अहिल्यानगर
‘महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी’च्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ३९ वा पदवीप्रदान समारंभ राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशाच्या अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्य व शाश्वत विकासासाठी #कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून भारतीय कृषीचे भविष्य तंत्रज्ञानाधारित उपाय, स्टार्टअप्स व शाश्वत पद्धतींवर अवलंबून आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी केले. नैसर्गिक व शाश्वत शेती पद्धतींच्या प्रसारात तसेच देशातील पहिले 'रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन' स्थापन करण्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे राज्यपाल श्री. वर्मा यांनी सांगितले.
कृषी क्षेत्रातील बदलासाठी कृषी विद्यापीठे, शासन यासोबतच कृषी पदवीधर यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतीमध्ये केमिकलचा वापर कमी केल्याने माती खराब होणार नाही. #नैसर्गिकशेती ला पुढे नेणे आवश्यक आहे. कृषी तंत्रज्ञानावर आधारित उद्योग कसे वाढवता येतील यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या पदवीप्रदान समारंभात राज्यपाल श्री. वर्मा यांच्या हस्ते विविध विद्याशाखांतील एकूण ४ हजार ६०२ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये ४ हजार १८२ स्नातकांना पदवी, ३४६ स्नातकांना पदव्युत्तर पदवी तर ७४ स्नातकांना आचार्य (पीएच.डी.) पदवीने अनुग्रहित करण्यात आले. तसेच शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४२ यशस्वी स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदके व रोख पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.
नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे (आयसीएआर) माजी संचालक डॉ. अशोक कुमार सिंह, कुलगुरू डॉ. विलास खर्चे व राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा