बुधवार, ६ मे, २०२६

 



#उद्योग व समाजाच्या प्रगतीसाठी क्वांटम संगणन तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करण्याची आवश्यकता असून, विविध क्षेत्रांनी त्यासाठी पूर्वतयारी करणे गरजेचे आहे, असे मत आयबीएमचे संचालक अमित सिंघी यांनी ‘टेक-वारी २.०’ महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत मंत्रालयात आयोजित सत्रात व्यक्त केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, वित्त विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागला, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, महाआयटी विभागाचे सचिव विरेंद्र सिंह तसेच राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे उपस्थित होते.
क्वांटम संगणनाचा वापर एरोस्पेस, वाहन उद्योग, रसायन, ऊर्जा, वित्तीय सेवा, आरोग्य आणि जीवनशास्त्र अशा विविध क्षेत्रांमध्ये होऊ शकतो. गुंतागुंतीच्या गणितीय व रासायनिक समस्यांचे निराकरण, प्रक्रिया अनुकूलन आणि कार्यक्षमता वाढविणे यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. सध्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून या क्षेत्रात संशोधन व विकासाचे कार्य सुरू असून, औद्योगिक समस्यांवर उपाय शोधण्याचे प्रयत्न होत आहेत.
लॉजिस्टिक्स क्षेत्रात वितरण व्यवस्थापन, वाहन मार्ग नियोजन आणि पुरवठा साखळीचे अनुकूलन यामध्ये सुधारणा करता येऊ शकते. वित्तीय क्षेत्रात गुंतवणूक व्यवस्थापन, अचूक विश्लेषण अधिक ठकळपणे करण्यास मदत होत आहे. तसेच, ऊर्जा व रसायन क्षेत्रात बॅटरी तंत्रज्ञान, खत निर्मिती प्रक्रियेत कार्यक्षमता वाढविण्यासाठी, तर आरोग्य क्षेत्रात प्रथिनांच्या संरचनेचा अभ्यास करून औषधनिर्मिती प्रक्रियेला गती देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो, असेही सिंघी यांनी यावेळी सांगितले.

मंगळवार, ५ मे, २०२६

इयत्ता १२ वी पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

 

इयत्ता १२ वी पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

          अमरावती, दि. ५ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे तर्फे घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) जून-जुलै २०२६ पुरवणी परीक्षेसाठी आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेचा निकाल दि. २ मे २०२६ रोजी ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर ही पुरवणी परीक्षा जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणार आहे. पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थी तसेच ITI विषय घेणारे विद्यार्थी यांना या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

            विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in वर भरावीत, असे पुणे राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

            नियमित शुल्कासह आवेदनपत्र भरण्याची मुदत ५ ते १५ मे २०२६ असून, विलंब शुल्कासह १६ ते २० मे २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. महाविद्यालयांनी RTGS/NEFT द्वारे परीक्षा शुल्क २१ मे पर्यंत जमा करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांची यादी व प्रिलिस्ट २५ मे पर्यंत विभागीय मंडळाकडे सादर करावी लागणार आहे.

            अर्ज सबमिट केल्यानंतर महाविद्यालयांना ‘कॉलेज लॉगिन’मधून प्रिलिस्ट उपलब्ध होणार असून, त्याची पडताळणी करून विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या घेणे आवश्यक राहणार आहे. तसेच प्राचार्यांनी प्रत्येक पानावर शिक्का व स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे.

            ऑनलाईन अर्ज भरताना फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची माहिती स्वयंचलितपणे उपलब्ध होणार आहे. श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सलग तीन संधी (जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७, जून-जुलै २०२७) दिल्या जाणार आहेत.

            शुल्क भरण्यासाठी ICICI बँकेच्या व्हर्च्युअल खात्यात NEFT/RTGS द्वारेच रक्कम जमा करावी लागणार असून, जुन्या बँक चलनांचा वापर करता येणार नाही. तसेच रोख स्वरूपात शुल्क स्वीकारले जाणार नाही.

            विहित शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत. तसेच अर्ज भरण्याच्या मुदतीत कोणतीही वाढ दिली जाणार नसल्याचे मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी स्पष्ट केले आहे.

०००००

 #मंत्रिमंडळनिर्णय (भाग-३)

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
आता हे महाविद्यालय ‘श्री तुळजाभवानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर’ या नावाने ओळखले जाईल. सध्या या महाविद्यालयात सिव्हील (स्थापत्य) मेकॅनिकल (यंत्र अभियांत्रिकी), इलेक्टॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन (अणुविद्युत व दूरसंचार) आणि कॉम्प्युटर सायन्स (संगणक विज्ञान) असे अभ्यासक्रम सुरू आहेत.
महाविद्यालयासाठी नियमित शिक्षकांची ६० पदे आणि शिक्षकेतर पदे ५८ अशा एकूण ११८ पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे. मात्र सध्या महाविद्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी संस्थांनाचेच कर्मचारी म्हणून राहतील. संस्थांनाची पदे जशी रिक्त होत जातील तशी ती पदे शासनाच्या विहीत पद्धतीने भरती करण्यास आणि त्यापोटी येणाऱ्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.
सविस्तर निर्णय : https://mahasamvad.in/200252/

 #ताण विरहित जीवनासाठी सकारात्मक वृत्ती, मनाचे नियंत्रण, योग्य विचार आणि व्यवहारातील संतुलन आवश्यक असल्याचे मत लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्राचे सुहास गुढाते यांनी ‘टेक-वारी २.०’ अंतर्गत महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह कार्यक्रमात ‘तणाव व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित व्याख्यानात व्यक्त केले.

ताण-तणावाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी अंतर्मनातील आवाज ऐकण्याची गरज आहे. दैनंदिन जीवनात प्रतिकूल व्यक्ती, परिस्थिती, नातेसंबंध, वाहतूक, प्रदूषण आणि महागाई यासारख्या अनेक घटकांमुळे निर्माण होणारा ताण गुंतागुंतीचा ठरतो. ताण हा केवळ दुःखाशी संबंधित नसून आनंदाच्या क्षणातही तो अनुभवण्यास येतो. माणूस हा शरीर आणि मन या दोन घटकांचा बनलेला असून ताणमुक्तीची गरज मनाला असते, असे सुहास गुढाते यांनी यावेळी सांगितले.
आंतरव्यक्ती संबंधांमधील मतभेद आणि अपेक्षा यादेखील ताणाचे महत्त्वाचे कारण ठरतात. कुटुंब हा ताणमुक्तीचा आधार असून प्रत्येकाने स्वतःचा स्वभाव आणि क्षमता समजून घेतल्यास ताण कमी करण्यास मदत होऊ शकते. कामाच्या ठिकाणी ताण येऊ नये म्हणून आपल्या क्षमतांचा, कौशल्यांचा विकास करणे गरजेचे असल्याचे सुहास गुढाते म्हणाले.
व्याख्यानास मंत्रालयातील विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 #कृत्रिमबुद्धिमत्ता (#एआय), सोशल मीडिया आणि डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे वैयक्तिक #डेटा चे महत्त्व प्रचंड वाढले आहे. चुकीच्या हातात गेलेला डेटा व्यक्ती, समाज आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो. सायबर गुन्हे, डिजिटल अटक, फसवणूक, तसेच डेटा लीकच्या घटनांमुळे याची गंभीरता अधिक असल्याने डिजिटल युगात डेटा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयातील वकील खुशबू जैन यांनी ‘टेक-वारी २.०’ प्रशिक्षण उपक्रमांतर्गत ‘डिजिटल युगातील डेटा सुरक्षेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांच्यासह विविध विभागाचे सचिव उपस्थित होते.

‘डेटा’ हा व्यक्तीची मालमत्ता आहे आणि त्यावर पूर्ण नियंत्रण व्यक्तीचेच असायला हवा, कोणतीही संस्था किंवा कंपनी नागरिकांची स्पष्ट आणि समजण्यास सोपी संमती घेतल्याशिवाय डेटा वापरू शकत नाही, असेही खुशबू जैन यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘डेटा प्रिन्सिपल’ आणि ‘डेटा फिड्युशरी’ या दुहेरी भूमिकेत काम करताना पारदर्शकता, जबाबदारी आणि सुरक्षिततेची तत्त्वे पाळण्याचे आवाहन केले. डेटा गळती किंवा नियमांचे उल्लंघन झाल्यास मोठ्या प्रमाणावर दंडाची तरतूद असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला विविध विभागांतील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्रादरम्यान उपस्थितांनी डेटा संरक्षणाशी संबंधित प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले.

सोमवार, ४ मे, २०२६

 ‘आपलं मंत्रालय’ अंकाचे सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी

 डॉ. राजेश गवांदे यांच्या हस्ते प्रकाशन

 

                मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या एप्रिल 2026 या अंकाचे प्रकाशन सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा अतिथी संपादक डॉ. राजेश गवांदे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, प्रधान सचिव तथा महासंचालक यांचे विशेष कार्यअधिकारी इर्शाद बागवान उपस्थित होते.

 

‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या या अंकामध्ये विविध विषयांचा समतोल आणि आशयपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. राजशिष्टाचार उपविभागाचा विस्तार केल्यामुळे राज्याच्या आर्थिक विकास व रोजगार निर्मितीला गती मिळणार आहे याची माहिती देण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या समकालीन विषयावरील लेखांच्या माध्यमातून विज्ञान व तंत्रज्ञानातील नव्या घडामोडींची माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या अंकात करण्यात आला आहे. शासन व्यवस्थेतील महसूली संकल्पना असो किंवा बदलत्या काळातील महिला आणि डिजिटल सुरक्षेचा प्रश्न असो अशा विविध विषयाची मांडणी या अंकात करण्यात आलेली आहे.

 

मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने अंक प्रकाशित करण्यात येतो.



 सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित ‘टेक- वारी २.०’ अंतर्गत महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह कार्यक्रमात ‘टेक वारी तालरंग’ या वाद्यांच्या कार्यक्रमाने मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी यांना मंत्रमुग्ध केले. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित तालरंग कार्यक्रमाच्या माध्यमातून ढोलकी-संबळच्या ठेक्याने परिसर दणाणून गेला. अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही ढोलकी, संबळ वाद्यांचा स्वरध्वनींचा आनंद घेतला. कलाकार निलेश परब (ढोलकी-संबळ वादक) आणि कृष्णा मुसळे (ढोलकी वादक) यांनी आपल्या सादरीकरणातून तालरंगाची रंगत अधिक खुलवली.

कार्यक्रमाची सांगता निलेश परब आणि कृष्णा मुसळे यांच्या ढोलकी वादनाच्या जुगलबंदीने झाली. या जुगलबंदीस उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त दाद दिली. टेक वारी २.० या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत टाळांच्या गजरात करण्यात आले. तर तालरंगची सुरुवात गणपती वंदनेने करण्यात आली. या कार्यक्रमात ढोलकी, ढोल, संबळ, बासरी आदी वाद्यांच्या सहाय्याने गोंधळ गीत, कोळीगीताच्या सादरीकरणातून उपस्थितांचे मनोरंजन करण्यात आले.
तालरंग या कार्यक्रमास मंत्रालयातील विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.