बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६

 


राज्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी #चारा उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत वैयक्तिक तसेच सार्वजनिक व सामुदायिक जमिनीवर चारा लागवडीची कामे हाती घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी सात अतिरिक्त चारा पिकांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी मंत्रालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना दिली.

२०२६ मधील पावसातील तूट, पावसाचे असमान वितरण, खरीप उत्पादनातील घट आणि रब्बी पेरणी क्षेत्रात संभाव्य घट यामुळे पशुधनासाठी चारा उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन चारा उत्पादन वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

योजनेत मका, ज्वारी, बाजरी, नेपियर गवत, लसूणघास (ल्युसर्न), ज्वारी मल्टीकट आणि बाजरी मल्टीकट या सात चारा पिकांचा समावेश करण्यात आला आहे. ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत सामुदायिक उपयोगासाठी आणि वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी चारा लागवडीच्या कामांचा समावेश ‘उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा’ या वर्गात करण्यात आला आहे.

लागवडीसाठी आवश्यक बियाणे महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृभको, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि कृषी विज्ञान केंद्र आदी संस्थांकडून उपलब्ध करून घेता येणार आहेत. कमी पाण्यात येणाऱ्या, कमी कालावधीत उत्पादन देणाऱ्या आणि एकापेक्षा अधिक वेळा कापणी करता येणाऱ्या चारा पिकांना प्राधान्य दिले जाणार आहे.

या कामांची अंमलबजावणी पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणार आहे. मजुरांच्या श्रमांना प्राधान्य असल्याने मजुरांमार्फत करता येणाऱ्या कामांसाठी यंत्रसामग्रीचा वापर करता येणार नाही. तसेच, एकदा चारा लागवड केलेल्या क्षेत्रावर याच योजनेतून पुन्हा चारा लागवडीचे काम घेता येणार नाही.

लाभार्थी निवड, कामांचे नियोजन, सामाजिक अंकेक्षण आणि आर्थिक मर्यादांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. या निर्णयामुळे दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्धता वाढण्यासोबतच ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे, असे मंत्री गोगावले यांनी सांगितले.

#दुष्काळ

#शेतकरी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा