शनिवार, २० जानेवारी, २०१८

73 व 74 व्या घटना दुरुस्ती रौप्यमहोत्सवी वर्ष
लोकशाहीचा विचार शेवटच्या घटकापर्यंत
पोहचविण्यासाठी घटना दुरुस्ती
                                                   -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील
            अमरावती, दि.20 :  देशाच्या जडणघडणीत आणि विकास प्रक्रियेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना योग्य स्थान मिळवून देण्यासाठी 73 व 74 वी घटना दुरुस्ती करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक स्थान प्राप्त करुन देणाऱ्या या ऐतिहासिक घटना दुरुस्तीस 25 पूर्ण होत आहेत. या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्तता प्राप्त झाली आहे. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय व अंत्योदयाचा विकास असा लोकशाहीचा प्रमाणिक विचार नागरिकांमध्ये पोहचविणे, हा  घटना दुरुस्तीचा प्रमुख उद्देश असल्याचे मत पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी व्यक्त केले.
            संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती जिल्हा परिषद, अमरावती महानगरपालिका, विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरातील डॉ. के. जी. देशमुख सभागृहात 73 व 74 व्या घटना दुरुस्तीच्या रौप्य महोत्सवीवर्षानिमित्त ‘प्रगती व पुढील दिशा’ या  विषयावर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींची विभागीय परिषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.
            यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, विभागीय आयुक्त पियूष सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, मनपा आयुक्त हेमंत पवार,  विभागीय उपायुक्त राजाराम झेंडे, कुलसचिव डॉ. अजय देशमुख उपस्थित होते.
            श्री. पोटे-पाटील म्हणाले, राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक बळकट करण्यासाठी पावले उचलली आहेत. याचा एक भाग म्हणून ग्रामस्तरावरील सरपंच आणि पालिकास्तरावरील नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याची प्रक्रिया केली आहे. या लोकप्रतिनिधींना विकासासाठी पाठबळ मिळावे, यासाठी त्यांच्याविरूद्ध अडीच वर्षे अविश्वास आणता येणार नाही, असा निर्णय घेतला आहे. या घटनादुरूस्तीमुळे महिला आणि मागासवर्गीयांना पंचायत राज्य व्यवस्थेत प्रतिनिधीत्व मिळाले आहे. यामुळे विकास प्रक्रियेत सर्व घटकांना संधी मिळाली आहे. या घटनेला 25 वर्षांचा कालावधी होत आहे. याची माहिती समाजातील सर्व घटकांना मिळावी, यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल, असा आशावाद पालकमंत्री यांनी व्यक्त केला.
            श्री. चन्ने म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणूक आयोगाचे कामकाजाविषयी माहिती होण्यासाठी राज्यस्तरावर परिषद आयोजित करण्यात आली होती. यातून अशा परिषदा विभागस्तरावरही व्हाव्यात यासाठी अशी सूचना मान्य करण्यात आली. त्यानुसार विभागनिहाय परिषद होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हावार प्रशिक्षण केंद्रही उभारण्यात येणार आहे. निवडणूक आयोगामुळे निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात निवडणूका होत आहेत. आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे योग्य जनप्रतिनिधी निवडून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
            डॉ. चांदेकर म्हणाले, समाज मनाचा आढावा घेऊन या दोन्ही दुरूस्ती करण्यात आली आहे. यामुळे सामाजिक समानता प्रस्थापित होण्यास मदत मिळाली आहे. लोकप्रतिनिधींकडून योग्य कार्य होण्यासाठी त्यांना प्रशिक्षण गरजेचे आहे. समाजात एकोपा निर्माण करण्यासोबतच विकास प्रक्रियेत समाजाला सहभागी करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
000000





बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

युवकांसाठी दिशादर्शक - रोजगार मिळावे
96 रोजगार मेळाव्यातून 20 हजार युवकांची निवड

महाविद्यालयीन शिक्षणानंतर युवकांना ध्यास लागतो तो नोकरीचा. आजच्या स्पर्धेच्या युगात रोजगार प्राप्तीसाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. असा असंख्य तरुणांचा अनुभव आहे. त्यातही आपली आवड निवड, आपल्यातील कला गुणांना वाव देण्यास योग्य संधी मिळावी असा रोजगार प्राप्त करण्याचे स्पप्न अनेक युवक युवती आपल्या उराशी बाळगतात. बेरोजगारीच्या या समस्येवर उपाय म्हणून राज्यशासनाच्या वतीने जिल्हा पातळीवर रोजगार निर्मिती उपलब्ध केले आहे.
विभागात अमरावती 29, अकोला 18, बुलडाणा 17, यवतमाळ 19 व वाशिम 13 अशा 96 रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून  आतापर्यंत वीस हजार युवकांची प्राथमिक स्तरावर निवड करण्यात आली आहे.
स्वयंरोजगाराच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत विभागीय स्तरावर एक आणि जिल्हा स्तरावर  चार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. योग्य अभ्यासक्रम, शिक्षण आणि प्रशिक्षीत शिक्षकांवर यात अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या मेळाव्यांमध्ये उद्योजक व नोकरी उत्सुक उमेदवारांना एका छताखाली आणून उद्योजकांना आवश्यक मनुष्यबळ विनामुल्य उपलब्ध करुन देणे व नोकरी उत्सुक उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी सहाय्य करण्यात येते. यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
योग्य प्रशिक्षण व पसंतीशिवाय स्वयंरोजगारासाठी सामान्यपणे कोणतीही व्यक्ती सहसा प्रवृत्त होत नाही. परंतु या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातुन युवकांना आपल्या पसंतीच्या ठिकाणी सेवा देण्याची, उत्कृष्ठ प्रशिक्षण प्राप्त करण्याची संधी उपलब्ध होते. समाजात स्वयंरोजगाराबाबत अनुकुल बदल व राष्ट्राचा विकास कौशल्ययुक्त प्रशिक्षणातुनच शक्य आहे.
00000



शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

 ‘मनोधैर्य’ने दिले पिडीतांना जगण्याचे धैर्य
*187 पिडीतांना 2 कोटी 65 लाखांचे अर्थसहाय्य
* तत्परतेने समुपदेशनासह वैद्यकीय, कायदेशीर मदत

 पिडीत महिला, मुली आणि बालकांना मदतीचा हात देऊन त्यांना पुन्हा नव्या उमेदीने जीवन जगण्यासाठी 2 ऑक्टोबर 2013 पासून मनोधैर्य योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत अमरावती विभागातील 187 पिडीतांना सुमारे 2 कोटी 65 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देऊन जगण्याचे धैर्य प्राप्त करून दिले आहे. वित्तीय मदतीसोबतच समुपदेशन, वैद्यकीय आणि कायदेशीर मदतही तत्परतेने उपलब्ध करून दिले जात आहे.
मनोधैर्य योजनेतून अमरावती जिल्ह्यात 65 पिडीतांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 20 पिडितांना 40 लाख रुपये, तर वाशिम जिल्ह्यातील 32 पिडीतांना 30 लाख रुपये मदत म्हणून देण्यात आले. अकोला जिल्ह्यात 10 लाख 22 हजार 900 रुपये, तर यवतमाळ जिल्ह्यात 92 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे. 
अत्याचार पिडीत महिला-बालकांना आधार देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजना 2013 पासून सुरु केली आहे. यात बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी किमान दोन लाख आणि विशेष प्रकरणामध्ये तीन लाख रूपयांची मदत देण्यात येते. ॲसिड हल्ल्यात महिला आणि बालकांचा चेहरा विदृप झाल्यास किंवा कायमचे अंपगत्व आल्यास तीन लाख रुपये तसेच जखमी झाल्यास 50 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते.
महिला-बालकांवरील अत्याचारप्रकरणी गंभीर शिक्षा होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर यातील पिडीत महिला आणि बालकांना प्रतिष्ठा, आत्मविश्वास परत मिळवून देणेही तितकेच आवश्यक आहे. पिडीत महिला आणि बालकांना शारीरिक आणि मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे, वित्तीय साहाय्य देणे तसेच समुपदेशन, निवास, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत, उपचार सेवा तत्परतेने उपलबध करुन त्यांचे पुनवर्सन करणे आवश्यक असते. महिला, बालकांवर वाईट प्रसंग ओढवल्यास त्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने ही योजना सुरु केली आहे.


महिला, बालकावरील अत्याचाराबाबत पोलिसात एफआयआर दाखल झाल्यानंतर मदतीसाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्षतिसहाय्य व पुनवर्सन मंडळाकडे अर्ज करावा लागतो. मंडळाकडे अर्ज सादर झाल्यानंतर तातडीने मदत देण्यात येते. पिडीत महिला, बालकास जिल्हा शल्य चिकित्सकातर्फे वैद्यकीय सेवा पुरविली जाते. 
अर्ज कोठे करावा
महिला, बालकांवर अत्याचाराचे प्रकरण उद्भवल्यास त्याची पोलिसात तक्रार नोंदविली जाते. सदर प्रकरणात एफआयआर नोंद झाल्यानंतर मदतीचा प्रस्ताव संबंधित पोलिस ठाण्यामार्फत तयार केला जाते. तो प्रस्ताव त्या पोलिस ठाण्यामार्फतच जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयास प्राप्त होतात. त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हा क्षतिसहाय्य आणि पुनवर्सन मंडळाकडे मंजूरासाठी सादर केला जातो.

00000

गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

खोपडा, बोडना व खापरखेडा या गावांच्या
पुनर्वसनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा
                                    -जिल्हाधिकारी अभिजित बांगर

अमरावती, दि. 9 :  मोर्शी तालुक्यातील खोपडा व बोडना तसेच वरुड तालुक्यातील खापरखेडा या तीनही पुरग्रस्त गावांच्या पुनर्वसनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले.
बैठकीला आमदार अनिल बोंडे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) रामदास सिध्दभट्टी, मजीप्राच्या अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, जिल्हा कृषी अधिक्षक अनिल खर्चान, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, सार्व. बांधकाम विभागाचे व लघु पाटबंधारे महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. बांगर म्हणाले, खोपडा, बोडना व खापरखेडा या गावांचे सुनियोजित पुनर्वसन करण्यासाठी तेथील कुटुंबाच्या नावे वाटप करण्यात आलेले भूखंडाची जागा व्यवस्थित करुन घ्यावी. तेथील झाडे झुडपे कापून जागेचे सरळीकरण करुन घ्यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते, नाल्या, स्ट्रीट लाईट व इतर नागरी सुविधांची उभारणी करण्यासाठी नियोजन करुन तातडीने कामाला सुरुवात करावी. उपविभागीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांनी गावस्तरीय समितींची मान्यता घेऊन भुखंड वाटप करावे. पाणी पुरवठा विभागाने (मजीप्रा) तीनही गावांची पेय जलाची मागणी लक्षात घेऊन पाण्याची टाकी निर्माण करण्यासाठी नियोजन करावे. विज वितरण कंपनीने (एमएसईबी) तातडीने वीज पुरवठा उपलब्ध होईल यादृष्टीने विजेचे पोल उभारण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना श्री. बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

आमदार बोंडे म्हणाले, खोपडा, बोडना व खापरखेडा या तीनही गावांचे नागरिक पावसाळ्यातील पुरामुळे त्रस्त आहेत. या तीनही गावांचे पुनर्वसन योग्य पध्दतीने करण्याची मागणी गावकऱ्यांनी बरेच वर्षापासून रेटून धरली आहे. या तीनही गावांचे पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने कामाला सुरुवात करावी. असे त्यांनी सांगितले. पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखडयानुरुप निधीची तरतूद संबंधित यंत्रणेला तातडीने उपलब्ध करुन द्यावी. सर्व संबंधित शासकीय विभागांनी आराखडया अनुसार निधीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करुन घ्यावा, जेणेकरुन तीनही गावात प्राधान्याने पायाभूत सुविधा उभारता येईल. असेही श्री. बोंडे यांनी यावेळी सांगितले.
कृषी विकास परिषद 2017 चे वरुड येथे आयोजन
* 7 ते 10 डिसेंबर दरम्यान कृषी तज्ञांचे मार्गदर्शन
* कृषी प्रदर्शनी व शासकीय योजनांचे स्टॉल्स




अमरावती, दि. 9 :  येत्या डिसेंबर महिन्यात 7 ते 10 डिसेंबर पर्यंत वरुड येथे कृषी विकास परिषद 2017 चे भव्य आयोजन करण्यात येत आहे. या परिषदेमध्ये वरुड व मोर्शी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी संत्रा उत्पादन वाढविण्यासाठी संशोधनात्मक प्रयत्न, शेतीपुरक व्यवसाय, शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग, शेतमालाचे उत्तम मार्केटींग, शेतीच्या मशागतीसाठी लागणारे अत्याधुनिक साहित्य व उपकरणे याविषयी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीव्दारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परिषदेचे आयोजन कृषी विभाग, कृषी मित्र इव्हेंट कंपनी, जैन इरिगेशन सि. लि. यासारख्या नामवंत कंपन्यांव्दारा करण्यात येत आहे. या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी सहकार्य करावे, असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषी विकास परिषद 2017 च्या आयोजनाबाबत पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत  होते. बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी नितिन व्यवहारे, जिल्हा कृषी अधिक्षक श्री. खर्चान, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू यांचेसह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार श्री. बोंडे म्हणाले की, या परिषदेच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह अन्य गणमान्य मंत्री उपस्थित राहणार आहेत. कमी खर्चात जास्त शेती उत्पादन कसे घ्यावे, संत्रा उत्पादन क्षेत्रातील नवनवीन संशोधन, कापूस, सोयाबीन, कडधान्य या पीकांचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी काय करावे, शेतीपुरक व्यवसाय व शेती साहित्य- उपकरणांचा उपयोग आदी विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी, शेतीतील उत्पादन वाढविणे, शेतीपुरक व प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती साधणे हा या कृषी विकास परिषदेच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. कृषी विभागाने परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी. यासंबंधी प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर करावेत. असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. बांगर म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन संशोधन व केंद्र शासन राबवित असलेल्या कृषी विकासाच्या योजना याविषयी माहिती होण्यासाठी परिषदेच्या आयोजनामागील उद्देश आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी संलग्नीत शासकीय विभागांनी (सहकार, पदूम, केम, एमटीडीसी, खादी ग्रामोद्योग, जिल्हा उद्योग केंद्र) या परिषदेमध्ये सहभाग घ्यावा. कृषी विभागाने योग्य नियोजन करुन निधी मागणीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा. कृषी क्षेत्रात उत्पादन वाढीसाठी उपयोगी ठरलेल्या मॉडेलचे स्टॉल्स , विविध कल्याणकारी योजना आदी संबंधी दर्शनी भागात स्टॉल्स्‍ उभारण्यात यावे. दिनांक 7 ते 10 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या परिषदेत व्याख्यान देण्यासाठी येणाऱ्या व्याख्यातांची राहण्याची व इतर व्यवस्था सुरळीत करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


******



सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

शुभमंगल सामुहिक विवाह योजनेतून 
1583 जोडपे परिणयबध्द
1583 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 1 कोटी 71 लक्ष 96 हजार रुपये अनुदान जमा
अमरावती दि. 29 : मुलींच्या किंवा मुलांच्या विवाहावर फार मोठा खर्च होतो. सामान्य शेतकरी किंवा गरीब कुटुंबांना हा खर्च परवडण्यासारखा नसतो. विवाहावरचा खर्च भागविण्यासाठी शेतकरी वर्ग सावकाराकडून कर्ज घेऊन कर्जबाजारी होतो. शेतकरी आत्महत्या करण्यामागे हे सुध्दा प्रमुख कारण आढळून आले आहे. या प्रश्नावर मात करण्यासाठी तसेच शेतकरी, शेतमजूर यांचा विवाहवरचा खर्च वाचविण्यासाठी महिला व  बालवीकास विभागाद्वारे शुभमंगल सामुहिक विवाह योजना/नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तसेच कर्जबाजारीपणा वाढू नये म्हणून ही योजना सन 2008 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेची व्याप्ती शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात आहे.
           या योजनेअंतर्गत सन 2016-17 मध्ये अमरावती विभागातील 1583 लाभार्थ्यांना सामुहिक विवाह योजनेतून 1 कोटी 76 लाख 96 हजार रुपये अनुदान महिला व बालविकास विभागाकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील 241 लाभार्थ्यांना 28 लक्ष 92 हजार रुपये विवाह खर्च देण्यात आला. अकोला जिल्ह्यातील 108 लाभार्थ्यांना 10 लक्ष 80 हजार रुपयाचा निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील  167 लाभार्थ्यांना 20 लक्ष 4 हजार रुपये,  बुलडाणा जिल्ह्यातील 925 लाभार्थ्यांना 1 कोटी  11 लक्ष रुपये तर वाशिम जिल्ह्यातील 142 लाभार्थ्यांना 1 लक्ष 20 हजार रुपये विवाह खर्च अनुदान स्वरुपात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.
अशी आहे योजना :-
या योजने अंतर्गत सामुहिक विवाहात सहभागी होणाऱ्या शेतकरी/शेतमजूर यांच्या मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तुंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपे 10 हजार रुपये एवढे अनुदान वधुच्यवडिलांच्या नावाने, वडिल हयात नसल्यास वधुच्या आईच्या नावाने व आई-वडिल दोन्हीही हयात नसल्यास वधुच्या नावाने धनादेश देण्यात येते. याशिवाय या योजनेंतर्गत जे जोडपे सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणीकृत विवाह करतात,  त्यांनाही 10 हजार रुपये अनुदान देण्यात येते. सामुहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनाकरिता  संबंधित संस्थेस प्रति जोडपे दोन हजार एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान (विवाह नोदंणी शुल्कासह) विवाह योजनेसाठी  देण्यात येते. या योजनेमुळे अनेक गोर-गरीब शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह झाले असून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुध्दा ही योजना प्रभावी ठरली आहे.
00000
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भिमटेकडी, बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे लोकार्पण
                                             -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील
* भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी 2 कोटीचा निधी प्राप्त

अमरावती 27- भिमटेकडी व शिवटेकडींचे सौंदर्यीकरण पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या 2 कोटींच्या निधीतून करण्यात येत आहे. काम पूर्ण झाल्यानंतर भिमटेकडी स्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी दिली.
शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही स्थळांची पाहणी पालकमंत्री महोदयांनी आज केली. यावेळी त्यांच्या समवेत मनपा आयुक्त हेमंत पवार, बौध्द धम्म प्रचार समितीचे पदाधिकारी श्री. आकोडे, तायडे, शहारे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर, स्वीय सहायक राजेश बोबडे, नगरसेवक दिनेश बुब, आर्कीटेक्चर श्री. खंडारकर, कंत्राटदार श्री. अग्रवाल आदी उपस्थित होते.
            प्रारंभी पालकमंत्री महोदय व इतर मान्यवरांनी भिमटेकडीला भेट दिली. तेथील परिसराची, बांधकामाची पाहणी त्यांनी केली. सदर वास्तुचे सद्यस्थितीत 75 टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती मनपा आयुक्त यांनी दिली. भिमटेकडीची उर्वरित स्थापत्य कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे आदेश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. भिमटेकडी येथील वास्तू तयार झाल्यावर या पवित्र स्थळाची पवित्रता कायम राहील यासाठी संस्थेने व नागरिकांनी दक्षता घ्यावी. हा परिसर रमनिय व सुंदर होण्यासाठी मोठया प्रमाणात झाडे लावावीत. विद्यार्थ्यांना या स्मारकाच्या माध्यमातून प्रेरणा मिळण्यासाठी नवीन उपक्रम राबवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी शिवटेकडीला भेट दिली. शिवटेकडीच्या परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व परिसराची पाहणी त्यांनी केली. परिसरातील जलशुध्दीकरण पाण्याच्या टाकीचे काम तातडीने पूर्ण करावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. भिमटेकडी आणि शिवटेकडीच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच आवश्यक सोयी-सुविधांकरीता आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी मनपा प्रशासनाला दिल्या. शहर सौंदर्यीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले
पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी मागील वर्षी भिमटेकडीची पाहणी केली होती. त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे वेळोवेळी भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी निधी मिळण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही पवित्र स्थळांच्या विकासाकरीता 2 कोटी 42 लाख रुपये निधी 11 ऑक्टोंबर रोजी मंजूर झाला आहे. सदर निधी महानगरपालिका प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला असून प्राप्त निधीतून दोन्ही पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येईल. या दोन्ही पर्यटन स्थळांच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून 4 कोटी 57 लाख रुपयाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी टप्प्याने टप्प्याने हा निधी मनपा प्रशासनाला मिळाला आहे.
******


सहकारी संस्थांनी नाविन्यपूर्ण उपक्रमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे
 -         सहकार मंत्री सुभाष देशमुख
  
 कृषी प्रक्रिया उद्योगासाठी व्याज अनुदान देणार


अमरावती, दि. 26 : राज्याच्या आर्थिक विकासात सहकार चळवळीचा मोठा वाटा आहे. यापुढेही सहकारी संस्थांची जोमदार वाटचाल व्हावी म्हणून बळकटीकरणासाठी संस्थांनी शासकीय अनुदानावर पूर्णपणे विसंबून राहू नये. तर, स्वत:च्या योगदानातून नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून संस्थेचा विकास साधावा, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संघातर्फे विदर्भ को- ऑप मार्केटिंग फेडरेशनच्या सहकार्याने सहकारी संस्थांसाठी कार्यशाळेचे आयोजन अभियंताभवन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. देशमुख बोलत होते.  आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार यशोमती ठाकूर,  फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र शिंगणे, संचालक एस. हरीबाबू, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, भाजपा पदाधिकारी निवेदीता दिघळे तसेच अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले की,  राज्य सहकारी संघाची निर्मिती राज्यघटनेनुसार झाली आहे. तेव्हापासून संघाद्वारे विविध सहकारी संस्थांच्या पदाधिकारी, कर्मचारी यांना संस्थांच्या बळकटीकरण आणि पारदर्शक व्यवहारासाठी प्रशिक्षण देण्यात येते.  संघाची शताब्दी साजरा होणे ही राज्यासाठी गौरवाची बाब आहे. राज्यात ज्या-ज्या ठिकाणी सहकाराचा विकास झाला आहे, त्या भागाचा सर्वांगीण विकास झाला आहे. सहकारी संस्थांच्या विकासासाठी सहकार विभागाकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी देऊन आढावा घेण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
विदर्भातील पिकांच्या उत्पादनाविषयी आढावा घेऊन ते पुढे म्हणाले की, विदर्भात सोयाबीन, तूर, कापूस व कडधान्य पिकांची उत्पादन क्षमता चांगली आहे. या भागात दरवर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले होते. शेतकऱ्यांनी सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. सहकारी संस्थांनीसुध्दा या क्षेत्रात प्रक्रिया उद्योगासाठी पुढे येऊन कृती आराखडा तयार करुन शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. यासाठी व्याज अनुदान देण्यात येईल, असे आश्वासन श्री. देशमुख यांनी दिले.
राज्यात बचत गटाची संख्या चार लाख आहे. या गटांना प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.  बचत गटांनी निर्माण केलेल्या मालास बाजारपेठ उपलब्ध करुन दिल्यास नक्कीच प्रगती होईल. फेडरेशनमध्ये आलेल्या मालाची खरेदी-विक्री प्रक्रियेमध्ये बोगसपणा रोखण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. तूर विक्रीसाठी सुध्दा ऑनलाईन पध्दती महत्वपूर्ण ठरली आहे,  असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
आमदार अनिल बोंडे यांनी अमरावती विभागातील सहकारी संस्थांच्या मागण्यांविषयी व प्रशिक्षणा संदर्भात मागणी मांडली.  डॉ. शिंगणे यांनीही मनोगत व्यक्त केले. श्री. इंदलकर यांनी आभार मानले.  


शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७

 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भिमटेकडी, बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे लोकार्पण
                                             -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील
* भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी 2 कोटीचा निधी प्राप्त

अमरावती 27- भिमटेकडी व शिवटेकडींचे सौंदर्यीकरण पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या 2 कोटींच्या निधीतून करण्यात येत आहे. काम पूर्ण झाल्यानंतर भिमटेकडी स्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी दिली.
शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही स्थळांची पाहणी पालकमंत्री महोदयांनी आज केली. यावेळी त्यांच्या समवेत मनपा आयुक्त हेमंत पवार, बौध्द धम्म प्रचार समितीचे पदाधिकारी श्री. आकोडे, तायडे, शहारे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर, नगरसेवक दिनेश बुब, आर्कीटेक्चर श्री. खंडारकर, कंत्राटदार श्री. अग्रवाल आदी उपस्थित होते.
            प्रारंभी पालकमंत्री महोदय व इतर मान्यवरांनी भिमटेकडीला भेट दिली. तेथील परिसराची, बांधकामाची पाहणी त्यांनी केली. सदर वास्तुचे सद्यस्थितीत 75 टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती मनपा आयुक्त यांनी दिली. भिमटेकडीची उर्वरित स्थापत्य कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे आदेश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. भिमटेकडी येथील वास्तू तयार झाल्यावर या पवित्र स्थळाची पवित्रता कायम राहील यासाठी संस्थेने व नागरिकांनी दक्षता घ्यावी. हा परिसर रमनिय व सुंदर होण्यासाठी मोठया प्रमाणात झाडे लावावीत. विद्यार्थ्यांना या स्मारकाच्या माध्यमातून प्रेरणा मिळण्यासाठी नवीन उपक्रम राबवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी शिवटेकडीला भेट दिली. शिवटेकडीच्या परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व परिसराची पाहणी त्यांनी केली. परिसरातील जलशुध्दीकरण पाण्याच्या टाकीचे काम तातडीने पूर्ण करावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. भिमटेकडी आणि शिवटेकडीच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच आवश्यक सोयी-सुविधांकरीता आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी मनपा प्रशासनाला दिल्या. शहर सौंदर्यीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले
पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी मागील वर्षी भिमटेकडीची पाहणी केली होती. त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे वेळोवेळी भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी निधी मिळण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही पवित्र स्थळांच्या विकासाकरीता 2 कोटी 42 लाख रुपये निधी 11 ऑक्टोंबर रोजी मंजूर झाला आहे. सदर निधी महानगरपालिका प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला असून प्राप्त निधीतून दोन्ही पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येईल. या दोन्ही पर्यटन स्थळांच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून 4 कोटी 57 लाख रुपयाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी टप्प्याने टप्प्याने हा निधी मनपा प्रशासनाला मिळाला आहे.

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

आय चिंतन संमेलनाच्या माध्यमातून
नवे शोध सामान्यांपर्यंत पोहोचवा
                                            -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील

विदर्भ ऑप्थॅलमिक सोसायटीच्या 42 व्या वार्षिक परिषदेचे
पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

अमरावती दि. 7 : नेत्र शस्त्रक्रीयेच्या क्षेत्रात घडून आलेले नवे बदल आणि नवनवीन संशोधन सर्वांपर्यंत पोहोचावेत या उदात्त हेतूने विदर्भ ऑप्थलमिक सोसायटीने केलेले परिषदेचे आयोजन स्तुत्य उपक्रम आहे. आय चिंतनाच्या या तीन दिवसीय संमेलनाच्या माध्यमातून नेत्र शस्त्रक्रीयेच्या क्षेत्रात झालेले नवे शोध व शस्त्रक्रीयेविषयी माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी केले.
हॉटेल ग्रॅन्ड महफील येथे आयोजित तीन दिवसीय विदर्भ ऑप्थॅलमिक सोसायटीच्या 42 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन श्री. पोटे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. पी. टी. लहाने, डॉ. अनिल धामोरीकर, डॉ. ललीत वर्मा, डॉ. वरुन नायर, डॉ. प्रकाश मराठे,  डॉ. सेनीन अग्रवाल, डॉ. सेनील सगने, डॉ. अनिल हरवानी, डॉ. बिपीन सगने, डॉ. शैनक मोकादम, डॉ. राजेश जवादे, डॉ. प्रवीण व्यवहारे, डॉ. अतुल कढाणे, डॉ. प्रशांत बावनकुळे आदी उपस्थित होते.
यावेळी विदर्भ संघटनेच्या मोबाईल ॲपचा शुभारंभ पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तीन दिवस (6, 7 व 8 ऑक्टोंबर) चालणाऱ्या या परिषदेमध्ये नेत्र शस्त्रक्रीया क्षेत्रात झालेले नवीन संशोधन या विषयावर तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान व लाईव्ह शस्त्रक्रीयेसंबंधी माहिती देण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका आपल्या भाषणातून विषद केली. डॉ. नायर यांनी नेत्र चिकित्सेच्या क्षेत्रात घडून आलेल्या नवनवीन सर्जरीविषयी या संमलेनात माहिती मिळणार असल्याचे सांगितले. या परिषदेत देशातील 20 राष्ट्रीय आणि 72 लोकल पातळीवरील फॅकल्टीज नेत्र चिकीत्सेवर आपले संशोधन मांडणार असून संघटनेच्या सर्व सदस्यांसाठी मोठी उपलब्धी असणार आहे, असे डॉ. बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित डॉ. अनिल लद्दड, डॉ. बी. आर. देशमुख, डॉ. विरल शहा, डॉ. कौस्तुभ भट्टाचार्य, डॉ. मनिपाल जॉर्ज, डॉ. सुजाता गुहा, डॉ. सौरभ लुथरा, डॉ. संतोष अग्रवाल आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. निता व्यवहारे व डॉ. अनुराधा तोटे यांनी तर डॉ. अतुल कढाने यांनी आभार मानले.

000000