शकतो. आणि हे त्यांचे उत्तम उपजीविकेचे साधन ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वनविभागाने उत्तम प्रजातीचे (बाल्कोहा) बांबू रोपे उपलब्ध करुन द्यावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायतींना अर्थसंकल्पातील पाच टक्के निधी गावातील विकास कामे करण्यासाठी शासनाकडून देण्यात येतो. या निधीतून त्या त्या गावातील प्राधान्य क्रमाने करावयाची कामे करण्यात यावी. पशुसंवर्धन व वन विभागाने दुधाचे उत्पादन वाढण्यासाठी प्रत्येक गावालगत वैरण विकासासाठी प्रयत्न करावे. पशुसंवर्धन विभागाने दुभत्या जनावरांचे नियमित लसीकरण, पायाच्या व तोंडाच्या आजारांवर तातडीने उपचार करावे. मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जे आदिवासी शेतकरी शेततळे तयार करीत आहे त्यांना पॉलीथिन व मत्स्य बीज जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करुन द्यावे. ज्या शेतकी गटाला बँक वित्त पुरवठा करण्यास तयार आहे अशा गटाला प्रक्रिया उद्योगाचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावे. वन विभागाने मेळघाट परिक्षेत्रात शामाप्रसाद मुखर्जी योजनेच्या अनुषंगाने अधिकाधिक विकास कामे करावी, असेही श्री. परदेशी यांनी सांगितले. वन विभाग व आदिवासी विकास विभागाव्दारे मेळघाटात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा गावनिहाय आढावा त्यांनी यावेळी घेतला.


**********


शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी
शेतीपुरक व्यवसाय करावे
   -पालकमंत्री प्रविण पोटे
* प्रत्येक व्यक्तीने तीन व्यक्तींना मदत करावी
* जिल्ह्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत

             अमरावती, दि. 26 : विदर्भातील अमरावती व यवतमाळ या दोन जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. पूर्वीच्या काळात गाई-म्हशीच्या दुध उत्पादनातून शेतकरी कुटुंबातील महिला पैश्याची बचत करीत होत्या. आणि ऐन अडचणीच्या वेळेस हा बचत केलेला पैसा कामी येत असे चित्र खेड्यागावात पाहायला मिळत होते. कालांतराने शिक्षणासाठी व रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी गावातील लोक शहराकडे स्थलांतरीत होऊ लागली. तसेच सततची नापिकी व निर्सगाचा लहरीपणा इत्यादी कारणामुळे शेतकरी आर्थिक विवंचणेत सापडू लागला. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी पूर्वीप्रमाणेच शेतीपुरक व्यवसाय करुन आत्मनिर्भर व्हावे, असे संवेदनशील आवाहन पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी आज केले.
            हॉटेल गौरी इन येथे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी अभियंता सहकारी पतसंस्था मर्या. अमरावती या संस्थेची 31 वी वार्षिक आमसभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी या पतसंस्थेव्दारे जिल्ह्यातील 14 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दहा हजार रुपये मदतीचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सुनील जगताप, महावितरण यवतमाळचे अधिक्षक अभियंता रामेश्वर माहुरे, महावितरण अमरावतीचे अधिक्षक अभियंता अनिल वाकोडे, महापारेषणचे अधि. अभियंता प्रफुल्ल औघड, वाशिमचे अधि. अभियंता श्री. कैशरीया, आम्ही सारे फॉउंडेशनचे शेतकरी नेते विजूभाऊ विल्हेकर यांचेसह पतसंस्थेचे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
            श्री पोटे-पाटील म्हणाले, राज्य शासनाकडून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. यावर्षी कर्जमाफी योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजार रुपयाची तातडीची मदत आणि सुमारे दिड लाखापर्यंतचे कर्जमाफी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी सुध्दा खचून न जाता इतर शेतीपूरक व्यवसाय करुन आर्थिक सुब्बता प्राप्त करावी. शेतीपुरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून गाई-म्हशीचे पालनपोषण करावे. आणि या माध्यमातून दुधाचे उत्पादन घेऊन यावर प्रक्रिया उद्योग कसा उभारता येईल यासाठी प्रयत्न करावे.  
            पुढे बोलतांना ते म्हणाले, महावितरणच्या अभियंतांनी आत्महत्याग्रस्त व गोर-गरीब कुंटुंबातील तीन विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च भागवावा. होतकरु विद्यार्थ्यांना पुस्तकांचा संच व दोन गणवेशाचे जोड उपलब्ध करुन दिल्यास आयुष्यभर आपण सुध्दा समाजिक दायीत्व पूर्ण केल्याची भावना निर्माण होईल.
            समारंभात 10 वी, 12 वी मध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या अभियंतांच्या पाल्यांचा व वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळालेल्या अभियंतांचे तसेच सेवानिवृत्त झालेल्या अभियंतांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात राजेंद्र ठाकरे यांनी पतसंस्थेचा लेखाजोखा वाचून दाखविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उज्वल गावंडे यांनी केले तर आभार श्री. मोघे यांनी मानले.

***********


छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्याकडून सेतु केंद्राची पाहणी

ऑनलाईन प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी
-         पालकमंत्री प्रविण पोटे- पाटील
अमरावती. दि. 28 : छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत पीक कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज विनामूल्य भरण्याची प्रक्रिया सेवा केंद्रांद्वारे होत आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री प्रविण पोटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सेतु , भातकुली तहसील सेतु व गाडगेनगर महा- ईसेवा केंद्र या केंद्रांना भेट दिली आणि ही प्रक्रिया 15 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसीलदार श्री. मालठाणे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी श्री. रणविर, विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री. पोटे यांनी ऑनलाईन प्रक्रियेची संपूर्ण माहिती घेतली व कर्मचा-यांकडून अडचणी जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी सेतू केंद्राचे संचालक झियाऊर रहेमान यांनी ऑनलाईन प्रक्रियेची संपूर्ण माहिती पालकमंत्र्यांना दिली.
  कर्जमाफीसाठी शेतक-यांकडून ऑनलाईन फॉर्म जिल्ह्यात सुमारे 600 केंद्रांवर विनामूल्य भरुन घेण्यात येत आहेत. या प्रक्रियेला गती येण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहायक, गटसचिव, संबंधित केंद्रचालक यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कर्जमाफी फॉर्म भरुन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही प्रक्रिया 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश श्री. पोटे यांनी दिले.
           योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या केंद्रांच्या संचालकांचे प्रशिक्षणही घेण्यात आले आहे, तसेच सर्व केंद्रांना माहिती तंत्रज्ञान संचालनालयाकडूनन बायोमेट्रिक यंत्रणा व इतर साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे, अशी माहिती श्री. खुशालसिंह परदेशी यांनी दिली.


00000