गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२६

जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य शासनाने ती पूर्णतः ऑनलाइन केली आहे. यापुढे जात वैधता प्रमाणपत्रासाठीचे अर्ज ‘सीसीव्हीआयएस’ (CVCIS) प्रणालीद्वारेच स्वीकारण्यात येणार आहेत. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे.

#बार्टी, पुणे आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने विकसित या प्रणालीद्वारे घरबसल्या अर्ज सादर करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची स्थिती जाणून घेणे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेणे शक्य होणार आहे. #डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणपत्र ई-मेल व व्हॉट्सॲपद्वारे मिळणार असून, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉटद्वारे शंकांचे निरसनही करता येणार आहे. ऑनलाइन सादर केलेली कागदपत्रे समिती कार्यालयात पुन्हा जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही.

अर्ज व पुराव्यांची पडताळणी करून शक्यतो ६० दिवसांत निर्णय घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शैक्षणिक प्रयोजनासाठी १०० रुपये, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ५०० रुपये, तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सेवाविषयक प्रयोजन आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी एक हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. ही ऑनलाइन सुविधा https://www.cvc.barti.in येथे उपलब्ध असून, यामुळे नागरिकांचा वेळ वाचून प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा