गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२६

 

इयत्ता 12 वीच्या 'अर्थशास्त्र' विषयाच्या परीक्षेच्या वेळेत बदल;

राज्य मंडळाचे शुध्दीपत्रक जाहीर

अमरावती, दि. 26 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 12, वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे. 12 वीच्या 'अर्थशास्त्र' विषयाची परीक्षा आता सकाळच्या सत्राऐवजी दुपारच्या सत्रात घेण्यात येणार असून, राज्य मंडळाने यासंदर्भात अधिकृत शुध्दीपत्रक जारी केले आहे.

राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत होणाऱ्या 10वी व 12वी लेखी परीक्षांची सविस्तर वेळापत्रके 6 नोव्हेंबर 2026 पासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार, 17 फेब्रुवारी 2027 रोजी होणारा बारावीचा अर्थशास्त्र विषयाचा पेपर पूर्वी सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 या वेळेत होणार होता; मात्र आता हा पेपर त्याच दिवशी द्वितीय सत्रात, म्हणजेच दुपारी 3:00 ते सायंकाळी 6:00 या वेळेत पार पडेल.

अर्थशास्त्र विषयाच्या सत्रातील या बदलाव्यतिरिक्त 10 वी आणि 12 वीच्या उर्वरित कोणत्याही विषयांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाही.

संकेतस्थळावरील वेळापत्रक हे केवळ माहितीसाठी असून, परीक्षेपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडे दिले जाणारे छापील वेळापत्रकच अंतिम राहील. विद्यार्थ्यांनी व पालकांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत छापील वेळापत्रकावरूनच तारखांची खात्री करावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा