वृत्त क्र 837
खेळाडूंना ५% आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’
प्रणाली कार्यन्वित
२४ तासांत डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र
मुंबई, दि.१२ : गुणवंत खेळाडूंना शासकीय व
निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि
जलद गतीने मिळावा यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली सुरू केली असल्याची
माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.
सदर प्रणालीद्वारे खेळाडूंना डिजिटल पडताळणीसह
प्रमाणपत्र मिळणार आहे. यावर असलेल्या QR कोडमुळे प्रमाणपत्राची सत्यता संबंधित
नियुक्ती प्राधिकरण त्वरित तपासू शकतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंनी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.
खेळाडूंनी https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ प्राप्त करुन घ्यावे,
त्याचप्रमाणे जर एखाद्या खेळाडूची माहिती प्रणालीवर उपलब्ध नसल्यास support@kridaepramaan.org या ई-मेलवर स्पर्धेचे नाव, वर्ष आणि
प्रमाणपत्राची स्कॅन प्रत पाठवून तक्रार नोंदवता येईल. त्यानंतर विभागस्तरावर
पडताळणी करून अभिलेख पोर्टलवर अद्ययावत करण्यात येतील.
सध्यस्थितीत कबड्डी, फेन्सिंग,
ट्रायथलॉन (२०२५), ज्युडो (२०२४) आणि कुराश
(२०२४-२५ व २०१७-१८) या स्पर्धांचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध असून संबंधित खेळाडूंनी
प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. इतर खेळांचे अभिलेखही टप्प्याटप्प्याने अपलोड करण्याचे
काम सुरू आहे.
यापूर्वी विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक
सेवा यांच्याकडून प्रमाणपत्रांची पडताळणी केलेल्या खेळाडूंनी देखील पुढील भरती
प्रक्रियेसाठी या प्रणालीद्वारे डिजिटल प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक असल्याचे
आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने केले आहे.
0000
श्रद्धा
मेश्राम/विसंअ
वृत्त क्र 836
ज्योत्स्ना देवधर यांच्या
जन्मशताब्दीवर्षानिमित्त
‘अक्षर ज्योत’ सांस्कृतिक
कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई, दि. 12:
सुप्रसिद्ध मराठी लेखिका ज्योत्स्ना देवधर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक
कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत त्यांच्या
अजरामर साहित्याचे सादरीकरण तसेच त्यांच्या आयुष्यावर आधारित निवडक गाण्यांचा
‘अक्षर ज्योत’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
‘अक्षर ज्योत’ सांस्कृतिक
कार्यक्रम
मेला शुक्रवारी 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजता पु. ल. देशपांडे सभागृह, लोकमान्य सेवा संघ (टिळक मंदिर), विलेपार्ले
(पूर्व) येथे होणार आहे. सांस्कृतिक
कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांच्या
मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडणार
आहे.
या कार्यक्रमासाठी पुष्कर श्रोत्री, मधुरा वेलणकर आणि दिप्ती भागवत यांच्याकडून अभिवाचन तर गायक
नचिकेत देसाई आणि अर्चना गोरे हे निवडक गीते सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा मोडक तर संहिता विकास
परांजपे व दुहिता सोमण यांनी तयार केली आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण स्वरवंती
क्रिएशन्स यांचे आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेश
विनामूल्य असून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी
रसिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
000
संजय
ओरके/विसंअ
वृत्त क्र 835
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय
यशवंतराव चव्हाण यांना मंत्रालयात
अभिवादन
मुंबई दि ,१२,भारताचे माजी
उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या
जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मंत्रालयात अभिवादन करण्यात आले.
सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र
बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही स्वर्गीय
यशवंतराव चव्हाण यांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात
आले. यावेळी अधिकारी आणि कर्मचारी
उपस्थित होते.
००००
प्रविण भुरके/स.सं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा