सोमवार, ४ मे, २०२६

 





सामान्य प्रशासन विभागातर्फे आयोजित 'टेक-वारी २.०' अंतर्गत 'महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात झाला. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, केंद्र सरकारच्या क्षमता बांधणी आयोगाच्या अध्यक्ष राधा चौहान, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा उपस्थित होते. कार्यक्रमास विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तंत्रज्ञानाचा अंतिम उद्देश हा सामान्य नागरिकांचे जीवन सुलभ करणे आहे. सर्वसामान्य माणूस हाच आपला ‘विठ्ठल’ असून त्याच्या सेवेसाठीच टेक वारी आहे. केवळ तंत्रज्ञान नव्हे तर मानवी संवेदना, मानसिक आरोग्य, आत्मपरीक्षण ‘आर्ट ऑफ हँडलिंग क्रिटिसिझम’ विषयही प्रशासनासाठी महत्त्वाचा आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या 'टेक वारी' उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात नागरिक-केंद्रित प्रशासनाचा वेगवान रोडमॅप राबविला जात असून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शासन अधिक कार्यक्षम आणि सुलभ करण्यावर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
'टेक वारी' ही संकल्पना वारीच्या सातत्यपूर्ण परंपरेप्रमाणेच प्रेरणादायी आहे. जसे वारकरी कोणत्याही परिस्थितीत पंढरपूरची वारी चुकवत नाहीत, तसेच आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात सातत्याने शिकणे अत्यावश्यक आहे. तंत्रज्ञान दररोज बदलत असून, ते आपण जर स्वीकारले नाही तर व्यक्ती काळाच्या ओघात मागे पडू शकतात, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
‘टेक वारी’ उपक्रमात ‘लेफ्ट ब्रेन’ आणि ‘राईट ब्रेन’ या दोन्हींच्या विकासावर भर देण्यात आला आहे. तंत्रज्ञान, एआय, भाषा आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट यांसारख्या विषयांद्वारे विश्लेषणात्मक क्षमतेचा विकास केला जात असून, संगीत, योग, नृत्य आणि संस्कृतीसारख्या उपक्रमांमधून सर्जनशीलता आणि मानसिक स्वास्थ्य वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
एआय एजंट वासुदेव हा नाविन्यपूर्ण प्रयोग या कार्यक्रमात वापरण्यात आला. एआय एजंटने प्रेक्षकांशी संवाद साधला व त्यांनी कार्यक्रमाची पूर्ण माहिती प्रेक्षकांना दिली. तसेच टेक वारीच्या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले.
#TechWari
#MahaTechWari
#MahaTechWari2026
#टेकवारी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘टेक-वारी 2.0’ अंतर्गत ‘डिजिटल गव्हर्नन्स चेंजिंग वर्ल्ड' या विषयावर विविध क्षेत्रातील तज्‍ज्ञ व्याख्यात्यांनी त्यांच्या क्षेत्रात एआय वापरून कामात केलेल्या सुधारणांबद्दल माहिती दिली. तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे शासन व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन होत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल साधने आणि मानवी संवेदनशीलता यांचा समतोल साधणे आवश्यक असल्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

मानवाच्या उत्क्रांतीचा आढावा घेत त्यांनी तंत्रज्ञानाच्या पुढील प्रवासाची दिशा स्पष्ट केली. भविष्यात ‘मशीन इन मॅन’, ‘मॅन इन मशीन’ आणि ‘मॅन-मशीन एकत्रीकरण’ या संकल्पनांमुळे कार्यपद्धतीत मोठे बदल घडतील, असे मुख्य सचिव अग्रवाल यांनी नमूद केले. डिजिटल साधनांचा वापर अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यावर भर देतानाच, मानवी मूल्ये आणि संवेदनशीलता जपणे तितकेच महत्त्वाचे असल्याचेही त्‍यांनी सांगितले.
यावेळी पोलीस महासंचालक सदानंद दाते, सीबीसीच्या अध्यक्ष राधा चव्हाण, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, डॉक्टर विवेक राघवन आदींनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमास विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये ‘जनगणना २०२७ ची तयारी’ या विषयावर जनगणना संचालनालयाचे सहसंचालक संतोष नरसिंह पायस यांची निवेदक राजेंद्र हुंजे यांनी घेतलेली विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

🔔 ‘दिलखुलास’ कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत दि. ५ ते ९ मे, २०२६ या कालावधीत रोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ (News on AIR) या मोबाईल ॲपवर प्रसारित होईल.
🔔 ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आणि महासंचलनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही प्रसारित होणार आहे.



शुक्रवार, १ मे, २०२६

 जिल्ह्याच्या कृषी-औद्योगिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानावर भर

- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
*67 वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा





अमरावती , दि. १ : शेती व उद्योग क्षेत्रात आधुनिकतेची कास धरीत जिल्ह्याने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि उद्योग क्षेत्राचा विकास करून जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या निमित्ताने पोलीस मुख्यालय, अमरावती शहर परेड मैदान येथे मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी सहकार मंत्री श्री. बाबासाहेब पाटील बोलत होते .
पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, प्र. विभागीय आयुक्त अजय लहाने, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, राज्याच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. राज्य शासनाने पीक कर्जासाठी २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार असून ही प्रक्रिया लवकरच प्रत्यक्ष सुरू होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित १ लाख १५ हजार ८६२ शेतकऱ्यांना ७४५ कोटी रुपयांची मदत थेट खात्यात जमा करण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता २ लाख ७१ हजार ७६२ शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे. ​कृषी यांत्रिकीकरणासाठी १४.८५ कोटी रुपये खर्चून २ हजार ९८ शेतकऱ्यांना यंत्र व औजारे खरेदीसाठी मदत केली आहे.
​मोर्शी आणि वरुड येथील सिट्रस इस्टेटमध्ये आता एआय (AI) आधारित तंत्रज्ञान राबविले जाईल.

​सिंचनासाठी 'प्रती थेंब अधिक पीक' योजनेत ३ हजार ५५९ आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत २ हजार १५३ लाभार्थींची निवड झाली आहे. ​प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत अमरावती जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला असून ही जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब आहे.
​जिल्ह्याच्या औद्योगिक विकास आणि महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत असल्याचे सांगून सहकार मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले,

अमरावतीमध्ये 'पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क' आणि विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेमुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. औद्योगिक वसाहतीत आयटी पार्क आणि आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र आकारास येत आहे. रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १ हजार ५५ कर्ज प्रकरणे मंजूर झाली असून, यात ६३३ महिला उद्योजिकांचा समावेश आहे.
​आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याण
आरोग्य विभागातर्फे महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आणि आयुष्मान कार्ड वाटप सुरू आहे. मेळघाटातील माता-बालमृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी 'मेळघाट परिक्रमा' उपक्रम राबविला जात आहे. महिलांसाठी 'पिंक ई-रिक्षा', 'आई' योजना आणि 'लाडकी बहीण' योजनेद्वारे आर्थिक सक्षमीकरण केले जात असून, जिल्हा 'बालविवाहमुक्त' करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

​पर्यटन क्षेत्रात चिखलदरा येथील स्कायवॉक पूर्ण करण्यावर भर दिला जात असून आमझरी गावाची 'मधाचे गाव' म्हणून निवड झाली आहे. तसेच, संत गाडगेबाबांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 'संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट' विकसित करण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. देशाच्या पहिल्या डिजिटल जनगणनेत नागरिकांनी अचूक माहिती भरून सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी यावेळी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त आणि जागतिक कामगार दिनानिमित्त त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

पुरस्कार वितरण सोहळा

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सन 2024-25 या वर्षासाठी 'विशेष जिल्हा युवा पुरस्कार' नाळ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास पोकळे, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केल्याबद्दल युवक गटातून अमर वानखडे (तिवसा), युवती गटातून कु. जानव्ही राऊत (नया वाठोडा) तसेच संस्था गटातून श्री. संताजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था (गुरुकुंज आश्रम) यांना सन्मानित करण्यात आले. यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार, व्यसनमुक्ती, रक्तदान आणि आदिवासी विकास क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे.

सन 2025-26 या वर्षासाठी युवक गटात समाजप्रबोधनकार वेदांत मुंदाने (अमरावती), युवती गटात कु. पुजा गुंजरकर (ब्राम्हणवाडा थडी) आणि संस्था गटात स्वामी विवेकानंद विचार मंच (अचलपूर) यांना सन्मानित करण्यात आले. अचलपूरच्या विवेकानंद विचारमंचने आरोग्य सेवा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले आहे.

याशिवाय अपर आयुक्त सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे , सहायक ग्रंथालय संचालक राजेश पाटील, सहायक ग्रंथालय संचालक सुरजकुमार मडावी, अधीक्षक अभियंता मंगेश पाटील, महसूल सहायक मनीषा ढोके, शिक्षिका रितू तळमळे, ग्राम महसूल अधिकारी पवन मुंडे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संजय अंबाडेकर, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाच्या सुमेधा बारलिंगे, मंजिरी महाजन, संध्या साउरकर, कविता पाचघरे,पोलीस निरीक्षक निलेश गावंडे, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गुळसुंदरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश श्रीवास, अजय मिश्रा, प्रवीण काळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय पेठे, होमगार्ड सैनिक राजेंद्र शाहाकार, पोलीस हवालदार राजेश कोचे, राजीव बाहेनकर, दीपक सुंदरकर, शंकर बावनकुळे,पंकज गावंडे, उज्ज्वल सामुद्रे, सुरक्षारक्षक शिवकुमार तायडे यांना उत्कृष्ट कार्याबाबत यावेळी गौरविण्यात आले.
प्रारंभी विविध शासकीय विभागामार्फत परेड संचलन करण्यात आले. मंत्री श्री. पाटील यांनी परेड संचलनाचे निरीक्षण केले. परेडचे संचलन परेड कमांडर उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे तसेच दुय्यम परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक श्रीधर गुळसुंदरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन देशमुख यांनी केले.

#महाराष्ट्रदिन





महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनी विभागीय आयुक्तालयात ध्वजारोहण व मानवंदना

 

          अमरावती, दि. 1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या वर्धापन दिनोत्सवा निमित्त अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात प्रभारी विभागीय आयुक्त तथा अपर आयुक्त अजय लहाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. श्री. लहाने यांनी यावेळी उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर पोलीस पथकाव्दारे तिरंग्यास मानवंदना देण्यात आली.

                                                                                                                                                                                                      यावेळी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे-पाटील, अपर आयुक्त संजय जाधव, सुरज वाघमारे, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, नायब तहसीलदार मधुकर धुळे, श्यामसुंदर देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

 


 



 

 


 

मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा...
महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!