मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२६

 

राज्यातील ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) अभियानाने ‘सेवा संकल्प अभियान’ आणि नियमित कामकाजाच्या माध्यमातून विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यभरात १० लाखांहून अधिक नवीन ग्रामीण महिला बचत गटांच्या चळवळीशी जोडल्या गेल्या असून, नवीन बचत गट स्थापनेत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.


ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत राज्यभरात एकूण १ लाख ३ हजार २०९ नवीन महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. अभियान कालावधीत १ लाख ५ हजार ३७१ गट स्थापनेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, ज्याच्या अगदी जवळ पोहोचण्यात यंत्रणेला यश आले आहे. विशेष म्हणजे, या नवस्थापित गटांपैकी ७८ हजार ४५४ बचत गटांची ‘लोकोओएस’ (LokOS) या डिजिटल प्रणालीवर नोंदणी पूर्ण झाली असून, उर्वरित गटांची नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राज्यस्तरापासून ते गावपातळीपर्यंतच्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि जिद्दीने केलेल्या कामामुळे हे यश साध्य झाले आहे.

#उमेद

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा