सक्षम महिला-सशक्त महाराष्ट्र-विशेष कार्यक्रम
महिला व बालविकास विभागाच्यावतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जागतिक महिला दिनानिमित्त ‘सक्षम महिला-सशक्त महाराष्ट्र’ हा विशेष कार्यक्रम पार पडला. शिक्षण व रोजगाराच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाद्वारे भारताच्या अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होईल. आर्थिकदृट्या सक्षम महिलांच्या अर्थव्यवस्थेतील सहभागानेच सशक्त महाराष्ट्र घडविता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सक्षमपणे उभ्या राहिलेल्या महिलांचा या विशेष कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुरस्कारप्राप्त महिलांचे अभिनंदन करत त्या इतर महिलांसाठी प्रेरणा ठरणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त नयना गुंडे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, सहसचिव वि. रा. ठाकूर, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवाडे, उपायुक्त जमसिंग गिरासे आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्र सरकारने ‘बेटी बचाव बेटी पढाव’, ‘लखपती दीदी’ सारख्या अनेक योजना राबवून महिलांना प्रत्येक क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिली आहे. विकसित महाराष्ट्र २०४७ हे लक्ष्य गाठण्यासाठी राज्यातही महिलांना आर्थिक बळ देऊन त्यांचा मानव संसाधन म्हणून अर्थव्यवस्थेत सहभाग करून घेण्यासाठी शासन कृतिशील आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने हे वर्ष महिला शेतकरी वर्ष घोषित केल्याने महिला शेतकरी, पशुपालक, कुक्कुटपालक आणि शेळीपालकांना सहाय्य करणाऱ्या योजना राबविण्यात येणार आहेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
***
शासन महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे. महिलांचा सन्मान म्हणजे केवळ गौरवाचे शब्द नसून त्यांच्या भावना, अपेक्षा आणि स्वप्नांचा खरा आदर करणे होय. शेतीपासून विज्ञानापर्यंत विविध क्षेत्रांत महाराष्ट्रातील महिलांनी उल्लेखनीय कर्तृत्व गाजवले असल्याचा अभिमान आहे. महिलांचे सक्षमीकरण म्हणजे निर्णयप्रक्रियेत महिलांना समान स्थान आणि स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होय - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा